का होतेय उतारवयात आईवडिलांची फरफट??

तरुणपणात त्यांच्यासाठी कष्ट झेला,

उतारवयात फरफट सोसा


का होतंय आईवडिलांचं विभाजन

का होतंय आईवडिलांचं विभाजन ?


काल खूप दिवसांनी माझ्या एका आजोबांना भेटले.खूप थकलेले,चेहरा सुकलेला.वयाच्या मानाने ते खूपच म्हातारे दिसत होते.चेहऱ्यावर कोणतेही भाव नाहीत अगदी भावनाशून्य नजरेने माझ्याकडे पाहत होते.आजी कुठे आहे असं विचारताच त्यांच्या डोळ्यात पाणी आलं.माझी नजर चुकवून हळूच पाणावलेले डोळे पुसत मला म्हणाले," अग तू कुठं असतीस". किती दिवसांनी मला बघायला आलीस.हायस का बरी तू?.

आजोबा आपल्या बद्दल काहीच न सांगता माझीच चौकशी करत राहिले.खूप बोलत होते.इतके बोलत होते की,जणू खूप दिवस कुणाशी बोललेच नाहीत असं वाटत होतं.माझ्याशी बोलताना त्यांचे डोळे सारखे भरून येत होते,त्यांचा ऊर सारखा दाटून येत होता आणि हे मला जाणवत होतं.

आजोबा खुश दिसत नाहीत.काहीतरी चुकीचं होतंय आजोबांसोबत हे मला प्रकर्षाने जाणवत होतं. मी तिथे त्यांच्याशी खूप गप्पा मारल्या.सगळ्या पूर्वीच्या आठवणीत आजोबा मस्त गप्पा मारत होते. त्यांना भेटून मला खूप छान वाटलं पण मी समाधानी मात्र नक्कीच नव्हते.

माझं मन मला सारखं विचारत होतं की , नक्की काय झालं असेल?, आजी कुठे असेल?, आजोबांनी आजीचा विषय का टाळला असेल? या सर्व प्रश्नांनी मनात घर केलं होतं.तिथून निघून आल्यावर मग मी या प्रश्नांची उत्तरे शोधली.मग मात्र माझ्या पायाखालची जमीनच सरकली.मला जे काही कळलं ते समजल्यावर मी शॉकच झाले.

आजोबांची तीन मुलं.नवरा बायको आणि तीन मुलं असं त्यांचं कुटुंब होतं. शेतकरी कुटुंब.शेतात कष्ट करायचं तेंव्हा खायला मिळणार अशी परिस्थिती होती त्यांची.खाणारी पोटं जास्त आणि कमावणारे हे एकटेच.यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती खूप हलाखीची होती.पोटाला पोटभर खायला देखील मिळायचं नाही.त्यामुळे मुलं नेहमी कुपोषित असल्यासारखीच असायची.

आपल्या शेतातील पिकलेलं पुरायचं नाही त्यामुळे त्यांना रोज दुसऱ्याच्या बांधाला चाकरी केल्याशिवाय घरची चूल पेटायची नाही.अतोनात कष्ट उचलत होते आजोबा. मोठा मुलगा अगदी लहानपणापासून खूप हुशार होता.त्याची हुशारी पाहून आजोबांनी त्याला खूप मोठा इंजिनीअर करायचं ठरवलं.पन्नास वर्षांपूर्वीचा तो काळ.त्या काळात एक आणे, दोन आणे, पाच पैसे,दहा पैसे ही नाणी प्रचलित होती.आजोबांना दिवसभर दुसऱ्याच्या शेतात राबून एखादा 'आणा' मिळायचा.त्यावर मग यांची भूक भागायची.अशा परिस्थितीत मुलाचं शिक्षण पूर्ण करायचं म्हणजे खूप मुश्कील काम होतं.

