पत्रास कारण की,

  पत्रास कारण की,


( एका बहिणीनं आपल्या भरकटलेल्या भावास, मार्ग चुकलेल्या भावास त्याच्या काळजीपोटी, प्रेमापोटी लिहिलेलं पत्र. चांगल्या वाईट काळात नेहमीच साथ देणारी त्याची बहीण ह्या पत्रातून त्याला पुन्हा नव्याने उभं राहण्यासाठी, स्वाभिमानाने जगण्यासाठी या पत्राच्या माध्यमातून  एक शब्दरुपी आत्मिक बळ देत आहे. त्याचा आत्मविश्वास पुन्हा जागा करण्यासाठी आणि नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी तसेच त्याचा हरवलेला स्वाभिमान  त्याला परत मिळवून देण्यासाठी चाललेली तिची प्रांजळ धडपड.)



Brother sister



प्रिय भावड्या,

पत्रास कारण की,

आपल्या पाच भावंडामध्ये तू चार नंबरचा. तुझ्या अगोदर आम्ही तिघी बहिणी होतो त्यामुळे तीन बहिणींच्या पाठीवर तू आल्यामुळे तसा तू लाडवलेलाच होतास. आपले सुरुवातीचे दिवस खूप गरिबीत गेले. आर्थिक परिस्थिती खूप हलाखीची असल्या कारणाने पोटाची खळगी भरणं मुश्किल अशी परिस्थिती होती. आम्ही दोघी आजोळी शिक्षणासाठी गेलो त्यामुळे आमचं शिक्षण तरी पूर्ण झालं. नाहीतर सगळं अजुनच बिकट झालं असतं. 

सगळं ठीक असतानाच आण्णा आपल्याला सोडून गेले आणि आपण पोरके झालो. त्यानंतर आपली परिस्थिती अजूनच बेताची झाली. या परिस्थितीत आजोबांनी आणि मामांनी आपल्याला मदत केली म्हणून आमची लग्न व्यवस्थित होऊ शकली. आपल्या जमीनी विकून लग्न करायची वेळ आपल्यावर आली नाही. 

खरं तर आम्ही बहिणी मोठया आणि तू लहान असल्याने तुझ्यावर कधी कुठली जबाबदारी आलीच नाही आणि तुही कधी स्वतःहून कोणती जबाबदारी घेतली नाहीस. तुला आम्ही नेहमीच लहान समजत आलो. तू वयाने वाढत होतास पण जबाबदारीने , कर्तव्याने कधीच मोठा झाला नाहीस किंवा तसा प्रयत्नही केला नाहीस. 

आपल्या कुटुंबातील सर्वात मोठी मी. जिद्दीने शिक्षण पूर्ण केलं. नोकरी मिळवली. माझं लग्न जरी झालं असलं तरी माझ्या आईची आणि तुम्हा सर्व भावंडांची जबाबदारी मी स्वीकारली. ही जबाबदारी एक ओझं म्हणून नाही तर मी आईची-आण्णाची मोठी मुलगी म्हणून माझं कर्तव्य म्हणून स्वीकारली. 

आपल्यात असं म्हणतात की, प्रत्येक कुटुंबात एक तरी मुलगा हवाच. मुलगा म्हणजे वंशाचा दिवा. मुलगा वंश चालवतो, सर्व कर्तव्य पार पाडतो. आपल्या आईला, आपल्या बहिणींना हवं नको ते बघतो, सर्व जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडतो. घरचा मुलगा म्हणून तू यातलं काय केलंस हे आता स्वतःलाच विचारून बघ. तुला उत्तर हेच मिळेल की तुझं एवढं वय आता झालं असताना देखील अजून कोणतीच जबाबदारी तू पार पाडली नाहीस. तरीही आम्ही अजून असंच म्हणतो, चला जाऊ दे, लहान आहे. करेल सर्व काही ठीक. 

