प्रश्नचिन्ह आईवडिलांनी केलेल्या संस्कारावर

 आईवडिलांचे संस्कार कधीच चुकीचे नसतात


क्षणिक सुखाला बळी पडणाऱ्या मुली


लॉकडाऊन च्या काळात कॉलेज बंद असल्या कारणानं आम्ही साधारण पाच सहा महिने गावीच होतो.गावी असताना खूप साऱ्या गोष्टी कानावर येत होत्या.कुणाच्या नवराबायकोच्या भांडणाच्या,कुणाच्या सासू सुनेच्या भांडणाच्या, कुणाच्या शेतीवरून असणाऱ्या वादाच्या तर खूप तरुण मुलं ज्यांचं वय लग्नाचं होवून गेलं तरी  लग्न होत नाही अशा अनेक बातम्या रोज कानावर पडत असत.

गावाकडच्या चर्चा ह्या खूप रंगतदार असतात. मूळ विषय ज्या व्यक्तीच्या कानावर पडला तो विषय पूर्ण गावभर पसरत असताना प्रत्येकाच्या मनाचे चार शब्द वाढवून तो पुढच्या व्यक्तीला सांगितला जातो.वर आणि हेही सांगितलं जातं, ' काय समजलं का तुम्हाला ', समोरची व्यक्ती जेंव्हा काय म्हणून विचारते तेंव्हा तो विषय सांगितला जातो.मात्र सांगताना अजून विशेष काळजी घेतली जाते ती म्हणजे, ' तुम्हाला म्हणून सांगतो , कुणाला सांगू नका बरं का? ' . असं बोलणं दोन व्यक्तींमध्ये होतं आणि चर्चा सुरू होते.गावातील प्रत्येक व्यक्ती अशाच प्रकारचं बोलणं करून पुढे ह्याच सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. सांगू नका बरं का असं म्हणून प्रत्येक व्यक्तीची चर्चेला सुरूवात होते.

गावातील गरमागरम विषय म्हणजे मुलींचा.अगदी लहानापासून थोरांपर्यंत सगळ्यात जास्त चर्चेचा विषय असायचा तो म्हणजे, 'अमक्या अमक्यच्या पोरीची लक्षणं काय ठीक दिसत नाहीत', 'अमक्या अमक्याची पोरगी पळून गेली '. हे फक्त एखाद्या मूलीविषयी नव्हतं तर दर एक महिन्याला दोन तीन तरी पोरी पळून जाऊन लग्न करत होत्या.

चर्चा इथेच थांबत नाहीत.या सोबत अजून बरेच विषय चर्चेत असतात.मुलगा दारुडा, व्यसनाधीन असणारा, रोज गावभर बोंबलत फिरणारा, काहीही कामधंदा न करणारा, आईवडिलांच्या जीवावर भार असणारा मुलगा अशा मुलासोबत मुलगी पळून गेली.

विशेष म्हणजे या मुली सोळा ते वीस या वयोगटातील.कुठल्याही गोष्टींची पोच नसलेल्या वयातल्या, आपलं बरंवाईट कशात आहे या गोष्टींची जाणीव नसणाऱ्या वयातल्या ह्या पोरी.शिक्षण घेण्याच्या वयातील ह्या पोरी, आपल्या उज्वल भविष्याची स्वप्न बघण्याच्या वयातील ह्या पोरी, आपलं काहीतरी ध्येय ठरविण्याच्या वयातील या पोरी.पुढं कशी परिस्थिती निर्माण होईल आणि कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागेल  या कुठल्याच गोष्टींची पर्वा न करता क्षणिक प्रेमाला बळी पडलेल्या या पोरी स्वतःच्या पायावर स्वतः कुऱ्हाड मारून घेत आहेत.


बरं मुलगी पळून गेली या विषयात 'मुलगी ' या एकाच बाजुंवर जोर दिला जातो.मुलगी सोबत मुलगाही आहे मात्र त्या मुलाला दोष दिला जात नाही.सर्व दोष मुलगी आणि तिचे आईवडील यांना दिला जातो.

एक जण चर्चेमध्ये म्हणाला आणि मला तो प्रकर्षाने जाणवलेला विषय म्हणजे ,' मुलगी पळून गेली इथं तिची आजिबात चूक नाही' , सगळं आईवडिलांचच चुकलं, 'आईवडिलांनी संस्कारच चुकीचे केले ' .सगळा दोष आईवडिलांना देऊन लोकं रिकामी होतात.गावाकडे लोकं आपल्या इज्जतीला,आपल्या अब्रूला फार जपतात.इज्जत म्हणजे काय तर कुणी आपल्याकडे बोट नाही दाखवलं पाहिजे, लोकांनी आपल्याला नावं नाही ठेवलं पाहिजे. लोकं काय म्हणतील , समाज काय म्हणेल या भीतीने खूप चाकोरीबद्ध जीवन जगणारी भोळीभाबडी गावाकडची लोकं इज्जत खूप जपतात .