आजोबा मात्र जिद्दी होते.त्यांना त्यांच्या मुलाला इंजिनिअर बनवायचंच होतं. मुलाचं 12 वी पर्यंतचं शिक्षण बिना फी चं झालं.पुढं इंजिनिअरिंग ला प्रवेश घेण्यासाठी मात्र पैसे लागणार होते.डोनेशन आणि वार्षिक फी हा एवढा मोठा खर्च भागणार कसा?. यासाठी त्यांनी आपली वडिलोपार्जित जमीन विकायचा निर्णय घेतला.जमीन विकल्यावर त्यांच्यावर अजूनच वाईट परिस्थिती येणार होती.पोटापाण्याचे अजूनच हाल होणार होते.

मोठ्या मुलाच्या मागे अजून दोन मुलं होती.त्यांचंही शिक्षण त्यांना पाहायचं होतं.जवळ आहे ही जमीन विकून पुढं पूर्ण कुटुंबाचं हाल हाल होणार होतं.या सर्व गोष्टींची जाणीव असून देखील आजोबांनी त्यांचा निर्णय बदलला नाही.ते म्हणायचे, "माझा मुलगा इंजिनिअर झाला की गेलेलं शेत पुन्हा मागे घेता येईल मात्र माझ्या मुलाचं शिक्षण पूर्ण नाही झालं तर माझ्यासारखंच माझ्या मुलाला देखील रोज दुसऱ्याच्या बांधाला जाऊन लोकांची चाकरी करावी लागेल". आणि मला हे होऊन द्यायचं नाही. शेवटी त्यांनी आपलं शेत विकलंच आणि आलेल्या पैशातून मोठ्या मुलाचं इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं.

स्वतःच्या इच्छा मारून, स्वतःचं तारुण्य विसरून या आईवडिलांनी मुलांच्या संगोपनासाठी आणि त्यांच्या शिक्षणासाठी ध्येय झिजविला.स्वतःचं पोट मारून, स्वतःची आतडी वाळवून पोरांना पोटभर खायला घातलं.अनवाणी पायाने ऊन,वारा,पाऊस कशाचीही पर्वा न करता रोज मोल मजुरी करून, दुसऱ्याची चाकरी करून मुलांना सुशिक्षित केलं.मुलांचं भविष्य बदललं.मुलांना ताट मानेनं जगायला शिकवलं. समाजात एक वेगळी ओळख निर्माण करून दिली.हे सगळं फक्त एक कर्तव्य म्हणून किंवा उपकार म्हणून नव्हे तर एक जबाबदार आईवडील म्हणून केलं.कुठल्याही परताव्याची, परतफेडीची भावना मनात न ठेवता निस्वार्थीपणे सगळं केलं.


आईवडिलांच विभाजन


मुलगा इंजिनीअर झाला.देवाच्या आणि आईवडिलांच्या कृपेने तो सरकारी खात्यात नोकरीला लागला.आईवडिलांचा आनंद गगनात मावेना इतका झाला.मुलाचं खूप कौतुक वाटत होतं.सगळ्या गावभर मुलाचं कौतुक सांगताना आईवडील अजिबात थकत नव्हते.पहिला पगार आला.मुलाने पहिला पगार आईवडिलांच्या हातात ठेवला.आईवडिलांचा ऊर अभिमानाने भरून आला.हे सगळं अगदी एखाद्या सिनेमात दाखवतात तसंच दिसत होतं आणि घडत देखील होतं.त्यांच्या आयुष्याचा कालचा संघर्ष हा आज सुखी व समाधानी आयुष्याच्या स्वरूपात उभा होता.

आता मुलाच्या लग्नाचा विचार सुरू झाला.मुलाच्या नशिबानं त्याला चांगली शिकलेली मुलगी मिळाली.ती देखील नोकरी करणारी होती.जिल्हा परिषदेच्या शाळेवर ती शिक्षिका म्हणून नोकरी करत होती.मुलाला लाखभर पगार,सुनेला चाळीस पन्नास हजार पगार हे सगळं त्यांच्यासाठी खुपच विलोभनीय होतं.मुलाचा सुखी संसार पाहून आईवडिलांच्या डोळ्याचे पारणे फिटले.