तुला किती आणि कुठं कुठं संभाळून घ्यायचं. शून्यातून , गुलामगिरीतून हाताच्या बोटावर मोजता येतील एवढे मावळे बरोबर घेऊन स्वराज्य स्थापन करणारे शिवाजी महाराज, आपल्या आबासाहेबांनी स्थापन केलेले स्वराज्य शरीराचा एक एक अवयव निकामी झाला तरीही स्वराज्य माझंच आहे असं औरंगजेबा समोर म्हणारे संभाजी महाराज किती आव्हानांचा सामना करून, खडतर परिश्रम करून, संघर्ष करून आपलं कर्तृत्व सिद्ध केलं त्यांनी. आज पाचशे वर्ष झाली तरी एक आदर्श म्हणून आपण आदराने आणि अभिमानाने त्यांचं नाव मुखी घेतो.

खूप मोठं काही करायचं राहिलं पण तुला स्वतःची देखील जबाबदारी घेता येत नसेल तर तू आम्हा बहिणींची जबाबदारी कशी घेशील?.  तू लहान लहान म्हणून तुला किती साथ द्यायची. खरं तर अजून तुला तुझाच अजून शोध लागला नाही. 

काहीतरी करून दाखवण्यासाठी शिक्षणच पाहिजे असं नाही, आज लिहिता वाचता न येणारे लोकं सुद्धा लाखो रुपये कमावतात. आपल्या कामातून आपलं कर्तृत्व सिद्ध करतात. कोणत्याही परिस्थितीत आपल्या कुटुंबाला सावरण्यासाठी कष्ट उपसतात. आपलं कुटुंब आपली जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी पार पाडणं हे आपलं कर्तव्य आहे आणि ज्याला याची जाणीव आहे तो आपल्या कर्तव्यापासून कधीही पळ काढत नाही.

मात्र त्यासाठी प्रथम आपण स्वतःला ओळखलं पाहिजे. स्वतःमध्ये काय गुण आहेत याची जाणीव झाली पाहिजे. आपल्यामध्ये असणाऱ्या गुणांचा उपयोग करून प्रगतीच्या मार्गावर चाललं पाहिजे. मनात आणलं तर आपण खूप काही करू शकतो त्यासाठी अगोदर स्वताची ओळख स्वतःला झाली पाहिजे. 

माणसाची प्रगती काही एका दिवसात होत नसते. त्यासाठी प्रयत्नशील असणं गरजेचं आहे. परमेश्वराच्या कृपेने आपण धड धाकट आहोत. लुळे पांगळे, अपंग लोकं आपल्या अपंगत्वावर मात करून आपली कर्तबगारी सिद्ध करतात मग आपण तर त्यांच्यापेक्षा  चार पटीनं कामं करायची तयारी ठेवली पाहिजे. 

आपलं स्वप्न काहीतरी मोठं करून दाखवण्याचं असलं पाहिजे. चार लोकांत आपली ओळख निर्माण झाली पाहिजे. चार लोकांत आपल्या नावाचा उल्लेख झाला पाहिजे. अडल्यानडल्या लोकांना परिस्थितीतुन बाहेर काढण्यासाठी लोकांनी आपल्या नावाचा विचार केला पाहिजे असं आपलं कर्तृत्व असलं पाहिजे. आपण काय आहोत आणि कोण आहेत याचा गाजावाजा करायची गरज नसते. लोकांना आपल्या कामातून आपलं कर्तृत्व दिसून येतं.  

मनानं ठरवलं तर आपण खूप काही करू शकतो फक्त आपल्या मनगटात ती धमक पाहिजे. असंच काहितरी करून दाखवण्याची धमक आपल्यात आहे की नाही,  ते सामर्थ्य आपल्यात आहे की नाही हे ओळखलं पाहिजे. 

आता एक छान उदाहरण देते,

जन्माला आलेलं लहान मूल त्याला काहीच येत नसतं. पण एक एक दिवस जसं त्याचं वय वाढत जातं तसतसं ते हसायला लागतं, आईला ओळखायला लागत, हावभाव ओळखायला लागतं, प्रेमाने बोललेलं, रागानं बोललेलं सर्व समजायला लागतं, हळूहळू पालथं व्हायला लागतं, रांगायला लागतं, शब्द ओळखायला लागतं, आवाज ओळखायला लागतं, दुडू दुडू धावायला लागतं, चालता चालता पडतं, रडतं, तरी देखील उठुन पुन्हा चालायला लागतं. हळूहळू एकएक शब्द बोलायला लागतं. त्याला कुणीच आपली भाषा  शिकवत नाही तरीही ते बोलायला शिकतं. 

