स्त्री जन्म म्हणोनि न व्हावे उदास


 स्त्री जन्म म्हणोनि न व्हावे उदास

             

स्त्री जन्मा तुझी कहाणी

स्त्रीजन्मा ही तुझी कहाणी
   हृदयी अमृत, नयनी पाणी ।।


तू सरस्वती, तू लक्ष्मी, तू दुर्गा, तू काली आणि तूच चंडी. तू एक देवी आहेस जिथं सर्व मनुष्यप्राणी तुझ्या पायावर मस्तक ठेवण्यासाठी आतुर असतात. देवीच्या रूपातही तू कधी प्रेमळ,तर कधी रागीट. वेळोवेळी तू दैत्य आणि दानव दोघांनाही आपापली जागा दाखवून देतेस.

तू मुलगी, बहीण, पत्नी, सून, तूच आई अन तूच सासू अश्या एक ना अनेक नात्यांची तू एक मजबूत गुंफण आहेस. तू एक न तुटणारं प्रेमाचं वलय आहेस. प्रेमााच्या जाळ्यात तू सर्वांना जोडून ठेवते. हृदयात तुझ्या सर्वांसाठी सदैव प्रेम भरलेलं आहे. एवढं सगळं असूनही तुझ्या डोळ्यात नेहमी अश्रू का? तू उदास का?


पोटी अवतरती नर
अन्यायच ते करिती तुझ्यावर
दासी म्हणूनि नमविती चरणी।।


खरंतर स्त्री असो किंवा पुरुष त्यांची निर्मिती ही स्त्रीच्या उदरातूनच होते.स्त्री शिवाय पुढील वंश वाढ मुळीच होऊ शकत नाही.निर्मितीसाठी तिला अनन्यसाधारण असं महत्व आहे मग ते महत्व तिला का दिलं जात नाही?.

अगदी पुरातन काळापासून चालत आलेल्या रूढी परंपरेच्या विळख्यात तिला अडकवून ठेवलं आहे. पुरुषप्रधान संस्कृती चा पगडा असणाऱ्या आपल्या समाजात तिच्यावर शारीरिक, लैंगिक, भावनिक, मानसिक अत्याचारच का होतायत?. तिच्यावर स्त्रीपुरुष असमानतेचा, वैचारिक असमानतेचा अन्यायच का बरं होत आहे? तिला अगदी दासी म्हणून का बरं वागवलं जात आहे?.

अर्थात समाज बदलला, समाज सुधारित झाला. लोकं शिकली. लोकांच्या विचारात प्रगल्भता आली. स्त्रीही शिकली.उच्चशिक्षित झाली. 'मुलगी शिकली प्रगती झाली' हे खरंच आहे. एक मुलगी म्हणून , एक स्त्री म्हणून, एक नारी म्हणून ती कुठेही कमी नाही. प्रत्येक क्षेत्रात तीनं तिच्या बुद्धिमत्तेनं स्वतःचं अस्तित्व सिद्ध केलं आहे.

आज ती स्कुटर पासून ते हवाई जहाज, रेल्वे, ट्रक, ट्रॅक्टर, सर्व प्रकारची वाहनं चालवत आहे. आज ती आर्मी, नेव्ही, हवाई दल, पोलीस, मेडिकल, इंजिनिअरिंग, संशोधन, राजकारण आणि समाजकारण या सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहे.

हे सगळं जरी असलं तरीही आज स्त्री सुरक्षित नाही.आज ती फक्त चूल आणि मूल न करता घराबाहेरील अजून बऱ्याच जबाबदाऱ्या पार पाडत आहे. मात्र ना ती घरात सुरक्षित आहे ना ती घराबाहेर सुरक्षित आहे. 


 कुशीत तुझिया पुरुष धुरंदर
अबला परी तू ठरीसी जगावर
दशा तुझी ही केविलवाणी ।।


पुरुष कितीही धुरंधर असला तरीही तुझ्याशिवाय त्याचं अस्तित्व शून्य आहे.तरीही या समाजामध्ये तू एक अबलाच आहे. आपल्या समाजामध्ये पुरुषाला जितकं महत्त्व दिलं जातं तितकं महत्व आजही 21 व्या शतकात स्त्रीला दिलं जात नाही. या समाजामध्ये तुझी दशा अगदी केविलवाणी झाली आहे.

रोज वर्तमानपत्र उघडलं की कित्येक स्त्रियांच्या लैंगिक शोषणाच्या, शारीरिक अत्याचाराच्या बातम्या वाचायला मिळतात. आज विज्ञानाच्या जोरावर, तंत्रज्ञानाच्या जोरावर माणसानं खूप मोठी प्रगती केली आहे. पृथ्वीवरच नव्हे तर चंद्रावर, मंगळावर देखील आपले पाय रोवले आहेत. यामध्ये स्त्रियांचाही मोलाचा वाटा आहे. 

बंद पडलेल्या हृदयाला सुद्धा पुन्हा सुरू करण्यास तांत्रिक दृष्ट्या ताकदवर असणारा माणूस स्त्रियांच्या बाबतीत मात्र तिला नेहमी अबला मानून तिच्यावर अन्यायच करत राहिला.

आणि म्हणूनच ती उदास आहे.ती कधी कधी  विचार करते की, तिला बाईच्या जन्माला का घातलं?. एकीकडे स्त्रीला देवीचं स्थान देऊन तिची पूजा केली जातेय आणि दुसरीकडे मात्र त्याच स्त्रीची विटंबना केली जातेय. तिला शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. तिचं लैंगिक शोषण केलं जात आहे. घरात आणि घराबाहेर सतत तिला भीतीयुक्त, तणावपूर्ण वातावरणात जगावं लागत आहे.

