अंथरूण पाहून पाय पसरावे...

 आपलं अंथरूण पहावं आणि पाय पसरावं


आपल्या समाजात प्रचलित असणारी मराठी 'म्हण'

 " अंथरूण पाहून पाय पसरावे " 

लहानपणापासून म्हणजेच अगदी शाळेत असल्यापासून प्रत्येकानेच कोणत्या ना कोणता वर्गात परीक्षेला, ही म्हण आणि तिचा अर्थ पेपर मध्ये लिहिला आहे.

या म्हणीचा अर्थ आहे, 

" प्रत्येकाने आपली कुवत, आपली ताकद पाहून वागावे ".

आपण शाळा कॉलेज करून मोठे होतो.जबाबदार व्यक्ती म्हणून समाजात वावरायचा प्रयत्न करतो.कष्टही खूप घेतो.स्वप्न पाहतो.काहीतरी ध्येय उरी बाळगतो.त्या ध्येयाचा पाठपुरावा करायचा प्रयत्न करत असतो.यश मिळवायचा प्रयत्न करतो.

एकदा का यश मिळालं, आपलं उचित ध्येय गाठलं की, पुन्हा वेगळी स्वप्न, पुन्हा वेगळं ध्येय, पुन्हा कष्ट, पुन्हा मेहनत.आपल्या आयुष्यात हे चक्र नेहमी सुरूच असतं.

आपल्या स्वप्नांचा, ध्येयाचा पाठपुरावा करत असताना आपण नेहमी ऐकत असतो की, आपलं  "अंथरूण पाहून पाय पसरावे ". 

उदाहरण देऊन सांगायचं झालं तर ,


अंथरूण पाहून पाय पसरावे

New born baby


नुकतंच जन्माला आलेलं बाळ पाहिलं तर रोज मिनिटा मिनिटाला मोठं होत असतं.त्याचं खाणंपिणं ,त्याच्या हालचाली , त्याचं हसणं, त्याचं रडणं, त्याचं आई व बाबांना ओळखणं या सर्वच गोष्टींमध्ये हळूहळू बदल होत जातो.हळूहळू बाळ मोठं मोठं होत जातं. त्याची कुवत , त्याची ताकद हळूहळू वाढत जाते.त्याचं अंथरूण ही हळू हळू मोठं होत जातं.


Weight lifter, hard work

वेट लिफ्टर

ऑलम्पिक मध्ये वेट लिफ्टिंग या प्रकारामध्ये 2000 साली सिडनी येथे झालेल्या स्पर्धेत 69 किलो वजन उचलण्याच्या प्रकारामध्ये करणम मळलेश्वरी यांनी ब्रॉंझ मेडल मिळवून इतिहास रचला.त्यांनी ऑलम्पिक खेळामध्ये सर्वात पहिल्या पदक मिळविणाऱ्या भारतिय महिला म्हणून मान मिळविला.मात्र हा मान मिळविण्यासाठी त्यांना आठ वर्षे वाट पहावी लागली.

सुरुवातीला त्यांनी 48 किलो वजन प्रकारापासून सुरुवात केली.हळू हळू त्यांनी 50 किलो , 56 किलो, 60 किलो आणि शेवटी 69 किलो वजन गटा पर्यंत पोहचल्या.हे करण्यासाठी त्यांना 8 आठ वर्षे लागली.मात्र त्या थांबल्या नाहीत.

खूप सराव करून, खूप कष्ट करून त्यांनी त्यांची ताकद वाढविली.त्यांची कुवत वाढविली.आणि स्वतःला खूप मानाचं ऑलम्पिक पदक मिळविण्यास काबिल बनविलेले.इतरांपेक्षा वेगळा इतिहास निर्माण करण्यास सक्षम बनविलेले. त्यांनी मला हे जमणार नाही, हे करण्याची माझी कुवत नाही, ताकद नाही असा विचार कधीच केला नाही.

त्यांनी स्वतःचे पाय आखडून न ठेवता त्यांनी स्वतःचं अंथरूनच मोठं केलं.स्वतःच्या कमतरता जाणून घेऊन त्यावर मात करत स्वतःला सिद्ध केलं.


Running competition

ऍथलेट्स

स्पर्धा कोणतेही असो, धावपट्टीवर धावणारे ऍथलेट्स काही मिलीसेकंदाने हारले म्हणून पुन्हा पुढच्या स्पर्धेत सहभागी झाल्याशिवाय राहत नाहीत.अगदी काही नॅनो मिलीसेकंदाचा फरक सुद्धा ते जास्तीत जास्त सराव करून त्यांची कमतरता भरून काढतात आणि त्यावर मात करून पदकं मिळवितात.

कुस्ती या खेळ प्रकारामध्ये एखाद्या पैलवान समोर जर तगडा पैलवान कुस्तीला आला आणि त्यामुळे जर तो त्या कुस्तीमध्ये हारला तर तो पैलवान तिथेच थांबत नाही.कुस्ती खेळताना त्याच्याकडून झालेल्या चुका, त्याच्यामध्ये असणाऱ्या कमतरता, नवीन डाव पेच या सर्व गोष्टींचा पुन्हा अभ्यास करून ,स्वतःला परिपूर्ण बनवून पुढच्या वेळेस पुन्हा नव्याने कुस्तीला सज्ज होतो.तो त्याची कुवत वाढवून, त्याची ताकद वाढवून स्वतःला सिद्ध करतो.

पाण्यात पडलेला माणूस हातपाय हलवल्या शिवाय पोहायला शिकत नाही.पोहणे ही आपली कुवत नव्हती, तो आपला गुणधर्म नाही मात्र, हातपाय हलवण्याच्या सरावाने ते शक्य झाले.

प्रगतिच्या मार्गाचा ध्यास घेणाऱ्या प्रत्येकाला कधी न कधी " अंथरूण पाहून पाय पसरावे " हे ऐकायला मिळतं. जर जन्माला आलेल्या बाळाची कुवत, त्याची ताकद ,त्याचं अंथरूण वाढत असेल, मोठं होत असेल तर मग आपण आपली कुवत, आपली ताकद,आपले पाय अखडून त्रास करून घेण्या ऐवजी आपलं अंथरूण मोठं का नाही करू शकत?. आपलं अंथरूण का नाही वाढवू शकत?

आपले पाय पसरण्यासाठी जर अंथरूण छोटं पडत असेल, तोकडं पडत असेल तर, आपलं अंथरूनच का मोठं करू नये ?. आपलं अंथरूणच का वाढवू नये? 

सांगायचा मतितार्थ हाच आहे की, प्रत्येकाने स्वतःमध्ये ज्या काही कमतरता आहेत, जिथं आपण कमी पडतो, जिथं आपल्याला भीती वाटते अशा सर्व गोष्टींचा पुनर्विचार करून  , स्वतःचं अवलोकन करून, स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याची, स्वतःला सुधारण्याची , स्वतःला सक्षम करण्याची संधी दिली पाहिजे.

आयुष्यात प्रगतीच्या मार्गावर, यशाच्या मार्गाने चालत असताना अपयश आलं म्हणून न थांबता, खचून न जाता , निराश न होता आपली ताकद, आपली कुवत वाढविली पाहिजे.स्वतःला सक्षम बनवून सिद्ध केलं पाहिजे.आपली मानसिकता बदलून चौकटीच्या बाहेर जाऊन विचार करायला आणि काम करायला पाहिजे.

लेखन,

डॉ. मनिषा मोरे

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या

कृपया तुमच्या प्रियजनांना लेख शेअर करा आणि तुमचा अभिप्राय जरूर नोंदवा. 🙏 🙏