येऊ दे ना अपयश!. एकदा येईल, दोनदा येईल पण तिसऱ्या वेळेस तरी काही ना काही आपल्या हाती लागेलच ना!. मात्र हे अपयश आणि यश  कधी येईल आपण काही तरी प्रयत्न करत असू तेंव्हा. आपण प्रयत्नच करत नसू, कष्टच करत नसू तर अपयश काय आणि यश काय यातलं काहीच होणार नाही. 

समजा मला पुण्याहून मुंबईला जायचं आहे. मी घरातून बाहेर पडले मात्र मी चाललेच नाही, पुढं गेलेच नाही, मी माझी पाऊलं पुढे टाकलीच नाहीत तर मला सांग मी एक दिवस काय, एक महिना काय किंवा एक वर्ष जरी गेलं तरीही  मुंबईला कधीच पोहचू शकणार नाही. 

मात्र समज मी चालत राहिले आणि चालता चालता माझा रस्ता चुकला, मी भटकले, मी फिरत राहिले, खूप प्रयत्न केले मग जाऊन कुठे मला माझा रस्ता सापडला आणि शेवटी मी मला जिथं जायचं होतं तिथं पोहोचले. 

मतितार्थ काय आहे तर मी चालत राहिले, एकाच जाग्याला थांबले नाही. भलेही माझा मार्ग चुकला, रस्ता चुकला, मी भरकटले, भटकले पण मला ज्या ठिकाणी जायचं आहे त्या दिशेने मी चालत राहिले आणि  शेवटी मी माझं अंतिम ध्येय गाठलंच. 

आपण कितीही भरकटलो, कितीही चुका झाल्या, आपण कधीच यशस्वी जरी झालो नसलो तरीही आपल्या अवतीभोवतीची आपली रक्ताची नाती आपल्या सोबत नेहमी असतात. ही लोकं आपल्याला या चुकांमधून मार्ग काढण्यासाठी मदत करत असतात, पुन्हा उभं राहण्यासाठी बळ देत असतात, पुन्हा सावरण्यासाठी शक्य ते प्रयत्न करत असतात. देवाचे खरं तर आभार मानले पाहिजेत की आपण चुकलो, हरलो, भटकलो तरी आपल्या अवतीभवती अशी माणसं आहेत जी आपली साथ कधीच सोडणार नाहीत, आपल्याला कधीच एकटं पडून देणार नाहीत. आपल्याला नेहमी चुकीच्या गोष्टी करण्यापासून थांबवतील आणि पुन्हा नव्याने आयुष्यात उभं राहण्यासाठी बळ देतील, आधार देतील.

खूप लोकं जगात अशी आहेत की ज्यांना कोणीच नाही हे सांगायला की काय चूक आहे, काय बरोबर, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहुजे. आणि एकदा का चुकीच्या मार्गाला ही लोकं लागली की त्यातून बाहेर काढण्यासाठी आणि आधार देण्यासाठी त्याची रक्ताची माणसं फार कमी लोकांच्या नशिबात असतात. तू मात्र खूप नशीबवान आहेस तुला आधार आणि साथ देणारी, तुला एकटं न राहू देणारी लोकं तुझ्यासोबत नेहमी आहेत.

आपल्या आयुष्याचा आजिबात भरोसा नाही. कोणत्या क्षणाला काय होईल याची कुणालाच कल्पना नाही. पण देवानं जे काही आयुष्य दिलं आहे ते असं जगलं पाहिजे की लोकांचं जाऊदे पण आपलं आपल्यालाच समाधान वाटलं पाहिजे. बस मी काही तरी करून दाखवलं. स्वतःचा अभिमान नेहमी वाटला पाहिजे. स्वतःच्याच नजरेत स्वतःचाच मोठेपणा दिसला पाहिजे. स्वतःची स्वतःलाच लाज कधीच वाटली नाही पाहिजे. 

