माणूस किती जगला यापेक्षा कसा जगला हे महत्त्वाचं!!
माणूस हा सतत सुखाच्या शोधात फिरत असतो. काय आहे हो हे सुख? सुख म्हणजे नक्की काय?? खरं तर प्रत्येकाच्या सुखाच्या संकल्पना वेगळ्या आहेत. कोण दोन वेळचं पोटाला खायला मिळालं की खुश होतो, कोणी मुलं बाळं संसार यामध्ये आपलं सुख मानतो. कोणी चांगली नोकरी मिळालं की आनंदी होतो, सुखी होतो. प्रत्येक जण आपापल्या परीने आपलं सुख शोधत असतो.
आपण मृगजळाच्या मागे धावता धावता आपल्या आयुष्यात जे आनंदाचे क्षण येतात ते मात्र जगायचं राहूनच जातो. सुखाच्या मागे धावता धावता आपल्या हातून हे आनंदाचे क्षण कधी निसटून जातात हे कळत देखील नाही.
आपल्या आयुष्याचा काहीच भरोसा नाही. जगातील कोणीही हे सांगू शकत नाही की त्याचं आयुष्य किती असणार आहे. आज आपण आहोत, आजचा दिवस आपण पाहिला आहे हे देखील खूप महत्त्वाचं आहे. देवाचे खरं तर आभार मानले पाहिजेत.
मात्र हाच जो आज आपल्या आयुष्यात आला आहे हा आज आपण उद्याचा विचार करण्यात घालवतो आणि खूप महत्त्वाचे व आनंदाचे क्षण आपल्या हातून निसटून जातात हे आपल्याला कळतच नाही.
आपण आपल्या कामात इतके व्यस्त होतो की आपली फॅमिली, सगे सोयरे, नातेवाईक या सर्वांना विसरून जातो. उदाहरणच द्यायचं झालं तर मी एक खूप छान उदाहरण देईन,
एकाच ऑफिसमध्ये काम करणारे सहयोगी एकमेकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, प्रमोशन च्या शुभेच्छा व्हाट्सएपच्या माध्यमातून देत आहेत. मान्य आहे की टेक्नॉलॉजी एवढी प्रगत झाली आहे की आपण जगाच्या कानाकोपऱ्यात असणाऱ्या व्यक्तीशी काही सेकंदात संपर्क साधून आपलं काम करू शकतो, कोणत्याही विद्यार्थ्यांना कोणत्याही विद्यापीठातुन ऑनलाइन शिक्षण घेता येत आहे. संपूर्ण जगाची व्हर्चुअल टुअर अगदी घर बसल्या करू शकतो.
हे सर्व जरी शक्य झालं असलं, संपूर्ण जग वर्चुअली आपल्या जवळ जरी असलं तरी एक कटू सत्य हे आहे की आपल्या जवळची लोकं मात्र तनाने आणि मनाने आपल्या पासून लांब गेलीत. सोशल मीडिया, व्हाट्सएपच्या च्या माध्यमातून एकमेकांशी संपर्क साधू लागली.
प्रत्यक्षात भेटी गाठी कमी होऊन व्हर्चुअल भेटी गाठी वाढल्या. हे का होत आहे तर आज माणसाकडे त्याच्या लोकांना देण्यासाठी वेळच नाही. एक गोष्ट मिळाली की दुसऱ्या गोष्टीच्या मागे, दुसरी गोष्ट मिळाली की तिसरी गोष्ट आणि ही लिस्ट आपण आहोत तोपर्यंत संपतच नाही.
याचं कारण हेच आहे की आपण जे काही मिळालं आहे त्यात कधीच समाधानी नसतो, आनंदी नसतो. सतत नव्याचा ध्यास धरत असतो. सतत नवीन काहितरी शोधत असतो.
सतत नव्याचा ध्यास धरण्याच्या नादात आपण क्षणा क्षणाला जी काही आठवणींची शिदोरी साठवून ठेवायला हवी ते क्षण मात्र आपल्या हातून निघून जातात.
एक काका रोज बस मध्ये भेटतात. कन्स्ट्रक्शन मध्ये काम करतात. रोजचा चाळीस किलोमीटर चा प्रवास करतात. सध्या ते बावीस मजली बिल्डिंग च्या प्रोजेक्ट वर काम करत आहेत. सकाळी पाऊने आठ ला घरातून निघतात आणि रात्री अकरा ते बारा च्या दरम्यान घरी पोहचतात. दिवसभर त्यांचं काम उभ्यानेच असतं. शिवाय बस मधून प्रवास करताना देखील बसायला जागा मिळेलच याचीही खात्री नसते. यांना पगार भरपूर मिळत ही असेल मात्र जो जीवाला त्रास होतो त्याचं काय. आणि हा त्रास कुणासाठी सहन करतो आपण?.. .....
