लोकं काय म्हणतील !!

समाज काय म्हणेल ...

लोकं काय म्हणतील...


Samaj kaay mhanel,समाज काय म्हणेल

समाज काय म्हणेल याचा विचार


लॉक डाऊन च्या काळात बरेच दिवस गावाकडं राहणं झालं.गावाकडे नेहमीच हे ब्रीदवाक्य ऐकायला मिळत असे, " लोकं काय म्हणतील " ," समाज काय म्हणेल ".

अलीकडेच एका ताईच्या नवऱ्याचं निधन झालं.खूप तरुण वयात तिचा नवरा निघून गेला.ती आणि तिची दोन मुलं असं यांचं कुटुंब सर्वस्वी तिच्या नवऱ्यावर अवलंबून होतं. नवरा गेल्यामुळे तिच्या संसाराची वाताहात झाली.त्या ताईला घरातून बाहेर पडण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नव्हता.जवळ जवळ एक महिना दुःख करत घरात बसली.तिच्या दुःखात लोकं सामील झाली मात्र किती काळ तिच्या सोबत राहणार.तिच्या मुलांची जबाबदारी तिलाच घ्यायची होती.खायचे वांदे व्हायला लागले.

नवऱ्याच्या आजारपणात सगळा पैसा खर्च होऊन गेला.आता तिला घरातून बाहेर पडण्यावाचून गत्यंतर नव्हते. मात्र तरीही ती कित्येक दिवस घरातच बसून राहिली ते फक्त एकाच कारणासाठी की, " लोकं काय म्हणतील ". लोकं म्हणतील ,बाईला नवरा गेल्याचं दुःख अजिबात नाही.नवरा गेला नाही तोवर लगेच घराबाहेर पडली.लोकांना घाबरून तिनं घर सोडलंच नाही." समाज काय म्हणेल या भीतीने तिनं खूप दिवस स्वतःला कोंडून घेतलं आणि स्वतःचं आणि पोरांचं पोटाचं हाल करून घेतलं.किती मोठं नुकसान आहे हे त्या बाईचं!. फक्त एका गोष्टीमुळे ते म्हणजे " लोकं काय म्हणतील ".

अर्थात हेच काहीतरी म्हणणारे लोकं ते कुटुंब सुखात आहे की दुःखात, पोटभरून जेवायला तरी आहे की नाही , ते कोणत्या त्रासात आहे या गोष्टींची चौकशी सुद्धा करत नाहीत.त्या बाईने मात्र "लोकं काय म्हणतील" या भीतीनं स्वतःचं आणि तिच्या पोराबाळांचं हाल हाल केले.


समाज काय म्हणेल, samaj kaay mhanel

लोकं काय म्हणतील हा विचार


दुसरं एक गावकडचंच उदाहरण.आईबाबांची लाडकी तरुण मुलगी रोज कॉलेजला जायची.त्याच गावामध्ये राहणारा ,गावभर फिरणारा गावगुंड त्या पोरीची रोज छेड काढायचा. तिला खूप मानसिक त्रास द्यायचा.तिच्या आईवडिलांनी एकदा दोनदा त्या पोराला दम दिला होता मात्र उनाडक्या करणारा तो गावगुंड ऐकन्याचं नावच घेत नव्हता.तो खूपच त्रास देत होता.यामुळे त्या मुलीला आणि तिच्या आईवडिलांना खूप मानसिक त्रास सहन करावा लागत होता.

मात्र लोकं काय म्हणतील. लोकं आपल्याच पोरीला नावं ठेवतील.आपल्या पोरीचं लग्न व्हायचं आहे.लोकं एकाचं दोन करून आपल्या पोरीलाच नावं ठेवतील. या गोष्टींचा विचार करून त्यांनी त्या पोराचा नाद सोडून दिला.त्या पोराच्या त्रासाला कंटाळून त्यांनी त्यांच्या पोरीला कॉलेज मध्ये जायचं बंद करून टाकलं.तरीही तो गुंड त्या पोरीला आणि तिच्या आईवडिलांना त्रास देतच होता.