खरं तर आपल्याला आलेल्या अपयशातून, चुकांतूनच माणूस शहाणा झाला पाहिजे. आलेल्या वाईट अनुभवातून नेहमी काहितरी शिकलं पाहिजे आणि त्याच  चुका पुन्हा पुन्हा होऊ नयेत यासाठी प्रयत्न केला पाहिजे. पुढे जात असताना वाईट अनुभव मागे टाकून भविष्यात त्या गोष्टी आपल्या हातून होणार नाहीत याची खबरदारी घेतली पाहिजे.  आपले अनुभव तर आपले गुरू असतातच पण आपल्या डोळ्यासमोर नेहमी अशा लोकांचा आदर्श असला पाहिजे की, त्यांचे विचार, त्यांचे आचार, त्यांचं कर्तृत्व नेहमीच आपणास प्रेरणादायी असेल, प्रोत्साहित करणारं असेल.

यापुढं असं काही काम कर, असं कर्तृत्व गाजव की लोकांनी तुझं उदाहरण दिल पाहिजे. म्हंटलं पाहिजे, खूप चुकीचा मार्ग निवडलेला मुलगा खरंच आज बदलला. तुझ्या वागण्यातून, तुझ्या कामातून, तुझ्या सामर्थ्याने तू लोकांना दाखवून दे की, होय मी चुकलो मला मान्य आहे. पण मीही माणूसच आहे आणि चुका माणसाकडूनच होतात. इथं कोण असा आहे जो धुतल्या तांदळासारखा स्वच्छ आहे?. तुला तुझा स्वतःचा अभिमान वाटेल असं काहीतरी करून दाखव मग लोकांना आपोआप कळेल तू बदलास, तू सुधारलास.

तुझ्यात झालेल्या बदलाचं सर्वजण स्वागतच करतील. खूप चांगली संधी तुला मिळाली आहे. या संधीचं सोनं करून दाखव. लोकांना दाखवून दे की, जे काही झालं ते झालं पण इथून पुढं माझ्याकडं बोट दाखवायला कुणालाच संधी मिळणार नाही. मग आपोआप लोकांचं तुझ्याबद्दलचं मत बदलेल. मुळात लोकांसाठी नाही तर  तुझा तुलाच अभिमान वाटेल. फक्त तुझ्या मनानं चांगल्या गोष्टींचा ध्यास घेतला पाहिजे. तुझ्या मनानं ठरवलं पाहिजे की मला काहीतरी करून दाखवायचं आहे. तुझ्या मनावर तुझा ताबा असला पाहिजे.  प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर असाध्य अशा सर्व गोष्टी साध्य करता येतात, कठीणातल्या कठीण गोष्टी शक्य होतात. 

आयुष्य खूप सुंदर आहे ते आनंदाने, सुखासमाधानाने आणि स्वाभिमानाने जग. तू तुझ्यात बदल घडवून आण आणि तुझ्यासोबत अजून चार जणांना योग्य मार्ग दाखवण्यास मदत कर. तुझ्या कामातून, तुझ्या वागण्यातून तू लोकांना दाखवून दे की तू कोण आहेस. मिळालेल्या संधितून पुन्हा नव्याने तुझी ओळख निर्माण कर. उंच भरारी मार. तुला आकाशही ठेंगणं पडेल असं काहीतरी करून दाखव. मात्र हे करत असताना तुझा आत्मसन्मान अजिबात ढळून देऊ नको. आम्हाला खात्री  आहे की, काहीतरी करून दाखवण्याची धमक तुझ्या मनगटात  आहे आणि तू काहीतरी करून नक्की दाखवशील.  तुला खूपखूप शुभेच्छा देऊन इथंच थांबते...


कळावे,

तुझीच बहीण,

लेखन,

डॉ. मनिषा पाटील-मोरे


टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या

कृपया तुमच्या प्रियजनांना लेख शेअर करा आणि तुमचा अभिप्राय जरूर नोंदवा. 🙏 🙏