मुलांचं चांगलं व्हावं, त्यांना पैसा कमी पडू नये, आपलं स्वतःचं घर असावं, एखादी छानशी चार चाकी गाडी असावी, मुलांची लग्न चांगल्या ठिकाणी व्हावीत, त्यांचं सगळं सुरळीत चालावं, त्यांना एखादी एखादी दुचाकी घेऊन द्यावी, त्यांच्या घरासाठी थोडा पैसा उभा करावा,....... हे कधी थांबणारच नाही. मात्र यामध्ये तुम्ही कुठे आहात का??.
सर्वांसाठी सर्व काही करत आहात पण तुमच्या स्वतःसाठी तुम्ही काय केलं?? खरं तर याचं उत्तर तुम्ही शोधा. अहो जास्त कशाला, आपण आपल्या लाईफ चा लाईफ इन्शुरन्स काढतो त्याचा मोबदला देखील आपल्या मागे जे असतील त्यांनाच मिळतो, आपल्या पश्चात आपल्या नोकरीवर जी काही पेन्शन मिळेल ती देखील दुसर्यांना, मग तुमचं काय? तुमच्यासाठी यातलं काय आहे. सगळ्यांसाठी सगळं आहे मात्र यात तुम्हाला स्वतःला काय आहे??
आपल्या कुटुंबासाठी कष्ट उचलणं हे आपलं कर्तव्यच आहे आणि ते प्रत्येकजण आपापल्या परीनं पार पाडत असतो. कोणी जगाच्या वेगळं काहीच करत नाही. मात्र ही कर्तव्य पार पडण्याच्या नादात तुम्ही तुमचं आयुष्य मनसोक्तपणे जगायचं राहूनच जाता याचा देखील थोडा विचार करा.
किती वर्ष आपलं आयुष्य असेल माहीत नाही पण येणारा प्रत्येक दिवस नवीन काहीतरी घेवुन येत असतो. हा दिवस मात्र आपण रोज नव्याने जगला पाहिजे. येणारा प्रत्येक दिवस आठवणींच्या शिदोरीने भरलेला असला पाहिजे.
आपले मित्र मैत्रिणी, नातेवाईक, आप्तेष्टांच्या सानिध्यात थोडा तरी वेळ प्रत्यक्षपणे घालवला पाहिजे. मिळालेल्या सर्व गोष्टींचा आनंद साजरा केला पाहिजे. या आनंदाच्या आठवणी, हे आनंदाचे क्षण आठवणींच्या गाठोड्यात साठवून ठेवले पाहिजेत. चांगले मित्र जोडले पाहिजेत.
आपल्या मनातील काही गोष्टी ज्या आपणांस त्रास देतात त्या गोष्टी आपल्या मित्रांसोबत, नातेवाईकांसोबत शेअर केल्या पाहिजेत. सोशल मीडियावर नव्हे तर प्रत्यक्षात सुद्धा गप्पा टप्पा रंगल्या पाहिजेत. सुख दुःख शेअर केलं पाहिजे. आनंदाचे क्षण शेअर केले पाहिजेत. एकमेकांना मार्गदर्शन केलं पाहिजे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे खूप बोललं पाहिजे आणि खूप हसलं पाहिजे. हसण्याने आणि रडण्याने देखील आपले स्ट्रेस हार्मोन्स कमी होण्यास मदत होते.
मित्रमंडळीशी, नातेवाईकांशी बोलण्याने देखील आपले स्ट्रेस हार्मोन्स कमी होतात. आपला बीपी नॉर्मल होण्यास मदत होते. सदैव आनंदी राहिलं तर बीपी आणि स्ट्रेस हार्मोन्स असे प्रोब्लेम्स येणारच नाहीत. आणि या सर्व गोष्टी केल्याने आपलं आयुष्य नक्कीच वाढणार आहे.
मोह करणं चांगलीच गोष्ट आहे पण तो किती प्रमाणात करायचा आणि कोणत्या गोष्टींचा करायचा हे ज्याला कळलं तो त्याच्या आयुष्यात कधीच दुःखी होत नाही. तो त्याचं आयुष्य भरभरून जगतो. तो स्वतः सुखी असतो, स्वतः आनंदी असतो आणि आपल्यासोबत इतरांनाही आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्न करतो.
लेखन,
प्रा. डॉ. मनिषा पाटील-मोरे
0 टिप्पण्या
कृपया तुमच्या प्रियजनांना लेख शेअर करा आणि तुमचा अभिप्राय जरूर नोंदवा. 🙏 🙏