बाबा मी आहे ना तुमचा भार हलका करायला... !!

 भोळ्याभाबड्या आईवडिलांची आशा...


कधीतरी आपल्या मुलांच्या कडून ऐकायला मिळेल की बाबा तुम्ही काळजी करू नका, 

मी आहे ना तुमचा भार हलका करायला...!!


आईवडिलांचे मनोगत, व्यथित असणारे भोळेभाबडे आईवडील


मुलगा असो किंवा मुलगी असो आईबापाचं एकच स्वप्न असतं, मुलांना सुखासमाधानात वाढवायचं, खूप शिकवायचं, त्यांनी एवढं मोठं झालं पाहिजे की, मुलांची ओळख आईबापामुळं नाही तर आईबाप मुलांच्या नावाने ओळखले गेले पाहिजेत. यासाठी मग कितीही कष्ट उपसायला लागले तरी चालेल, कितीही हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या तरी चालेल.

आणि हे खरं आहे. आईबाप सुशिक्षित असो किंवा अडाणी, गरीब असो किंवा श्रीमंत प्रत्येक बाईबापाला हेच वाटत असतं. त्यांची सर्व धडपड फक्त आणि फक्त आपल्या मुलाबाळांच्या सुरक्षित भविष्यासाठी सुरू असते. सुशिक्षित आणि नोकरदार श्रीमंत आईबापासाठी हे थोडं सोपं असतं. मुळातच ते शिकलेले आणि पैसा कमावणारे असतात. त्यामुळे मुलांना सांभाळणं, त्यांना चांगलं आयुष्य देणं, चांगलं शिक्षण देणं एवढं जड नाही जात.

याउलट अशिक्षित, गरिबीने ग्रासलेला,  कायम आठराविश्व दारिद्र्यात असणारा माझा आईबाप त्याच्या पोटाची खळगी भरता भरता नाकी नऊ झालेला माझा आईबाप, निसर्गाच्या बेभरवशावर शेती पिकवणारा माझा आईबाप, उन्हातान्हात अनवाणी पायाने काबाडकष्ट करणारा माझा आईबाप त्याचीही हीच धडपड असते की माझं आयुष्य माझ्या मुलांच्या वाट्याला यायला नको.

कधी जेवायला पुरेसं नसलं तर स्वतः उपाशी राहतील मात्र पोरांना कधीच उपाशी ठेवत नाहीत. स्वतःचं दुखणं अंगावर काढतील मात्र आपल्या मुलांना थोडा जरी त्रास होत असेल तर लगेच त्यांच्या डोळ्यात अश्रू जमा होतील. पैसे असो किंवा नसो लगेच डॉक्टर कडे घेऊन जातील. त्यांचं मूल आजारी पडलं तर दोघांनाही चैन पडत नाही. त्याला उपचारासाठी गावातल्या डॉक्टरला न दाखवता बाल रोग तज्ज्ञांकडे घेऊन जातात. मग तो डॉक्टर कितीही महागडा असला तरी चालेल. 

आपल्या पोरांच्या शिक्षणासाठी अहोरात्र कष्ट करून पैसे जमवतात. त्यानं शिकून इंजिनिअर बनावं, डॉक्टर बनावं, कलेक्टर बनावं, वकील बनावं, लाल दिव्याच्या गाडीतून फिरावं एवढीच मापक इच्छा, आशा, स्वप्न मनी बाळगून ते कष्ट उचलतात. 

खरंतर वयाची अठरा ते वीस वर्षे मुलांना शिकवण्यासाठी, संस्कार देण्यासाठी असतात. त्यानंतर मात्र आपली घरची, आईवडिलांची परिस्थिती बघून , आईवडिलांचं कष्ट पाहून त्यांच्यासाठी राहू दे मात्र स्वतःसाठी, स्वतःच्या भविष्यासाठी काहीतरी स्वप्न, ध्येय उराशी बाळगली पाहिजेत. आईवडिलांनी वेचलेल्या कष्टाचं काहीतरी चिज करून दाखवलं पाहिजे.