पुढे याचा परिणाम असा झाला की एक दिवस नैराश्याने त्या पोरीनं आत्महत्या केली आणि तिच्या आयुष्याचा शेवट करून टाकला.हे फक्त कशामुळे झालं तर " लोकं काय म्हणतील" , " समाज काय म्हणेल ".

योग्य वेळी जर त्या पोराला पोलिसांच्या स्वाधीन केलं असतं तर आज ती पोरगी जिवंत असती.पण लोकांचा विचार करून सर्व गोष्टी सहन केल्यामुळे एका निष्पाप मुलीला आपला जीव गमवावा लागला.

Loka kaay mhantil,समाज काय म्हणेल

समाज काय म्हणेल हा विचार

अजून एक उदाहरण, एका मुलीचं तिच्या आईवडिलांनी खूप थाटामाटात लग्न लावून दिलं. मुलगी खूप खुश होती.अगदी तिला तिच्या स्वप्नातील राजकुमार मिळाला होता.सर्वचजण खूप आनंदी होते.मात्र तिच्या नशिबात कदाचित लग्न सुख नव्हतंच. लग्नाच्या पाचव्या दिवशीच तिच्या नवऱ्याचा खूप मोठा अपघात झाला आणि त्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला.तिचा संसार सुरू होण्या आधीच मोडला.खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळला त्या मुलीवर आणि कुटुंबावर.नवऱ्याचा चौदावा विधी झाल्यावर लगेचच तिचे आईवडिल तिला माहेरी घेऊन आले.

त्या मुलीचे खूप दिवस दुःखातच गेले.अगदी 22 वर्षाची मुलगी विधवा झाली होती.पुढं तिचं कसं होणार,तिचं आयुष्य कसं असणार या कोणत्याही गोष्टींचा विचार न करता तिच्या आईवडिलांनी तिला जणू घरात डांबून ठेवलं होतं.तिच्या आयुष्यात पुढे काहीही घडत नव्हतं.तिनं तिच्या सर्व इच्छा मारून जगायचं आणि हे का, तर " लोकं काय म्हणतील ". 

ऐन तारुण्यात वैधत्व प्राप्त झालेल्या मुलीच्या दुसऱ्या लग्नाचा विचार तिच्या आईवडिलांनी केलाच नाही.पुढं तीच संपुर्ण आयुष्य पडलं आहे,तिला तिच्या आयुष्यात जोडीदार हवाच असा विचार तिच्या आईवडिलांनी केलाच नाही.तिच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला होता. याला कारण फक्त एकच, "लोकं काय म्हणतील ", " समाज काय म्हणेल ".

" समाज काय म्हणेल ", " लोकं काय म्हणतील ". या ब्रीद वाक्याने तिच्या आईवडिलांनी तिच्या आयुष्याचं नुकसान केलं.तिचं आयुष्य अंधारमय करून टाकलं.तिला पुन्हा नव्याने उभं राहण्याची,पुन्हा स्वप्न पाहण्याची, पुन्हा इतरांच्या प्रमाणे आनंद साजरा करण्याची ,तिच्या मनाप्रमाणे वागण्याची, जगण्याची  संधी तिच्या आईवडिलांनी तिला दिलीच नाही.कारण फक्त एकच " लोकं काय म्हणतील ". 

"लोकं काय म्हणतील " ह्या टॅग मुळं खूप लोकं आपल्या आयुष्यात खूप मोठं नुकसान करून घेत असतात.कधी कधी आपल्या आयुष्याला वेगळं वळण देणारा निर्णय आपण घेत नाही, आपल्या आयुष्यात येणाऱ्या खूप मोठ्या आणि चांगल्या संधी लोकं सोडून देतात फक्त या टॅग मुळं.

आपल्या रोजच्या जीवनातील अशी अजून बरीच उदाहरणे सांगता येतील.आयुष्यात खूप मोठं नुकसान झालं आहे.या सर्व गोष्टींचा नंतर खूप पश्चाताप झाला आहे.

