शिक्षणाने माणसामध्ये "मी"पणा तर नाही ना येत ??...

 शिक्षणाने माणसामध्ये "मी" पणा तर नाही ना येत ??...





शिक्षणाला कधीच मर्यादा नसतात. जीवनाच्या प्रत्येक पावला पावलावर आपण नवनवीन गोष्टी शिकत असतो. अगदी झाडं, पानं, फुलं, पाणी, नद्या, समुद्र, डोंगर, रान शिवार, दगड, माती, वारा, वादळ, पाऊस, वाटसरू, ओळखी अनोळखी, शिकलेल्या, अडाणी, लहानथोर  एकूणच काय तर सजीव असो वा निर्जीव आपण प्रत्येकाकडूनच काही ना काही शिकतो.

उदाहरण द्यायचंच झालं तर अगदी भाजीपाला विकणारा शेतकरी घ्या, कुठलीही एमबीए ची मार्केटिंग ची डिग्री न घेणारा तो शेतकरी आपला माल पटकन विकला जावा म्हणून वेगवेगळ्या युक्त्या काढून लोकांना आपल्याकडे आकर्षीत करून घेतो. त्याला तुमच्या पुस्तकी मार्केटिंग स्ट्रॅटेजी ची अजिबातच गरज नाही. तो त्याच्या भाज्यांना वेगवेळी विशेषणं देऊन लोकांना आपला भाजीपाला विकत घेण्यास भाग पाडतो. तो दहा ला पाव आणि पस्तीस ला किलो असं ओरडून डिस्काऊंट ची ऑफर देऊन ग्राहकांना आकर्षित करतो. मोठमोठ्या आवाजात भाजीपाला आणि डिस्काऊंट ची माहिती सांगून ग्राहकांना आकर्षित करतो. वेगवेगळ्या मार्केटिंग पॉलिसी तो आमलात आणतो. 

इथं त्याच्याकडे कोणतीच डिग्री नसते. मात्र आपला माल कमी वेळेत आणि जास्तीतजास्त फायदा करून घेऊन कसा विकायचा ही कला त्याने अवगत केल्याने तो त्याचा बिजनेस अगदी व्यवस्थित करतो. म्हणजे इथं खरंच किती शिकण्यासारखं आहे या शेतकऱ्याकडून किंवा व्यापाऱ्यांकडून. 

काल परवा असंच एका एमबीए झालेल्या व्यक्तीशी काही कारणांनी संबंध आला. एमबीए डिग्री असल्याचा थोडा अट्टीट्युड तिच्यात दिसतच होता. इंग्लिश थोडं चांगलं असल्याचा अभिमान नव्हता तर चेहऱ्यावर गर्व दिसत होता आणि थोडंसं दुसऱ्या एका नावाजलेल्या कॉलेज मधून आल्याचा अहंकार देखील सरळ सरळ दिसत होता. 

बरं हे सगळं असुदे या सगळ्याचा कुणालाच प्रॉब्लेम नव्हता मात्र याचा अर्थ असा नव्हता की बाकीचे सगळे मूर्ख आहेत, त्यांच्याकडे काहीच गुण नाहीत किंवा त्यांना काहीच येत नाही. ही  लोकं जी स्वतःला उच्च शिक्षित समजतात आणि अगदी त्याच वेळेत दुसऱ्याला कमी लेखतात. यांना असं वाटतं की आपल्याला सगळ्यातलं सगळंच येतं. याच आविर्भावात हे जगतात आणि समोरच्याला अगदी लेची पेची समजतात. 

मला अशा लोकांच्या बुद्धीची किव करावीशी वाटते. एका दोन विषयांचा डंका पिटवत मी मोठा शहाणा, मी हुषार याच्या बढाया मारत असतात.

त्यांच्यासाठी मला कवी अनंत फंदी यांच्या कवितेतील दोन ओळी सांगाव्या वाटतायत,

मी मोठा शहाणा, धनाढ्यही, गर्वभार हा वाहू नको।।
एकाहून चढ एक जगामध्ये,थोरपणाला तू मिरवू नको।।

चार सहा विषयात तुम्ही पारंगत असाल परंतु तुमच्या कोर्सशी निगडित अजून बरेच विषय असू शकतात कदाचित त्याचं ज्ञान तुमच्याकडे नसू शकेल. किंवा तुम्ही दुसऱ्या लोकांना कँपेर करून स्वताला फार शहाणे समजता कदाचित तुम्हाला ज्या गोष्टीचं ज्ञान नाही त्या गोष्टी त्यांना माहीत असू शकतात. किंवा असंही असू शकतं की तुम्हाला दहा गोष्टीचं ज्ञान आहे मात्र तुमच्या समोर असणाऱ्या व्यक्तींना चार गोष्टींचं ज्ञान नक्कीच असू शकतं.

एकंदरीतच काय तर आपण फार हुशार आहोत, आपल्याला खूप काही येतं, आपल्याकडे खूप डिग्री आहेत याचा अभिमान बाळगावा, असलेल्या ज्ञानाचा गर्व कधीच बाळगू नये आणि अहंकारात कधीच जगू नये. आपल्या ज्ञानाचा लोकांना कसा उपयोग होईल या गोष्टीच्या प्रयत्नांत सतत असलं पाहिजे. कारण 'ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते'.



शिक्षणाने खरंतर नम्रपणा येतो कारण 'विद्या विणयेन शोभते'. ही अशी लोकं प्रत्येक ठिकाणी असतात यांच्यात तो नम्रपणा अजिबात दिसत नाही यांच्यात 'मी'पणा ठासून ठासून भरलेला असतो आणि त्यांच्या वागण्यातून तो दिसतो.

जी लोकं आपल्याकडे असणाऱ्या ज्ञानामुळे आपली उंची वाढवायची सोडून इतरांची उंची मोजत बसतात ती लोकं मात्र शेवट पर्यंत "मी" पणातच जगतात.

ह्या लोकांना एखादं काम करायला सांगितलं तर त्यांचं "मी हे काम करू शकतो असा अट्टीट्युड नसतो" मात्र त्यांच्यातल्या ओव्हर कॉन्फिडन्स मुळे ही लोकं "मी हे काम करू शकतो" असं न म्हणता " हे काम मीच करू शकतो" असं म्हणतात आणि स्वतःचाच उदो उदो करतात. याच ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये नवनवीन गोष्टी शिकायचं सोडून देतात आणि मग बाकीची लोकं ज्यांना ही लोकं कमी लेखतात ती लोकं रोज नवनवीन गोष्टी शिकून नंबर वन बनतात आणि एक दिवस या अहंकारी, मीपणा असणाऱ्या लोकांचं गर्वाचे घर नक्कीच खाली होतं.

लेखन,

प्रा.डॉ. मनिषा पाटील-मोरे

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या

कृपया तुमच्या प्रियजनांना लेख शेअर करा आणि तुमचा अभिप्राय जरूर नोंदवा. 🙏 🙏