का होतंय आईवडिलांचं विभाजन


सगळं काही सुरळीत चाललं होतं.आईवडील आता आजोबा झाले होते.नातवंडांमध्ये अगदी लहान मूल होऊन त्यांच्या सोबत खेळत होते. त्यांचं वय देखील हळू हळू वाढत चाललं होतं.पण माशी कुठे शिंकली कळलंच नाही.त्यांच्या सुखी संसारात मिठाचा खडा पडला.त्यांच्या घरी हळू हळू आईवडिलांच्या वरून भांडणं व्हायला लागली.भांडणं वरचेवर होत होती.

मोठा मुलगा आणि सून पगारदार म्हणून आईवडील त्यांच्याकडेच रहायला पाहिजेत अशी वाटणी झाली. मधला आणि छोटा मुलगा वेगळे झाले.त्यांनी आईवडिलांची जबाबदारी घेतली नाही.त्या दोघांचं मत असं होतं की, मोठ्याला शिकवण्यासाठी सगळी जमीन विकून टाकली.आमच्यासाठी काहीच ठेवलं नाही.आम्ही आता आमचं पोट भरायचं की आईवडिलांना बघायचं.आईवडिलांची जबाबदारी आमची नाही.त्यांची जबाबदारी मोठ्यानेच घेतली पाहिजे.अशाप्रकारे त्यांच्या दोन मुलांनी त्यांना सांभाळायला नकार दिला.

इकडे मात्र मोठ्या मुलाचं आणि सुनेचं मत हे होतं की, आईवडिलांची जबाबदारी फक्त आम्हीच का घ्यायची?. थोडे दिवस आम्ही करतो आणि थोडे दिवस त्या दोघांनी करावं. मुलांच्या या भांडणामुळे आईवडील वैतागून गेले.मुलांना आपण आता जड झालो हे त्यांना सहनच होत नव्हतं.त्यांच्या डोळ्यासमोर त्यांचा कालचा संघर्ष उभा राहत होता आणि डोळ्यातून घळाघळा अश्रूंचा पाट वाहत होता.

आईवडिलांच्या पोटाचे हाल सुरू झाले.वेळेवर त्यांना जेवायला मिळत नव्हतं.तरुणपणात मुलांच्या जबाबदारी मुळं पोटाला पोटभर नाही मिळालं आणि आता मुलांच्या वाटणी मुळं मिळत नव्हतं. याचा परिणाम त्यांच्या तब्बेतीवर होऊ लागला.त्यांची तब्बेत हळूहळू ढासळू लागली.अगोदरच मरमर मरून काम केल्यानं हाडांचा नुसता सापळा राहिला होता त्यात आता उतारवयात पोटापाण्याचे हाल यामुळे त्यांची तब्बेत चांगलीच खालावत चालली होती.

मुलांना मात्र याचा काहीच फरक पडत नव्हता.आई वडीलांशीवाय त्यांचं सगळं आलबेल चाललं होतं.त्यांच्या पोटाला काय आहे किंवा नाही याची चौकशी करण्याचं कष्ट देखील ते घेत नव्हते.मुलांची मनस्थिती अशी झाली होती की, अगदी आईवडिल जिवंत आहेत की नाही या गोष्टींचा त्यांना काडीचा फरक पडत नव्हता.

सगळ्यात मोठी शोकांतिका ही होती की, मोठ्या मुलाने एक कुत्रं पाळलं होत.ते कुत्रं विकत घेण्यासाठी त्याने पंचवीस हजार रुपये खर्च केले होते.त्या कुत्र्याचं खाणंपिणं करण्यासाठी रोज पन्नास ते शंभर रुपये खर्च होत होते.इतक्यातच ते कुत्रं मेलं.त्या मुलाचा फार जीव होता त्या कुत्र्यावर.मुलगा खूप दुःखात होता.ते दुःख कमी करण्यासाठी त्याने पुन्हा एक कुत्रं विकत आणलं.

