माझा श्वास गुदमरतोय.....

 गुदमरतोय का माझा श्वास... ??

होतेय  का माझी घुसमट... ??


I can't breath, जगणं अगदी मुश्कील झालं आहे,स्त्रियांची मानसिक घुसमट


स्त्रीयांची असुरक्षितता

आपला श्वास जोपर्यंत चालू असतो तोपर्यंत आपण जिवंत असतो.याच श्वासोच्छ्वासा द्वारे आपल्या शरीरातील नको असणारा, शरिराला अपायकारक असा कार्बनडाय ऑक्सईड बाहेर टाकला जातो आणि आपल्या शरीराला उपायकारक, आपला श्वास सुरू ठेवणारा ऑक्सिजन म्हणजेच प्राणवायू आपण आत घेतो. ही प्रक्रिया नैसर्गिक आहे ही अविरतपणे सुरू राहते म्हणूनच आपण जिवंत असतो.एकदा का ही प्रक्रिया थांबली की मग जर गरज असेल तर कृत्रिम प्रक्रियेद्वारे प्राणवायू दिला जातो.

श्वासाविना माणसाचा जीव गुदमरतो, ही गुदमर, ही घुसमट थांबवण्यासाठी तात्पुरत्या काळासाठी का होईना आपणास कृत्रिम प्राणवायू घ्यावा लागतो.मग औषध पाणी करून आपणास जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला जातो.निसर्गाच्याही चार पाऊले पुढं जाऊन विज्ञानाने आज आपला सर्वात मोठा चमत्कार दाखवला आहे.

माणसाचा श्वास हा सर्वस्वी प्राणवायू वर अवलंबून आहे.श्वास घेण्यास त्रास झाला की माणसाला गुदमरायला लागतं. श्वासाविना होणारी ही गुदमर आपण कृत्रिम श्वासाने भरून काढू पण विचाराने जी गुदमर,घुसमट होते त्याचं काय?

एक स्त्री म्हणून समाजात वावरत असता ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या परिस्थिती / घटना मी रोज पाहते,वाचते, ऐकते किंवा अनुभवते आणि त्यामुळे मनावर खूप मोठे आघात होतात आणि याच विचारामुळे मन सुन्न होतं, मनात खूप साऱ्या विचारांची नुसती दंगल सुरू होते. या  विचारांमुळे होणारी घुसमट आपण कशी रोखू शकतो.यामुळे  श्वास तर गुदमरतोय मात्र ही घुसमट कमी करण्यासाठी कृत्रिम उपकरण उपलब्धच नाही.

ही घुसमट आहे शारीरिक आणि वैचारिक अत्याचारांची.ही घुसमट आहे शारीरिक शोषणाची आणि लैंगिक अत्याचाराची. ही घुसमट आहे मानसिक खच्चीकरणाची.ही घुसमट आहे एका स्त्रीला शारीरिक, मानसिक आणि वैचारिक दृष्ट्या दुर्बल बनविण्याची.ही घुसमट आहे स्त्री पुरुष असमानतेची.

कालच पेपरमध्ये मन सुन्न करणारी, हृदयद्रावक बातमी वाचली.घरातील त्रासाला कंटाळून घर सोडलेल्या एका 65 वर्षाच्या आजीला रात्रीचं एकटं पाहून तिच्या कमजोरी चा फायदा घेऊन एका विकृत हैवानाने एखाद्या रानटी जनावराप्रमाणे अमानुषपणे तिच्या अब्रूचे लचके तोडले.


महिलांची घुसमट


या आजीनं तिच्या या उतार वयात घरात त्रास आहे म्हणून घर सोडून कुठेतरी शांत ठिकाणी जाण्यासाठी निघताना स्वप्नातही विचार केला नसेल की, बाहेर एखादा वैशि-दरिंदा वासनेचा भुकेला लांडगा तिच्या अब्रूची लचके तोडण्यासाठी वाट पाहत बसला असेल.

किती मोठा शारीरिक आणि मानसिक आघात आहे हा!! .या वयात हा आघात सहन करताना तिची किती घुसमट होत असेल!!, तिला शारीरिक आणि मानसिक दृष्टया किती वेदना होत असतील!!, समाजात पुन्हा वावरताना तिचा श्वास नक्कीच गुदमरत असेल!!. या वयातील या आघाताने ती पुन्हा उभी राहू शकेल? 

कोरोना महामारी च्या काळात कडक लॉक डाऊन होता.लोकांच्या मनात कोरोनाची भीती होती.कोरोनाने संपुर्ण जगभरात त्याच्या क्रूरतेची दहशत माजवली होती.त्यामुळे आपला देशच नव्हे तर संपूर्ण जगभरातील लोकांना घरी बसून राहावं लागलं.लोकांना आपल्या कुटुंबा सोबत जास्तीत जास्त वेळ मिळाला.

आपण नेहमी म्हणतो घराच्या बाहेर पडल्यावर स्त्री असुरक्षित आहे.मात्र कोरोना काळात जवळजवळ तीन चार महिने सर्व लोकं आपापल्या घरीच बसून होते.घरात रहा तरच सुरक्षित रहाल असा संदेश सरकारने दिला.घरी राहून कोरोनाच्या संक्रमना पासून आपण स्वताला सुरक्षित केलं. स्त्रियांना कोरोना पासून सुरक्षितता मिळाली खरी मात्र तिच्यावरील शाब्दिक,शारीरिक, लैंगिक आणि मानसिक अत्याचार मात्र वाढले. 

