संस्कार विषयावर बोलताना जरा जपून....!!

 संस्कार विषयावर बोलताना जरा जपून....!!



काल असंच जेवता जेवता मधल्या ब्रेक मध्ये आमच्या मैत्रिणींच्या गप्पा रंगल्या होत्या. विषय होता, IT कंपन्या मध्ये काम करणाऱ्या महिला लग्नानंतर आपल्या मुलांसाठी जॉब सोडतात. यामध्ये अजून एक विषय असा होता की, घरी मुलांना सांभाळण्यासाठी आईवडील किंवा सासू सासरे यांच्याकडे मुलांना ठेवू शकतो का?

मुलांना सांभाळणं, त्यांना हवं नको ते पाहणं, त्यांच्यावर चांगले संस्कार करणं यासाठी आई स्वतः घरी असली पाहिजे असं एका मैत्रिणींचं मत होतं. तिचं मत होतं की खरं तर आपण स्वतः जितके चांगले संस्कार करू शकतो तेवढं दुसरं कुणीच करू शकत नाही.  

दुसरी एक मैत्रीण असं म्हणाली की, जॉब सोडायची गरजच नाही. एक तर पाळणाघर किंवा मग घरीच एखादी मुलगी किंवा मावशी मिळाली मुलांना सांभाळायला तर मग जॉब सोडायची गरजच नाही वाटत. 

त्यावर एक मैत्रीण जे बोलली ते मनाला खूप लागलं. ती म्हणाली, तिच्याच ओळखीच्या ठिकाणी मुलांना सांभाळायला एक मुलगी गावावरून आणली. मात्र त्या मुलावर संस्कार तसेच झाले. ती मुलगी गावाकडची होती मग काय संस्कार होणार मुलांवर. असं एकंदरीत त्या मैत्रिणींचं म्हणणं होतं. आणि म्हणूनच खरं तर तिनं जॉब नाही केला आणि मुलांना सांभाळायला घरी थांबली.  

अर्थात माझ्या त्या मैत्रीणीचं  बोलणं ऐकून यावर काय प्रतिक्रिया द्यावी हे मला कळलंच नाही. माझ्या डोक्यात विचारांचं चक्र सुरू झालं. एकापाठोपाठ एक असे अनेक प्रश्न निर्माण झाले. विचारांचं जणू थैमान सुरू झालं.

म्हणजे त्या मैत्रीणीला काय म्हणायचं असेल. गावाकडची लोकं आपल्या मुलांवर चांगले संस्कार करत नाहीत!, गावाकडची लोकं गावंडळ, अडाणी आहेत त्यामुळे संस्कार म्हणजे काय हे त्यांना माहीतच नाही!, गावाकडची लोकं गरीब आहेत त्यामुळे संस्कार करूच शकत नाहीत, गावाकडची लोकं साधी भोळी त्यामुळे त्यांच्या मुलांना चांगलं वाईट काय याची जाणच नसते की काय!,  असे एक ना अनेक प्रश्न माझ्या मनात गोधळ करत होती.

मला एक कळत नव्हतं की, संस्कार करण्यासाठी शहरातच असलं पाहिजे तरच संस्कार होतात हे कोणतं लॉजिक आणि मुळात संस्कार म्हणजे तरी काय हो?

थोरामोठ्यांचा आदर करणं, शांत आणि संयमानं बोलणं, चांगलं शिक्षण घेणे, रोज नवनवीन ज्ञान मिळवणं, आपण चांगल्या मार्गावर चालणं, आपल्याबरोबर आपल्या मित्रांना, आप्तेष्टांना देखील बरोबर घेऊन चालणं, नेहमी चांगल्याची संगत करणं, कुणालाही कधीच न दुखावणे, कुणालाही नाराज न करणे, कधीही कुणाचं वाईट न चिंतनं, येणारा प्रत्येक क्षण आनंदाने जगणं, येणारा प्रत्येक क्षण भरभरून जगणं, वाईट विचारांना समूळ नष्ट करणं आणि प्रगतीचा ध्यास धरणं, खूप प्रयत्न करणं, आपली स्वप्न आपलं ध्येय गाठण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत राहणं.

हार कधीच न मानता नेहमी आशावादी राहून येणाऱ्या संकटावर मात करत प्रयत्न करत पुढे चालत राहणं, काल काय काय घडलं यातून काय अनुभव आले त्यावरून आज काय करावं लागेल आणि उद्या काय करता येईल या गोष्टींचं संतुलन राखण्याचा प्रयत्न करणं हेच तर संस्कार आहेत असं मला वाटतं.

