खाली हाथ आये थे। खाली हाथ जायेगे।

 खाली हाथ आये थे। खाली हाथ जायेगे।


काल कॉलेज मध्ये म्हणजे आमच्या स्टाफरूम मध्ये पोहचले आणि सर्व स्टाफ मेम्बर्सना बघून का कुणास ठावूक एक गाणं ओठावर आलं आणि ओठांनी ते गाणं अलगदपणे उचलून धरलं आणि मी थोडीशी गुणगुणायला लागली. म्हणजे अचानक असं गाणं माझ्या ओठांवर का आलं हे नाही समजलं पण ते गाणं खूप काही सांगून जातं. आपल्या आयुष्याचं सार सांगून जातं. 

या गाण्याचे बोल आहेत,अर्थात हे एक भजन आहे,

क्या तू लेके आया हैं क्या तूं लेके जायेगा
तुने तो कमाया हैं दुसरा ही खायेगा
खाली हाथ आया हैं खाली हाथ जायेगा।
जब तलक सांसे हैं तबतलक ये रिशते हैं
सांसें रुक जयेगी रिशते टूट जाएंगे।
खाली हाथ आया हैं खाली हाथ जायेगा।

मोह, माया, लोभ, राग, मत्सर, गर्व, अहंकार, मीपणा ही सर्व विशेषणं मनावर वर्चस्व गाजवतात आणि माणूस फक्त स्वतःला महत्व द्यायला लागतो. आपण काय बोलतोय, कुणाला बोलतोय, चुकीचं बोलतोय की बरोबर बोलतोय या सर्व गोष्टींचं भान विसरून जातो. अशा माणसांमध्ये मीपणा ठासून ठासून भरल्याकारणांन या लोकांना फक्त 'मी आणि मायसेल्फ' एवढंच कळतं. यांना आपलं वर्चस्व गाजवायचं असतं आणि याच कारणानं ही लोकं दुसऱ्याना कमी लेखतात या गोष्टीची जाणीवही नसते या लोकांना. स्वतःला मोठं करण्यासाठी इतरांना कमी लेखण्याचा मूर्खपणा करू नये हे या लोकांना कोणी सांगावं.

मात्र निसर्ग म्हणा किंवा वेगवेगळ्या परिस्थिती माणसासमोर अशा काही येत असतात आणि माणसाला धडा शिकवून जातात. अशीच बिकट परिस्थिती संपूर्ण जगावर गेल्या दोन वर्षांपासून आली. कोरोना नावाच्या महाराक्षसाने दाखवून दिलं आहे की, लहान असो वा थोर, गरीब असो वा श्रीमंत, शिकलेला असो वा अडाणी, नोकरदार असो किंवा भिकारी या कोरोनानं आपल्या विळख्यात सर्वानाच ओढलं आहे.

स्वतःला 'मी" म्हणणारे असे बरेच  महारथी हे जग सोडून गेले.  त्यांनी जमवलेलं मायाजाल इथंच सोडून गेले. त्यांच्या शेवटच्या क्षणी ना पैसा उपयोगी आला, ना मित्रपरिवार ना रक्ताच्या नात्यांची भेट झाली. 

आपल्या आयुष्यात प्रत्येकासमोरच खूप वेगवेगळ्या परिस्थिती उभ्या राहतील.  परिस्थिती कोणतीही असो त्यातून  मार्ग काढून त्यावर मात करण्यासाठी आपण सक्षम असलं पाहिजे. आपल्या अवतीभोवती आपले आप्तेष्ट, मित्रमंडळी नेहमी असले पाहिजेत. आपल्या अवतीभोवतीची हीच लोकं आपला भावनिक आधार बनतात. नेहमी आपण आनंदात रहायला पाहिजे आणि आपल्या सोबत इतरांना देखील आनंदी रहायला शिकवलं पाहिजे. 

नेहमी इतरांविषयी कटकारस्थान करण्यात आपला वेळ आणि मेंदू वाया घालवण्याऐवजी हा वेळ काही नवीन गोष्टी शिकण्यात घालवला तर आपली अजून चांगली प्रगती होईल. तसंही कुणी कुणाचं काही वाईट करावं म्हणून होत नसतं. जसं आपलं कर्म तसंच आपल्याला फळ मिळतं. 

आयुष्याचं सत्य हेच आहे की, कुणी काही घेऊन आलं नाही, कुणी काही घेऊन जाणार नाही. जे काही कमावलं ते इथंच राहणार आहे. फक्त आठवणींचा खजिना मागे सोडून माणूस जाणार आहे. या आठवणी मात्र प्रत्येकाला काहीतरी प्रेरणादायी असाव्यात. आपल्या आठवणीतुनही लोकांनी काही तरी शिकावं असं आपलं कर्म आपलं कर्तृत्व असावं. आपल्या माघारीही चारचौघात आपलं नाव काही ना काही चांगल्या बाबींमुळं चर्चेत असावं. 

आजच्या या संक्रांती सणानिमित्त आपण एकमेकांना तिळगुळ देतो आणि नेहमी गोड गोड बोलायचं असं सांगतो. खरंच गोड बोलण्यासाठी गोड देण्याची गरज आहे का? तर याचं उत्तर अजिबात नाही असंच आहे. मुळातच ज्यांचा स्वभाव गोड आहे, ज्यांचे विचार इतरांना सामावुन घेण्याचे आहेत, ज्यांचे आचार आपल्यासोबत इतरांनाही बरोबर घेऊन जाण्याचा आहे, जो आपलं वर्चस्व इतरांवर कधीही प्रस्थापित करत नाही अर्थात या व्यक्तीं गोडच असतात आणि म्हणूनच त्यांचा स्वभावही गोडच असतो.

अशी लोकं लोकांना बरोबर घेऊनच चालतात आणि आपलं कर्तुत्व सिद्ध करतात. मोह, माया, राग, लोभ, मत्सर, गर्व, अहंकार, मीपणा या विशेषणांचा अशा लोकांच्या मनावर अजिबात प्रभाव नसतो. त्यामुळेच ही लोकं नेहमीच स्वतःही चांगली वागतात आणि इतरांशीही चांगलीच वागतात आणि आपल्या आचार आणि विचारांचा प्रभाव पाडतात. 



तिळगुळ घ्या गोड गोड बोला

आपल्या आचार आणि विचारांनी

गोड आठवणींचा खजिना इतरांना देत रहा।


लेखन,

प्रा. डॉ. मनिषा पाटील-मोरे

टिप्पणी पोस्ट करा

3 टिप्पण्या

कृपया तुमच्या प्रियजनांना लेख शेअर करा आणि तुमचा अभिप्राय जरूर नोंदवा. 🙏 🙏