स्वतःसाठी जगायचं राहूनच गेलं!!

स्वतःसाठी जगा,समाजासाठी नाही!!!


आयुष्य स्वतःसाठी जगा


ही गोष्ट आहे एका अशा स्त्रीची जीचं आयुष्य हे अगदी बेरंग होतं. देवाने तिच्या आयुष्यात रंग भरले पण ते रंग लगेचच उडून गेले. तिच्या आयुष्यात तसं बघायला गेलं तर फक्त काळा कुट्ट रंग राहिला.त्या रंगाने मात्र तीची पाठ सरणावर जाईपर्यंत सोडलीच नाही.

साधारण 1975 साली तिचं लग्न झालं होतं.सर्वसामान्य मुली ज्याप्रमाणे लग्नाची स्वप्न पाहतात तिचंही तसंच स्वप्न होतं.चांगला नवरा,चांगलं घरदार यापेक्षा वेगळं स्वप्न नसतंच मुळी सर्वसामान्य मुलींचं!.त्या काळात खरंतर खूप लहान वयात लग्न व्हायची.तिचंही खूप लहान असताना लग्न झालं.खूप लहान म्हणजे अगदी 12 वर्षाची असतानाच झालं होतं.

लग्न काय आणि संसार काय असतो हे समजलं देखील नसेल कदाचित तेवढ्यात तिचा नवरा शेताचा व्यवहार करायला आणि शेताचे पैसे द्यायला म्हणून परगावी गेला.सकाळची संध्याकाळ झाली तरीही तो परत नाही आला.दुसरा दिवस उजाडला तरीही तिचा नवरा परत नाही आला.मग शोधाशोध सुरू झाली.नवरा ज्या गावी गेला होता त्या गावी जाऊन चौकशी करण्यात आली, मात्र तो तिकडे पोहचलाच नव्हता.खूप शोधाशोध केली तो कुठेही सापडला नाही.

ती सासू,जाऊ आणि दिरासोबत राहत होती.सासूने आणि दिराने खूप प्रयत्न केले तिच्या नवऱ्याला शोधण्याचा मात्र त्याचा कुठेच ठावठिकाणा नव्हता.

ती थोडे दिवस माहेरी गेली.माहेरच्या मंडळींनी तीला काही दिवस ठेऊन घेऊन पुन्हा तिच्या सासरी धाडून दिलं. खूप लहान वयातली, कशाचीही पोच नसलेली ती कोवळी पोर सासरी आली.एकदा का मुलीचं लग्न झालं की तिच्या मृत्यूनंतरच तिचं सासर ती सोडते अशा मनस्थितीत जगणारा आपला समाज, याच समाजाच्या रितीमुळं आणि लोकं काय म्हणतील? या भीतीने तिच्या माहेरवासीयांनी तिला सासरी पाठवलं.

तिचा दिरही थोड्या दिवसांत मृत्यू पावला.ह्या दोन तरुण सुना आणि सासू असं हे कुटुंब झालं.तिच्या जावेला तीन मुलं मात्र हीला एकही अपत्य नव्हतं.हिला फार मानसिक त्रास होत होता.ज्या बाईचा नवरा बेपत्ता आहे आणि जीला मूलबाळ नाही त्या बाईला समाजाचं नको नको ते ऐकून घ्यावं लागत होतं."पांढऱ्या पायाची"," कपाळ करंटी", "नवऱ्याला खाल्ला" असे बरेच टोमणे तिला ऐकावे लागत होते.जगणं खूप कठीण होतं. मात्र माहेरचे फक्त तिला माहेरवासीन म्हणूनच बघत होते.माहेरवासीयांनसाठी ती फक्त पाहुणी राहिली होती.

आता जगायचंही सासरी आणि मरायचंही सासरीच.नवरा बेपत्ता झाला होता. त्याचं काही बरवाईट झालं आहे अशी कुठलीच बातमी आली नव्हती. त्यामुळे ती सासरी सुवासिनीचा साज करूनच असायची.कपाळावर भला मोठा कुंकवाचा टिळा, गळ्यात दोन डोरली आणि काळ्या मन्यात ओवलेलं मंगळसूत्र यामुळे ती खूपच सुंदर दिसायची. 

दोन जावाचं पटलं नाही त्यामुळं दोघीही वेगळ्या झाल्या.मोठ्या जावेला तीन मुलं होती त्यामुळे नवरा नसला तरी एवढा एकटेपणा तिला जाणवला नाही.ही मात्र एकटीच होती.ना नवरा,ना मूलबाळ, ना दीर ना जाऊ, ना सासू ही एकटीच राहत होती.तिच्या वाट्याला आलेली शेती आणि त्यातून मिळालेलं धान्य यावर तिचा वर्षभराचा खर्च भागायचा.