ही सत्य घटना आहे अशाच एका आईवडिलांची ज्यांनी आपल्या मुलीला वाढविण्यासाठी जीवाचं रान केलं. ऊन, वारा, पाऊस कशाचीही पर्वा केली नाही. शेतातून भरपूर उत्पन्न निघालं तर भरपूर पैसा मिळेल आणि त्या पैशातून आपल्या मुलींचं शिक्षण पूर्ण होईल ह्या आशेनं हे आईवडील रोज रात्रीचा दिवस करून कष्ट करत होते.

आपल्या मूलीला नाजूक फुलाप्रमाणे जपत होते. दुःखाची, कष्टाची, गरिबीची झळ तिच्यापर्यंत कधीच पोहचू दिली नाही. कितीही आजारी असले तरी त्यांचे हात कधीच थांबले नाहीत. लागेल तेवढा पैसा घालायला तयार होते. स्वप्न फक्त एकच होतं ,' आपलं दुःख, आपण घेतोय ते कष्ट, आपलं आयुष्य आपल्या पोरीच्या वाट्याला येऊ नये. तिनं खूप शिकावं आणि समाजात नाव करावं एवढंच स्वप्न उराशी बाळगून हे आईवडील अहोरात्र मेहनत घेत होते, कष्ट करत होते.

याच आईवडिलांची मुलगी दिसायला खूप सुंदर आणि हुशारही. मात्र अल्लड वयात झालेल्या प्रेमाला बळी पडली. तिला ते प्रेम म्हणजे आनंद व सुख वाटायला लागलं. चोरून चोरून केलेलं हे प्रेम आईवडिलांच्या लक्षात आलं. त्यांना फार दुःख झालं. आपल्या मुलीनं शिकावं, शिकून आईवडिलांचं नाव मोठं करावं हे स्वप्न बघणारा आईबाप आपलं नाव धुळीला मिळवायला निघालेलं पाहून जगावं की मरावं असं झालं. 

कष्टाची पर्वा कधीच न करणारा आईबाप इज्जतीला मात्र खूप जपत होता. त्यांचे विचार म्हणजे, 'स्वतःचं खा आणि गावाचं का नावं ठेवून घ्या' अशा विचारधारेचा आईबापा हे कळल्यावर त्याला मेल्याहून मेल्यासारखं झालं. शिक्षण घेण्याच्या वयात आपल्या पोरीचं लक्ष नको तिथं गुंतलेलं आहे आणि यातून तिला बाहेर काढलं पाहिजे नाहीतर तिचं पुढील आयुष्य खूप कष्टात जाईल,भविष्यात तिला खूप त्रास होईल, खूप पश्चाताप होईल मात्र तेंव्हा वेळ निघून गेलेली असेल या विचाराने त्यांचा जीव तीळ तीळ तुटत होता. 

हिला मात्र त्याचं काहीही देणं घेणं नव्हतं. तिला खूप समजावून पुढं शिकायला घातलं.कॉलेज ला पैसे भरले. ती कॉलेज ला जायला लागली.थोडे दिवस गेले मात्र ती पुन्हा त्या मुलासोबत बोलताना सापडली. बारावी चं महत्वाचं वर्ष त्यासाठी भरलेली फी आणि आईवडिलांनी घेतलेलं कष्ट सगळं वाया गेलं. अफाट कष्ट करून शिक्षणासाठी घातलेल्या पैश्याचं काहीच चिज झालं नाही. 

बारावी हे आपल्या आयुष्यातील महत्वाचं वळण.आपलं पुढील सर्व करियर यावरच अवलंबून आहे या गोष्टीची कल्पना असून सुद्धा आणि बारावीला चांगली गुणवत्ता मिळविण्याची धमक असून सुद्धा पोरीनं बारावीचं वर्ष वाया घालवलं. स्वतःचं नुकसान करून घेतलं. 

