नात्यांचा गुंता


नात्यांमधले सुसवे फुगवे





काल आम्ही सर्वजण एका लग्न समारंभाला गेलो होतो.लग्न खूप जवळच्या नातेवाईकांच्या घरचं होत. नवरदेवाकडून आम्ही लग्न समारंभात सामील झालो होतो.तिथे वेगवेगळ्या ठिकाणाहून आमच्या नात्यांमधील खूप लोकं जमली होती.लग्न घरात सगळा गोंधळ सुरू होता.लग्नाची नुसती धांदल सुरू होती.एकापेक्षा एक प्रत्येकाचीच नुसती तारांबळ उडाली होती.

नवरदेव त्याचे मित्र आणि करवल्या यांचा ताफा वेगळाच होता.नवरदेव आणि त्यांचे मित्र एकमेकांना चिडवण्याच्या आणि थट्टा मस्करी करण्याच्या मूड मध्ये होते.करवल्या नवनवीन साड्या नेसून गजरे माळून,नथ घालून फुल मेकअप करून लग्नासाठी तयार झाल्या होत्या.स्वतः तयार होऊन नवरदेवाला तयार करत होत्या.सगळं आनंदी वातावरण होतं.

इकडं सर्व महिला वर्ग हळदी कुंकवाचा कार्यक्रम करण्यात गुंग होत्या.वेगवेगळ्या पाहुण्यांचे आहेर आणि शिदोरी उघडून बायकांना हळदी कुंकवाला बोलवून सर्व गोष्टी दाखवल्या जात होत्या.आणलेला आहेर बघता बघता सर्व बायकांचं चर्चासत्र सुरूच होतं. ही साडी ऐवढ्याची, तो ड्रेस तेवढ्याचा, तिच्या गळ्यातलं एवढ्या तोळ्याचं अशा प्रकारच्या चर्चांना तिथं नुसता उत आला होता.

अचानक माझं लक्ष एका मावशीकडे गेलं.सर्व बायकांच्या चर्चा सुरू असताना त्या मात्र तिथे गप्प बसल्या होत्या.अगदी रडवेला चेहरा करून त्या तिथे बसल्या होत्या.मी त्यांच्या जवळ गेले आणि त्यांच्याशी गप्पा मारायला सुरुवात केली. त्याही माझ्याशी बोलत होत्या मात्र मनमोकळं करून बोलत नव्हत्या.मग मात्र मी त्यांना विचारलं ," मावशी तुम्हाला काही त्रास होतोय का"?, "तुमची तब्बेत तर बरी आहे ना"?. त्यावर त्या म्हणाल्या, मी ठीक आहे,माझी तब्बेत देखील ठीक आहे.

मग मी त्यांना विचारलं, "तुम्ही एवढ्या शांत का बसला आहात"? . काय टेन्शन आहे तुम्हाला. काय त्रास होतोय तुम्हाला.त्यावर त्यांनी त्यांचं मन माझ्याजवळ मोकळं केलं.

त्यांचा भाऊ,भावाची बायको,भावाचा मुलगा आणि भावाची सून हेही तिथे लग्नाला आले होते.भावाचा मुलगा आणि त्याची बायको दोघेही उच्च शिक्षित. दोघेही नोकरी करणारे.चांगला पगार घेणारे.मावशीचा भाऊ देखील नोकरी करणारा.खूप मोठया मोठ्या लोकांमध्ये त्याची ऊठबस असणारा.

भावापेक्षा मावशी वयाने मोठी मात्र भावापेक्षा परिस्थितीनं खूपच गरीब.मुळातच गरीब परिस्थिती असलेल्या मावशीला जेव्हा एखाद्या कार्यक्रमात लोकं दुर्लक्ष करतात तेव्हा तिला गरीब असल्याचा अपमान वाटतो.मावशीच्या ह्याच भावाने मावशीचा संसार सुखी व्हावा म्हणून खूप मदत देखील केली आहे.भावाच्या मुलाचं लग्न झालं.भावाचा आणि त्याच्या मुलाचा सुखी संसार सुरू झाला होता.त्याला आता बहिणीशी बोलायला,तिची विचारपूस करायला वेळच नाही.