एकट्यानं जगणं आणि तेही एका स्त्रीनं, किती मुश्कील आहे हे वेगळं सांगायला नको.तरीही ती एकटी राहत होती.तिच्या तरुण वयात तिला कितीतरी जणांनी मानसिक त्रास दिला असेल हे आपण सर्वजण समजू शकतो.

एक एक वर्ष असंच जात होतं.हिच्या नवऱ्याचा मात्र काहीच पत्ता लागत नव्हता.हळू हळू तिचं वय उतार वायाकडे चाललं होतं.आपलं काही बरवाईट झालं तर आपली असणारी शेती आणि तिच्याकडे असणाऱ्या संपत्तीची काळजी तिच्या रक्ताचं नातं असणाऱ्या तिच्या भावाने घ्यावी म्हणून तिने सर्व शेती त्याच्या नावावर केली.तिच्या माघारी तिची संपत्ती दुसऱ्या कुणी लुबाडू नये यासाठी तिने हा विचार केला.तिच्या शेतीची काळजी आता तिचा भाऊ घेऊ लागला.

तरुण वयात लोकं काय म्हणतील आणि उतारवयात जमत नाही म्हणून तिनं स्वतःची हौसमौज कधी केलीच नाही.तिने तिच्या सर्व ईच्छा मारल्या.थोडं शेत तीन तिच्या नावावर ठेवलं होतं तेही तिच्या भावाने तिला कळू न देता गुपचूप स्वतःच्या नावावर करून घेतलं.बहिणीनं स्वतःहून सगळं भावाला दिलं होतं इतकं असून देखील त्याने तिचा विश्वास घात केला.

आयुष्यातील पहिली दहा बारा वर्षेच तिने सुख अनुभवलं असेल.आनंद साजरा केला असेल.नंतरच्या काळात तिच्या वाट्याला फक्त दुःखच आलं.तिला नवऱ्याचं सुख नाही मिळालं,तिला पोराबाळांचं सुख नाही मिळू शकलं. तिच्या आयुष्यात आनंदाचं असं काहीच घडत नव्हतं तरीही ती जगत होती.तिचं आयुष्य बेरंग झालं होतं तरीही ती जगत होती.बाहेरची लोकं तिला त्रास देतंच होती मात्र तिच्या रक्ताच्या नात्यांनीही विश्वासघात केला तरीही ती जगत होती.

स्वतःचं पोट मारून,स्वतःची कोणत्याही प्रकारची हौसमौज न करता ,स्वतःसाठी पैसा खर्च न करता सर्व काही भावाला देऊन टाकलं. भावाने मात्र मोठा विश्वासघात केला.लाखो रुपयांची जमीन हडपून देखील शेवटच्या काही दिवसात आपल्या बहिणीसाठी थोडे पैसे खर्च करताना त्याला त्रास होत होता.बहिणीचाच पैसा बहिणीसाठी खर्च करताना भावाच्या हातातून सुटत नव्हता.

समाज काय म्हणेल या विचाराने जगायचं राहूनच गेलं!!

तिच्या शेवटच्या श्वासात तिला पाणी पाजायला आणि तिच्या दहा दिवसांचे क्रियाक्रम करायला तिचं हक्काचं मात्र कोणीच नव्हतं.होते ते सर्व दिखावा करणारे,खोटे अश्रू डोळ्यात आणणारे, समाज काय म्हणेल या भीतीने उभी राहिलेली खोटी लोकं. जिवंतपणी कधी चौकशी न करणारे मेल्यावर मात्र डोळ्यात पाणी आणणारे खोटी लोकं.

बेरंग आयुष्य,काळाकुट्ट अंधार असणारं आयुष्य, कोणतंही सुख न भोगलेलं आयुष्य ,शेवटच्या श्वासापर्यंत एकट्यानं जगलेलं आयुष्य, लोकं काय म्हणतील या भीतीनं घाबरून, भिऊन जगणारं आयुष्य,समाजाच्या चुकीच्या रूढी परंपरा जपणारं आयुष्य,समाजाच्या परंपरेला बळी पडलेलं आयुष्य एक दिवस या जगाचा निरोप घेऊन निघून गेलं.हे सगळं करताना स्वतःसाठी मनाप्रमाणे जगायचं मात्र राहूनच गेलं.

लेखन,

डॉ.मनीषा मोरे



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या