ज्या गोष्टी आपल्या बुद्धीला पटतात, ज्यामुळे आपल्याला आनंद होतो, सुख मिळतं, समाधान मिळतं, नुकसान आणि फायद्याच्या ही पलीकडे जाऊन ज्या गोष्टी आपल्याला योग्य वाटतात त्या सर्व गोष्टी आपण आपल्या आयुष्यात केल्या पाहिजेत. भले लोकं काहीही म्हणोत. लोकांच्या म्हणण्याकडं लक्ष देऊन आपण आपले विचार,आचार का सोडायचे?.आपण आपल्या पायावर कुऱ्हाड का मारून घ्यायची? तेही फक्त लोकांच्या मुळे!.

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे "लोकं काय म्हणतील" या टॅग मुळं लोकांचं नाही तर त्यांच्या भीतीमुळे आपलंच खूप मोठं नुकसान होऊ शकतं. हे टाळण्यासाठी जे योग्य आहे ,स्वतःच्या बुद्दीला जे पटेल,आपल्या मनाला जे रुचेल ते करा.आपल्या आयुष्यात येणाऱ्या सुवर्णसंधी या टॅग मुळे कधीच हातातून जाऊ देऊ  नका. लोकं काय म्हणतील या विचाराने स्वतःसाठी जगणं सोडून देऊ नका. लोकं काय म्हणतील या भीतीने तुमच्या आयुष्यात येणारे छोटे छोटे आनंदाचे क्षण जगायला विसरू नका.

तुमच्या आयुष्यात अशा काही घटना घडल्या असतील, तुम्हींही कधी " लोकं काय म्हणतील" या गोष्टींचा विचार करून थांबला असाल असे काही तुमचे अनुभव असतील तर कमेंट करून शेअर जरूर करा.तुमच्या प्रतिक्रियेमुळं लोकांना प्रोत्साहन मिळू शकतं.


लेखन,

डॉ. मनिषा पाटील मोरे

व्हाट्सएप 9511775185

टिप्पणी पोस्ट करा

6 टिप्पण्या

  1. आज घडीला पुरुषवर्ग आणि जास्त करून स्त्रीमंडळी आयुष्यात एखादा अडचणींचा किंवा दुःखद प्रसंग उद्भवला की जास्त करून कायम हाच विचार करत बसतात की समाज काय म्हणेल ?? लोक काय म्हणतील ??
    वास्तविक आपण हाच कायम मनात विचार करून आपण स्वतःचे खचीकरण करून घ्यायला सुरुवात होते..
    खरंतर आपण जीवन जगताना काही वेळा आपणांस अडी अडचणींना तोंड दयावे लागते त्यावेळेस आपण लोकांचा सल्ला , मार्गदर्शन जरूर आत्मसात करावे व आपण आपले निर्णय स्वतः घ्यावा लागतो . यामध्ये आपण लोक काय म्हणतील आणि समाज काय म्हणतील या गोष्टीचा विचार मनात येतो पण कुठेतरी हा निर्णय बाजूला सारुन आपल्याला निर्णय आपणांस स्वतः निर्णय घ्यावा लागतो

    उत्तर द्याहटवा
  2. बरोबर आहे.👌समाजामध्ये खूप काही माणसं अशी असतात,की जी आपल्यातील Potential न ओळखतातच मरून जातात,ते खूप काही करू शकणारे असतात.पण का ? तर....लोक काय म्हणतील..!मला समाज काय म्हणेल..!या दोनच विचाराने माणसे मागे राहतात.
    मनिषा दिदी खूपच सुंदर लेख...🙏

    उत्तर द्याहटवा
  3. मॅडम , खरच तुम्ही ही पोस्ट छान लिहिली आहेत, लोकं काय म्हणतील हा विचार धरून ठेवला तर जगण्याची इच्छाच राहणार नाही आणि आपण यश कधीच गाठू शकणार नाही.

    कल्पना चावला, सानिया मीरझा, ऐश्वर्या रॉय यांनी लोक काय म्हणतील याकडे लक्ष दिलं असतं तर कदाचित त्यांची नावे ऐकायला मिळाली नसती

    उत्तर द्याहटवा

कृपया तुमच्या प्रियजनांना लेख शेअर करा आणि तुमचा अभिप्राय जरूर नोंदवा. 🙏 🙏