कोरोना काळात सोशल मीडियावर एक आकडेवारी व्हयरल झालीय त्यामध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे की, कोरोना काळातील चोरीच्या,खुनाच्या आणि खंडणीच्या गुन्ह्यांची एकही नोंद नाही मात्र घरगुती हिंसाचाराच्या एकूण 87435 बळींची नोंद आहे.

पनवेल क्वारंटाईन सेंटर मध्ये 17 जुलै ला एका महिलेवर बलात्कार झाला, 20 जुलै ला सिंहगड क्वारंटाईन सेंटर मध्ये एका सुरक्षा रक्षकाने एका महिलेचा विनयभंग केला, पुण्यातील एका हॉस्पिटलमध्ये एका वॉर्डबॉय कडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग, मीरा भाईनदर कोविड सेंटर मध्ये एका महिलेवर बलात्कार, महाराष्ट्रातील बऱ्याचशा कोविड सेंटर मध्ये एखादी दुसरी अल्पवयीन मुली आणि महिलांचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे.बलात्काराची घटना घडली आहे.

असे एक ना अनेक कितीतरी उदाहरणे घेता येतील जिथं स्त्रीचं अस्तित्व म्हणजे फक्त एक वासनेचं, भोगाचं साधन बनलं आहे.अर्थात सगळीच लोकं वासनेच्या आहारी गेलीत असं नाही, चांगुलपणा आजही जिवंत आहे. मात्र समाजामध्ये जी काही विकृत घाण  आहे या घाणीमुळं चांगुलपणा अगदी पुसट व्हायला लागला आहे.चांगुलपणा वरचा विश्वास मात्र कमी होत चालला आहे.

कसा राहील चांगुलपणावर विश्वास जिथं तिच्या रक्ताची नातीच तिला ओरबाडून,तिच्या अब्रूचे लचके तोडून ,तिच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगतायत हे डोंब कावळे!!. आणि वासनेची भूक भागली की तिचं हाल हाल करून पेटवून देऊन तिला मारून तरी टाकतायत नाहीतर आयुष्य भरासाठी मरण यातना भोगण्यासाठी सोडून देतायत.

किती गोष्टींचं ओझं आहे स्त्रियांच्या मनावर.ती शारीरिक दृष्ट्या सुरक्षित नाही, लैंगिक दृष्ट्या सुरक्षित नाही, ती मानसिक दृष्ट्या सुरक्षित नाही, ती भावनिक दृष्ट्या सुरक्षित नाही.ती घरीही सुरक्षित नाही  आणि बाहेरही सुरक्षित नाही.

या असुरक्षिततेनं तिच्या मनावर जो खोल आघात होत आहे या आघाताने , या डोंब कावळ्यांच्या भीतीनं, लोकांच्या वाईट नजरेने, बाहेर पडण्याच्या भीतीनं म्हणजेच लोकं काय म्हणतील या भीतीनं, घरा दाराच्या,संसाराच्या, मुलाबाळांच्या जबाबदारीच्या ओझ्यानं तिची खूप घुसमट होत आहे.या सर्व विचारांच्या वादळाने तिला श्वास घेणंही मुश्किल झालं आहे.आणि म्हणूनच ती सर्वाना सांगत आहे , " माझा श्वास गुदमरतोय " , " माझी घुसमट होतेय " .

या घुसमटीपसून मला वाचविण्यासाठी आणि शारीरिक, मानिसक व भावनिक दृष्ट्या सबल बनविण्यासाठी मला गरज  आहे भरपूर प्राणवायूची.हा प्राणवायू म्हणजे तुमचा विश्वास, तुमचा चांगुलपणा, तुमचा आधार, तुमचं निस्वार्थीपणे केलेलं प्रेम, तुमची समानतेची भावना, तुमचा माझ्याकडे बघण्याचा सरळ आणि शुद्ध दृष्टिकोन आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुरक्षित वातावरण जिथं मला बाहेर पडताना कुठल्याही प्रकारचं दडपण किंवा ताण नसेल. माझ्यासाठी जोपर्यंत सुरक्षित वातावरण निर्माण होत नाही तोपर्यंत वर्षानुवर्षे माझी अशीच घुसमट होत राहील. माझा श्वास असाच गुदमरेल. 😥 😢



लेखन,
डॉ. मनिषा मोरे
व्हाट्सएप 9511775185


टिप्पणी पोस्ट करा

4 टिप्पण्या

  1. खरच आहे मॅडम बदल घडला पाहिजे स्त्रीया बाबत

    उत्तर द्याहटवा
  2. Khup sundar nandni keli.striyanchya vril atyachaar divsendivs vadhtach challet

    उत्तर द्याहटवा
  3. खरंच किती संयत शब्दात घुसमट व्यक्त केली आहे. सर्वांनीच एकमेकांचा आदर करायला हवा. स्त्रियांना दुय्यम दर्जा न देता त्यांना सर्व निर्णयप्रक्रियेत सामील करून घ्यायला हवं तरच बदल घडू शकेल. मानसिकता बदलायला हवी यासाठी जे प्रबोधन गरजेचं आहे ते लेखातून व्यक्त झालंय. अशाच नेहमी लिहित रहा..!व्यक्त होत रहा...!

    उत्तर द्याहटवा

कृपया तुमच्या प्रियजनांना लेख शेअर करा आणि तुमचा अभिप्राय जरूर नोंदवा. 🙏 🙏