आता मात्र त्याने पन्नास हजार रुपये खर्च करून दुसरं कुत्रं विकत घेतलं.कुत्र्याच्या खाण्यासाठी अजून जास्त खर्च करत होता,मात्र  त्याच्या जन्म दात्यांच्या पोटापाण्याचं बघायला त्याच्याकडे पैसा नव्हता.त्या कुत्र्याच्या लसीकरणावर आठवड्याला खूप पैसे खर्च करत होता मात्र,त्याच्या जन्म दात्यांच्या दवापाण्याला त्याच्याकडे पैसे नव्हते.कुत्र्याला फिरवण्यासाठी, त्याला हवापालट म्हणून चार चाकी गाडीतून त्याला फ़िरायला घेऊन जाण्यासाठी त्याच्याकडे खूप वेळ होता मात्र ज्यांनी आपलं आयुष्य मुलांच्या नावी केलं,ज्यांनी आपल्या हाडाची काडं करून मुलांना वाढवलं,त्याला नोकरीसाठी काबिल बनविले ,ज्यांनी स्वतः उपाशी राहून मुलांची पोट भरावी म्हणून हाल अपेष्टा सहन केल्या त्या जन्म दात्यांकडे लक्ष द्यायला मात्र त्याच्याकडे वेळ नव्हता.आईवडील आज इथं तर उद्या तिथं असं पाहुण्यांकडे जाऊन दिवस काढतायत.

आयुष्यभर कष्ट करून शेवटी त्यांच्या उतारवयात ते बेघर झाले होते.त्यांच्याकडे स्वतःचं आणि हक्काचं असं काही राहिलंच नव्हतं.

'To be or not to be...', 'जगावं की मरावं'. तसेच 'कुणी घर देतं का घर' असं म्हणायची वेळ आज त्या आजोबांवर आली होती, म्हणून ते दुःखी होते, म्हणून ते उद्विग्न होते.

का होतेय पालकांचं विभाजन


मुक्या प्राण्यावर म्हणजेच कुत्र्यावर जीवापाड प्रेम करणारा,त्याला जिवापेक्षाही जास्त जपणारा,कुत्र्याच्या खाण्या पिण्यासाठी रोज लागेल तेवढा पैसा खर्च करणारा त्यांचा मुलगा, ज्यांनी त्याला जन्माला घातलं,ज्यांच्यामुळे त्याने हे जग पाहिलं,ज्यांच्यामुळे त्याचं या जगात आज अस्तित्व आहे त्या आईवडिलांची सेवा राहू दे पण त्यांच्या असण्याचा आणि नसण्याचा त्याला काहीच फरक पडत नाही हीच मोठी शोकांतिका आहे.ज्यांनी आपल्या आयुष्यात आपल्या मुलांचं इनकमिंग फ्री केलं त्याच मुलांनी त्यांच्या आयुष्यात  आपल्या आईवडिलांचं आऊटगोविंग मात्र फ्री केलं.

हा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा कोण जाणे कदाचित अशा निर्लज्ज मुलांच्या वाचण्यात हा लेख आला तर कदाचित त्यांच्या वागणुकीची जाणीव होईल.


लेखन,

डॉ. मनिषा मोरे


टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

  1. ते म्हणतात ना Indian parents work hard to make their children rich.
    त्या आजी आजोबांचं असं काय चुकलं? आई वडील म्हणून काहीच चुकलं नाही, फक्त एकच चूक झाली
    "*त्यांनी स्वतःवर प्रेम केलं नाही*"

    ते फक्त मुलांवर प्रेम करत राहिले

    उत्तर द्याहटवा

कृपया तुमच्या प्रियजनांना लेख शेअर करा आणि तुमचा अभिप्राय जरूर नोंदवा. 🙏 🙏