इथं मात्र मुलाचे संस्कार मुलाचं चरित्र या विषयावर कुणीच बोलत नाहीत.मग तो मुलगा कसाही असो.इथं दोष मात्र मुलीला आणि तिच्या आईवडिलांना दिला जातो.मुलीचे आणि तिच्या आईवडिलांचे संस्कार काढले जातात. त्यांच्या अब्रूचा, इज्जतीचा सगळ्या गावात पंचनामा केला जातो.

कोणते आईवडिल आपल्या मुलीला चुकीचे संस्कार देतील.कुणाचे आईवडिल आपल्या मुलीला उज्वल भविष्याची स्वप्न दाखवायचे सोडून अशा गोष्टी शिकवतील की जेणेकरून त्यांच्या मुलीचं भविष्य अंधारमय असेल.सगळेच आईवडील आपल्या मुलांचं भविष्य उज्वल करण्यासाठी धडपडत असतात.आपल्या मुलांना चांगलं शिक्षण देण्यासाठी काबाडकष्ट करत असतात.मुलांचं सर्वकाही चांगलं जोवर होत नाही तोपर्यंत ते जराही उसंत घेत नाहीत.त्यांची धडपड फक्त आणि फक्त मुलांचं चांगलं संगोपन आणि त्यांचं उज्वल भविष्य यासाठीच चाललेली असते.प्रसंगी उपाशी राहून, अनवाणी पायाने रणावणातील कामं करून, ऊन, वारा, पाऊस झेलून आपल्या मुलांना चांगलं आयुष्य आणि चांगले संस्कार देण्याचा प्रयत्न करत असतात.

मुलांसाठी काबाडकष्ट करणारे आईवडील


आपल्या मुलींच्या उज्वल भविष्याची स्वप्न बघणारा कोणताच आईबाप आपल्या मुलीला तिच्या तरुण वयात जेंव्हा तिला कोणत्याही गोष्टींची पोच नसते,समज नसते तेंव्हा तिला असा चुकीचा सल्ला देऊन  अंधारात ढकलुन देईल.लहानपणी नाजूक कळी प्रमाणे आणि तरुण वयात नाजूक फुलाप्रमाणे जपलेल्या आपल्या मुलीचं जेव्हा आयुष्य उध्वस्त होताना आईबाप पाहत असतो तेव्हा त्यांचं काळीज तीळ तीळ तुटतं.

मुलीच्या भविष्याच्या चिंतेनं मन अगदी पोखरून निघतं.लोकांच्या प्रश्नांची उत्तरे देऊन देऊन मानसिक त्रास सहन करावा लागतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समाजात आपली इज्जत गेली,आपल्या पोरीनं चार लोकांत मान खाली घालायला लावली या गोष्टींचा खुपच त्रास सहन करावा लागतो या आईवडिलांना.

अर्थात लोकं बोलतच राहतात.लोकांचं कामच आहे ते.लोकांना आपण गप्प नाही करू शकत.मात्र इथं विषय आहे मुलीच्या भविष्याचा आणि तिच्या स्वप्नांचा.इतक्या लहान वयात एका अशा मुलाशी ज्याचं शिक्षण नाही,ज्याला स्वतःचं पोट भरणं मुश्कील आहे , जो स्वतः दुसऱ्यावर अवलंबून आहे आणि मुख्य म्हणजे एक असा मुलगा जो व्यसनाच्या आहारी गेला आहे अशा मुलाबरोबर जी मुलगी पळून जाऊन लग्न करते त्या मुलीची या सर्व गोष्टी समजून घेण्याची कुवतच नाही मुळात.तिची तेवढी पोचच नाही.जी मुलगी हाही विचार नाही करू शकत की, 'तिचा नवरा स्वतः दुसऱ्यावर अवलंबून आहे तो मला काय सांभाळणार', ती मुलगी छोट्याश्या अमिषाना ,क्षणिक प्रेमाला, क्षणिक सुखाला,मोहाला बळी पडून स्वतःच नुकसान स्वतः करून घेत आहेत.

आणि या सगळ्याचं खापर मात्र आईवडिलांच्या माथी फोडलं जात आहे.आईवडिलांचं संस्कार काढले जात आहेत.

चार दिवसाच्या प्रेमानं पोट भरत नाही.पोट भरण्यासाठी ,सुखी संसार करण्यासाठी , पुढे मुलाबाळांना जन्माला घालण्यासाठी त्यांचं शिक्षण करण्यासाठी पैसा लागतो.त्यासाठी तुमच्या अंगात काहीतरी कला अवगत असल्या पाहिजेत. ज्या माध्यमातून तुम्ही तुमचं कर्तृत्व दाखवू शकता , समाजामध्ये तुमची वेगळी अशी एक ओळख निर्माण करू शकता, तुमचं वेगळं असं एक अस्तित्व निर्माण करू शकता.