हे माते, हे सखी, हे मैत्रिणी, हे भगिनी तू नाहीस तर मनुष्यप्राण्याचं जन्म आणि मृत्यूचं चक्र पूर्णच होऊ शकत नाही. तू नाहीस तर नवीन जीव निर्मितीच नाही एवढं महत्व आहे तुझं. तुझ्या उदराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कृत्रिम प्रक्रिया करून मनुष्यजीव निर्मिती केली जाऊ शकते मात्र तो जीव पूर्ण वाढण्यासाठी पुन्हा तुझ्या उदराचीच गरज लागते. तंत्रज्ञानाच्या जोरावर सर्व काही करू पाहणारा मनुष्य नवीन जीव निर्मिती साठी सर्वस्वी तुझ्यावरच अवलंबून आहे. 

त्यामुळे स्त्री जन्म मिळाला म्हणून तू उदास होता काम नये. तुला गर्व असला पाहिजे तू स्त्री असल्याचा. समाज कसाही असो, परिस्थिती कितीही भयानक असो, कितीही तणावपूर्ण वातावरण असो, तुझं महत्त्व कधीच कमी होऊ शकत नाही. तुझं महत्व कमी करण्याची ताकत ना मनुष्यात आहे ना विज्ञानाच्या जोरावर तयार केलेल्या तंत्रज्ञानात आहे. कितीही धुरंदर पुरुष असो शेवटी त्याला त्याचा वंश वाढविण्यासाठी तुझ्याच पाया पडावं लागणार आहे. तुला मिळालेल्या अनमोल देणगीचा तुला गर्व असला पाहिजे, तुला सार्थ अभिमान असला पाहिजे. 

आणि म्हणूनच ,

" स्त्री जन्म मिळाला म्हणोनि न होणे उदास "




लेखन,
डॉ. मनिषा मोरे
व्हाट्सएप 9511775185




टिप्पणी पोस्ट करा

4 टिप्पण्या

  1. सर्वप्रथम आपण स्त्री जन्मावर, स्त्रियांची होणारी भारतीय पुरुष प्रधान संस्कृतीत हेडसाड यांवर जोरदार सणसणीत आघात करून स्त्रीवर्गाची समाजात होणारी कुचंबना, अपमान,अत्याचार या गोष्टीवर भर घालून जगासमोर स्त्रीमनाची दबलेली मुकी वेदना जगासमोर मांडण्याचा लेखणीतून प्रामाणिक प्रयत्न केला आहे.
    हजारो वर्षापासून जगात चालत आलेली स्त्रीजाती विषयी मानसिक गुलाम करून ठेवायची प्रथा, यांच्यावर सकारात्मक विचारांच्या लेखणीतून जणूकाही न्याय मिळवून देण्यासाठी बंड चं कंबर कसून पुकारले आहे. जगाची निर्मिती जरी विधात्याने केली असली तरी!, खरी जगाची उत्पत्तीला,मानवाच्या वंशवेलीला वाढविण्यासाठी स्त्रीचं मोठं महान योगदान आहे. डोळ्याला न दिसणारा नवीन जीव जेव्हा स्त्रीच्या गर्भात आनंदाने वाढत असतो.तेव्हा स्त्रीला आभाळभर असा लाख मोलाचा गगनाला लाजवेल असा द्विगुणित आनंद होतो.

    नऊ महिने अळणी-खार खाऊन,पोटात सांभाळून या जगात त्या जीवाला जन्म देऊन

    उत्तर द्याहटवा
  2. खऱ्या अर्थाने मानवाचा उद्गार करते. स्त्रीला हवी आहे मुक्तपणे सुंदर विचाराचं जगणं, पण आज समाजात जे वातावरण बघायला मिळत आहे ते फार भयानक ,विदारक सत्य आहे. बुरसटलेल्या विकृत विचारांना गर्विष्ठ पुरुषप्रधान वर्ग आज गुलामीच्या साखळीत स्त्रीला जखडुन पाहत आहे. तिच्यावर होणारे अत्याचार, अन्याय,बलात्कार, यांची साधी पुरूष वर्ग मनापासून दखल घेत नाही आहे.

    स्त्रियांची विचारांच्या भावनांची कुणीच दखल घेत नाही याची खूप मोठी शोकांतिका समाजात उभी झाली आहे. जगातील प्रत्येक स्त्रीवर्गाला जो पर्यंत प्रत्येक बाबतीत सन्मान, आदर भेटत नाही तो पर्यंत तिच्या मुक्या दबलेल्या वेदनेला जगात किंमत नाही असे मला आपला लेख वाचतांना जाणवते.
    समाजातील स्त्रीवर्गाला उद्देशून, त्याच्या वास्तविक जीवनात घडलेल्या वेदनामय प्रसंगाची लेखणीतून तुम्हीं बाजू मांडून न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयन्त केला आहे.
    मनापासून आपले लिखाण आवडले. आशा करतो की, लवकरात लवकर पुढील लिखाण तुमचं वाचण्यात मिळावे.

    आपलाच वाचक वर्ग
    महेश भामरे, वांद्रे मुंबई.

    उत्तर द्याहटवा

कृपया तुमच्या प्रियजनांना लेख शेअर करा आणि तुमचा अभिप्राय जरूर नोंदवा. 🙏 🙏