आपल्या पोरीला शिकवायचं आणि खूप मोठं करायचं या हट्टाला पेटलेला आईबाप तिची समजूत काढून पुन्हा पुढील कोर्स ला फी भरण्यासाठी तयार झाला. दोघेही खूप भाबडे. पदरी वंशाचा दिवा म्हणजेच मुलगा नाही ह्या गोष्टीची खंत न बाळगता आपल्या मुलींमध्येच मुलगा शोधून त्यांना वाढवत होता. आजूबाजूच्या मुली शिकताना, नोकऱ्या करताना पाहून त्यांना खूप आनंद व्हायचा. त्यांच्या जागी ते आपल्या पोरीला पहायचे. म्हणून तर जे काही झालं ते सगळं विसरून पुन्हा नव्याने सगळं करायला ते तयार व्हायचे.

आमच्यासारखं तिचंही आयुष्य मातीत जाऊ नये, आमच्यासारखं तिला उन्हातान्हात काबाडकष्ट करायला लागू नये या काळजीनं व्यथित असणारे आईवडील पुन्हा पोरीला शिकविण्यासाठी तयार व्हायचे. पुन्हा पैसा ओतायला तयार व्हायचे. मुलगी मात्र काही सुधारायचं नाव घेत नव्हती. आईवडिलांच्या इच्छा, स्वतःची शिक्षणाची स्वप्न, करीयरचं द्येय हे सगळं विसरून फक्त प्रेमाच्या फसव्या मृगजळाच्या मागे धावून आयुष्य मातीमोल करायला निघाली आहे. आईबापाला हे कळून चुकलंय म्हणूनच तर त्यांचं अंतःकरण दुःखी आहे. 

ह्या पोरीला आईवडिलांच्या कष्टाचं काहीच मोल नाही. तिचं असं झालंय की, सगळं जग घालतं पोरांना जन्माला तुम्ही काय वेगळं केलं? सगळं जग आपल्या पोरांना मोठं करतं तुम्ही काय वेगळं केलं? सगळं जग आपल्या पोरांसाठी कष्ट झेलतं तुम्ही काय वेगळं केलं?. कालपरवा प्रेमात पडलेल्या पोरासाठी एकोणिस वीस वर्षे आईवडिलांनी निस्वार्थीपणे केलेल्या प्रेमाची काहीच किंमत नाही.  

ह्या आईवडिलांना त्यांनी अहोरात्र घेतलेल्या कष्टाचं काहीच वाटत नाही. त्यांना फक्त आपल्या मुलीचं उज्वल भविष्य पहायचं आहे. मुलगी आपली शिकेल, खूप मोठी होईल, समाजात एक वेगळी ओळख निर्माण करेल, चार माणसात तिचा रुबाब उठून दिसेल आणि हे सगळं पाहून आईवडिलांचा ऊर अभिमानाने भरून येईल. समाजात आपली कॉलर एकदम ताठ होईल हीच एक भोळी भाबडी आशा आहे. 

उद्या हेच माझे झिजलेलं हात, बोटभर भेगा पडलेले पाय, कामा कामाने पडलेले हातापायाचे घट्टे, उन्हाने करपलेली त्वचा, मर मर काम करून झिजलेली काया हे सगळं तिला दिसेल का...? आणि आईवडिलांनी केलेल्या कष्टाची परतफेड म्हणून "बाबा मी आहे ना तुमचा भार हलका करायला",  जसं एखादा मुलगा आपल्या आईवडिलांना एक जबाबदार मुलगा या नात्याने म्हणतो त्याप्रमाणे कधीतरी आपली मुलगीही म्हणेल या एका आशेवर तिची पुन्हा पुन्हा समजूत काढून पुन्हा नव्याने तिच्या शिक्षणासाठी पैसा ओतायला तयार होणारे हे आहेत,

भोळे भाबडे आईवडिल



लेखन,

डॉ. मनिषा मोरे

व्हाट्सएप 9511775185

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

कृपया तुमच्या प्रियजनांना लेख शेअर करा आणि तुमचा अभिप्राय जरूर नोंदवा. 🙏 🙏