लग्न समारंभात मावशीची भाच्ची सुन अगदी तिच्या समोर बसून होती तरी सुद्धा तिने मावशीची साधी विचारपूस सोडा अगदी दोन शब्द देखील बोलली नाही.मावशी मात्र स्वतःहून सुनेशी बोलली,तिची चौकशी केली.तरी देखील ती मावशीशी बोलली नाही.तिचा भाचा देखील तिच्याशी बोलला नाही,तिची चौकशी केली नाही.तिची विचारपूस केली नाही.

याच गोष्टीचा त्रास मावशीला जास्त होत होता.तिथे मावशीची भावजय देखील होती.मात्र तिने देखील आपल्या सुनेला मावशीची ना ओळख करून दिली ना मावशीबद्दल काही सांगितले.मावशीची भाच्चे सून आणि मावशी समोरा समोर अगदी अनोळख्या असल्या सारख्या बसल्या होत्या.मावशीने स्वतःहून त्या सुनेशी बोलायचा प्रयत्न तरी केला होता.मात्र ती सून तिच्या मोबाईल मध्ये व्हाट्सएप वर व्यस्त होती.

नवीन सुनेला आपल्या नातेवाईकांची ओळख करून द्यायची असते.तेंव्हाच त्या सुनेला आपले नातेवाईक माहीत होतील.बाहेरून आलेली ती पोर तिला आपल्या सर्व नातेवाईकांची माहिती दिली तरच तिला तिचे नवीन नातेवाईक माहीत होतील.

इथे मावशीचं एकच मत होतं, मी गरीब आहे मी कुणाला कशी दिसेल बोलायला.माझी चौकशी कोण करेल.सगळी जण मोठ्यांच्याच मागे फिरतील, मोठ्यांचीच चौकशी करतील, आम्ही गरीब कुणाला दिसणार आहे.

अर्थात हे सगळे नात्यातले रुसवे फुगवे आहेत.इथं रुसवाफुगवा आहे.अबोला आहे.ज्यांना नाती टिकवून ठेवायची आहेत त्यांनी हे रुसवे फुगवे सोडून पुन्हा आनंदाने एकत्रित रहायचं आहे. 

एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा, आपल्या वागण्यातून,बोलण्यातून समोरच्या व्यक्तीला कधीच कमीपणाची, गरिबीची जाणीव होऊन देऊ नका.समोरच्या व्यक्तीपेक्षा आपण खूप काही वेगळे आहोत याची जाणीव समोरच्या व्यक्तीला कधीच होऊ देऊ नका.

तुमचं वेगळेपण तुमच्या कामातून दाखवा.तुमच्या कर्तृत्वाने तुमचं व्यक्तिमत्त्व नक्कीच चारचौघात उठून दिसेल.लोकांची विचारपूस केल्याने, त्यांच्याशी बोलण्याने तुमचं नुकसान नक्कीच नाही होणार किंवा तुम्ही लहान नाही होणार.याउलट तुमचं व्यक्तिमत्त्व अजूनच खुलून दिसेल.याने समोरची व्यक्तीही खुश होईल आणि तुम्हाला ही मानसिक समाधान मिळेल.तुमचं नातंही टिकलं जाईल.नात्यांचा कुठल्याही प्रकारचा गुंता होणार नाही.

नातं जिवंत ठेवण्यासाठी त्याला शब्दरूपी आपुलकीचा, प्रेमाचा ऑक्सिजन द्या.आपलेपणाचं खतपाणी घाला.एकदा का नात्याची बीजं चांगली रुजली की त्याचं छान रोपटं होईल. पुढं ते चांगलं फुलेल, चांगलं बहरेल आणि त्याची चांगली फळं मिळतील.


लेखन,

डॉ. मनिषा मोरे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या