वेळ हे एक असं अस्त्र आहे जे आपल्या आयुष्यातुन निघून गेलं की पुढे पश्चाताप करण्या व्यतिरिक्त आपण काहीच करू शकत नाही.आपले चुकलेले निर्णय आपण पुन्हा बदलू शकत नाही.गेलेली वेळ आपण पुन्हा मागे आणू शकत नाही.

आपला भविष्य काळ चांगला ,उज्वल हवा असेल तर आपल्या वर्तमानातील निर्णय चुकले नाही पाहिजेत. आपले आजी आजोबा म्हणतात सगळ्या गोष्टी त्या त्या वेळेतच,त्या त्या वयातच झाल्या पाहिजेत. म्हणजे शिक्षण घ्यायच्या वेळेत शिक्षणच घेतलं पाहिजे.काहीतरी ध्येय उराशी बाळगलं पाहिजे.स्वतःच्या पायावर आपण कसं उभा राहू,  आपण आपली ओळख चार लोकांत कशी निर्माण करू, आपलं व्यक्तिमत्त्व चार चौघात कसं उठून दिसेल, चार लोकांमध्ये आपलं वेगळेपण कसं जाणवेल या दिशेने तुमचे विचार पाहिजेत आणि तशा प्रमाणे खूप कष्ट घ्यायची तयारीही असली पाहिजे.

सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या चुकीच्या निर्णयामुळे तुमच्या आईवडिलांचे संस्कार कुणी काढले नाही पाहिजेत. तुमच्या चुकीच्या निर्णयाचा दोष आईवडिलांना नाही दिला पाहिजे.तूमच्या चुकीचं खापर तुमच्या आईवडिलांच्या माथी फोडू नका.

हा लेख पूर्ण होईपर्यंत सर्व चर्चा ही मुलीची आणि तिच्या आईवडिलांचीच झाली.अर्थात समाजात अशाच प्रकारच्या चर्चा होतात.मुलाने काय केलं हे गौण असतं. सर्व गोष्टी मुलीचे आणि तिच्या आईवडिलांचे संस्कार यावरच असतात.आमच्या परिसरातील साधारणपणे आठवी ते बारावी करणाऱ्या मुली अशा प्रकारे पळून गेल्या. आणि त्यांच्याबरोबर जी मुलं पळून गेली ती ही अशीच त्यांच्या वयापेक्षा थोडीशी मोठी, शिक्षण मध्येच सोडलेली गावात उनाडक्या करणारी.आपल्या समाजात या अशा मुलांच्या  चर्चा मुळात  होतच नाहीत.लोकं मुलीला आणि तिच्या आईवडिलांना संस्कारांचे पाठ शिकवत बसतात.

यावरून एक गोष्ट मात्र नक्कीच समोर येतेय ती म्हणजे त्यांच्या या वयात आपलं करियर काय असावं ,आपलं भविष्य कसं असेल, आपलं ध्येय कसं ठरवायचं,आपण स्वतःच्या पायावर कसं उभं रहावं, आपण इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करून दाखवलं पाहिजे, समाजात आपण ताटमानेनं कसं उभं राहू,समाजात आपली वेगळी ओळख कशी निर्माण करू, त्यांना अशा प्रकारची स्वप्न बघायला आणि ती सत्यात उतरवण्यासाठी   योग्य मार्गदर्शन,समुपदेशन केलं पाहिजे.जेणेकरून या मुली आपल्या आईवडिलांचा आणि खासकरून स्वतःचा व स्वतःच्या भविष्याचा विचार करून अशा क्षणिक मोहाला बळी पडणार नाहीत.



लेखन,

डॉ. मनिषा मोरे

व्हाट्सएप- 951775185

टिप्पणी पोस्ट करा

3 टिप्पण्या

  1. नेहमप्रमाणेच छान लेख. उद्बोधक अन् डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा लेख. हा ब्लॉग नवीन नवीन अन् आपल्या जीवनशैलीशी जवळीक साधणारा वाटतो. असेच उत्तमोत्तम लिखाण करीत रहा. तुमच्या पुढील लिखाणासाठी शुभेच्छा..!

    उत्तर द्याहटवा
  2. Khupch chan v prenadai lekh lihla aahet mam tumhi khrch kshnic sukhachya mohat pdun as vaglo tr tevdhech 4divs aanandat rahu shkto pn jr aayushyat aanandi rahaych asel tr aai vadilanchi man aaplya vagnyane tath zali pahije v tyanchya shmtine lgn kelyas aapn kdihi fukhi nahi hou shkt....chan prerna milali lekh wachun....🙏

    उत्तर द्याहटवा

कृपया तुमच्या प्रियजनांना लेख शेअर करा आणि तुमचा अभिप्राय जरूर नोंदवा. 🙏 🙏