उमलण्या आधीच नष्ट झाल्या नाजूक कळ्या...

 उमलण्या आधीच..... 


भांडाऱ्यात शिशु केयर युनिट ला आग


आपल्या बाळाच्या फक्त येण्याच्या चाहुलीनं  एका स्त्रीचा आनंद गगनात मावत नाही तर त्याचा जन्म झाल्यावर, त्याला या जगात, आपल्या कुशीत घेतल्यावर तिला किती आनंद झाला असेल हे फक्त एका आईलाच समजू शकतं. अगदी पहिल्या महिन्यापासून काय खायचं, काय नाही, कसं उठायचं, कसं बसायचं, कधी औषध घायचं या सगळ्याची जणू स्वतःला बंधनं घालून घेते ती. 

सगळ्या गोष्टी वेळीच करून स्वतःला निरोगी ठेवायचा प्रयत्न करत असते ती. आई निरोगी तर तिच्या उदरात वाढत असणारं तिचं पिलू निरोगी. अगदी छोटासा मांसाचा गोळा ते बाळाचा संपुर्ण आकार या वेगवेगळ्या टप्प्यांध्ये बाळाची तिच्या उदरात वाढ होत असते. हळूहळू बाळाच्या हालचाली सुरू होतात. हालचाली वाढत वाढत पुढे एक दिवस तिचं ते पिलू जोरात किक मारून आईच्या उदरातील त्याचं अस्तित्व दाखवून देतं. हे त्याचं अस्तित्व नऊ महिने होईपर्यंत टिकून राहतं. 

हे तिचं पिलू नऊ महिने सगळ्यात सुरक्षित त्याच्या आईच्या उदरात असतं. विधात्याने आईच्या उदराची रचनाच मुळात अशी केली आहे की, बाहेरच्या जगाची कुठलीच असुरक्षिततेची झळ त्यांच्यापर्यंत सहजा सहजी पोहचत नाही. 

बाळाला जन्म देणं म्हणजे स्त्रीचा पुनर्जन्म होतो असं म्हणतात. अगदी बरोबर आहे. प्रसूती कळा म्हणजे जणू मरणकळा असतात. विधात्याने स्त्रीला इतकं मजबूत केलं आहे की कितीही तासांच्या त्या मरणकळा असो ओरडत, ओरडत सगळ्या कळा सहण करते ती फक्त आपल्या पिलाला या जगात आणण्यासाठी. एकदा का तिचं पिलू या जगात आल्या आल्या मोठ्यानं किंकाळी फोडतं ते ऐकून तिच्या प्रसूतीच्या झालेल्या वेदना नाहीशा होतात. ती नाजूक , मऊ , गोरीगोमटी ईवलीशी पावलं पाहून तिचा प्रसूतीचा सगळा शीण क्षणार्धात नाहीसा होतो.

आपल्या पिलाला कुशीत घेऊन आपल्या छातीशी घट्ट कवटाळताना तिला जो आनंद मिळतो तो जगातील कुठल्याही आनंदापेक्षा मौलिक असतो. हा आनंद जगातील कुठल्याही मौल्यवान वस्तू पेक्षा, गडगंज संपत्ती पेक्षा मौलिक आहे. या सुखाची तुलनाच होऊ शकत नाही आणि हे सुख सगळ्यांच्या वाट्याला येतंच असं नाही. हे सुख फक्त आईच्या वाट्याला येतं.

हीच सुखावलेली आई जेव्हा आपल्या पिलाला बिलगते आपल्या छातीला लावते तेंव्हा तिची पान्हालेली छाती आपल्या पिलाला भरवण्यासाठी दाटून येते. भरून वहायला लागते. एवढं घट्ट नातं असतं आईचं आणि तिच्या बाळाचं.

भंडारा जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयात शॉर्ट सर्किट मुळं लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांचा मृत्यू झाला. का झालं, कशामुळे झालं, कुणामुळे झालं, दोषी कोण हे सगळं होईल मात्र हे केल्यानं ह्या नाजूक कळ्या ज्या उमलण्या आधीच नष्ट झाल्या, ही निरागस पाखरं उडण्या आधीच जमीनदोस्त झाली ते तर परत येणार नाहीत ना?.  कोण 1 दिवसाचं, कोण 2 दिवसाचं, कोण 12 दिवसाचं तर कोण नुकतंच जन्मलेलं. एका आईचा जीव, तिचं काळीज, तिच्या काळजाचा तुकडा तर दूर निघून गेला तिनं आता फक्त तिच्या पिलाच्या आठवणींवर जगायचं. 

विधात्याने या पिलांचं आयुष्य एवढंच का लिहिलं?. एका आईला तिच्या आईपणाचं सुख, तिच्या मातृत्वाचं सुख का बरं भोगू नाही दिलं?. त्या कोवळ्या निरागस, निष्पाप पिलाला आपल्या आईच्या कुसीची ऊब का बरं लागू नाही दिली?. तो एवढा का निष्ठुर झाला की, उमलण्या आधीच त्यांना नष्ट करून टाकलं. 

भावपूर्ण श्रद्धांजली 

🌹🌹🌹🌹

भंडारा जिल्ह्यातील शॉर्टसर्किट मुळं मृत्यूमुखी पडलेल्या नवजात, निष्पाप, निरागस, कोवळ्या पिलांना भावपूर्ण श्रद्धांजली 🌹🌹🌹🌹

तसेच या पिलांच्या आयांना या हृदयद्रावक, काळीज पिळवटून टाकणाऱ्या या घटनेतून लवकरच बाहेर पडण्यासाठी व थोडंस सावरण्यासाठी बळ मिळू दे म्हणून ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏


लेखन,

डॉ. मनिषा मोरे

व्हाट्सएप-  9511775185



टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या

कृपया तुमच्या प्रियजनांना लेख शेअर करा आणि तुमचा अभिप्राय जरूर नोंदवा. 🙏 🙏