हे सर्व काही करण्यासाठी करण्यासाठी माणूस शहरातलाच असला पाहिजे असं मला तर मुळीच फरक पडत नाही. गावाकडच्या माणसाला हे असे संस्कार जमणारच नाहीत असं मला बिलकुल वाटत नाही. किंवा हे असे संस्कार करण्यासाठी शिक्षणाचीही गरज आहे असंही मला वाटत नाही. ती मैत्रीण मात्र कशाच्या आधारावर हे बोलत होती की गावाकडची मुलगी मुलं सांभाळायला होती त्यामुळे त्या मुलावर तसेच संस्कार झाले. 

हीच गावाकडची लोकं मोठ्यांचा आदर कसा करावा शिकवतात. आपल्याकडे जे काही आहे हे सर्वामध्ये वाटून कसं खायचं हे शिकवतात. दिवसभर उन्हातान्हात काम करून सुद्धा संध्याकाळी चेहऱ्यावर त्या कामाचा ताण ते कधीच दिसून देत नाहीत. परिस्थिती कशीही असो त्यावर मात करून मार्ग कसा काढायचा हे रोजच्या दैनंदिन कामातूनच मुलं शिकतात. गावातील कोणताही व्यक्ती संकटात असेल तर न बोलावता सर्व गाव मदतीला धावून जातो आणि हे बघत बघतच मुलं मोठी होतात. 

आता मला त्या मैत्रीणीला प्रश्न विचारावासा वाटला की, बाई गं एखाद्याला कमी लेखणं हे कसले संस्कार, आपणच फार मोठे शहाणे बाकी सर्व अडाणी, हे कुठले संस्कार?, समोरच्याला काय वाटेल याचा विचार न करता काहीही विधानं करणं हे कुठले संस्कार, 

याच चर्चेत  माझ्या दुसऱ्या एका मैत्रिणीनं मात्र तिला खूप छान उत्तर दिलं. ती म्हणाली, तुम्ही लाख द्याल हो संस्कार, नोकरी सोडून घरी बसाल, मुलाकडून सर्व काही करून घ्याल पण कुठं वर तुम्ही त्याच्या मागे रहाल. मूल मोठं झालं की ते खूप साऱ्या लोकांच्या सानिध्यात येईल, खूप मित्र मैत्रिणी सोबत त्याचा संपर्क येईल. मग याची काय खात्री की ते मूल तुम्ही दिलेल्या शिकवणीनुसारच वागेल. याची खात्री आहे का कुणाला??  

प्रत्येक आईवडील आपल्या मुलांवर चांगलेच संस्कार करतात. मग ते शिकलेले असो वा अडाणी, शहरात राहणारे असो वा गावाकडे, नोकरदार असो वा शेतकरी. याच्यासाठी तुम्ही किती शिकलेले आहात तरच संस्कार चांगले करू शकता, तुम्ही किती हाय सोसायटी मध्ये राहता तरच चांगले संस्कार करू शकता, तुम्ही लखपती आहात तरच चांगले संस्कार करू शकता. ह्या अशा लोकांचं काय करावं??

मला खरं तर कीव येते अशा लोकांची. अरे तुम्ही पैसे कमवायला बाहेर पडता कामवाली मावशीच्या जीवावर. तुमची सर्व कामं वेळेत होतात. तुमचा रोजचा डबा तोही तुम्ही त्यांच्याकडूनच करून घेता. भांडी, कपडे, मुलं सांभाळणं सर्वच कामं त्यांच्याकडून करून घेता ते मात्र तुम्हाला चालतं. मात्र दुसरीकडे तुम्ही त्यांची लायकी ठरवता, त्यांचे संस्कार काढता. ते काय संस्कार करणार हे विधान करून मोकळं होता.

चार लोकांत बसून त्यांनीच बनवलेला डब्बा खात खात त्यांच्या विषयी नको ते मतं बनवून तुम्ही स्वतःचेच संस्कार दाखवून देतात. 

एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तुमची शहरं खेड्यातील मेंदू आणि कष्ट विकत घेऊन मोठी होतात. 

मित्रांनो तुम्हाला माझी मतं पटत असतील तर कृपया तुमची मतं कमेंट सेक्शन नोंदवा. 


लेखन

प्रा. डॉ. मनिषा पाटील-मोरे

9511775185

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या