जो थांबला तो संपला

 जो थांबला तो संपला..

नेहमी गतिशील असलं पाहिजे,

रोज ध्यास नव्याचा घेतला पाहिजे




आपल्या गरजेचा गैरफायदा घेणारी लोकं समाजात खूप असतात. म्हणजे कधी कधी काय होतं, आपल्याला एखादी गोष्ट नाही म्हणून सांगायची असते पण आपल्या समोर परिस्थितीच अशी उभी राहते की आपण ते नाकारू शकत नाही.

काही कारणांमुळे नोकरी सोडावी लागली. समोर परिस्थितीच अशी येत गेली की काही दिवस नाही तर वर्षे नोकरी सोडावी लागली. तेंव्हा ते प्राधान्य होतं. पण नंतर काही काळाने पुन्हा नोकरी शोधायला सुरुवात केली मात्र कोरोना मुळे पुन्हा सर्व काही बिघडून गेलं.

पण या मधल्या काळात पीएचडी पूर्ण झाली होती. 10 वर्षाचा पोस्ट ग्रॅज्युएट ला शिकविण्याचा अनुभव होता. 10 ते 11 रीसर्च पेपर्स पब्लिश झाले होते. वेगवेगळ्या कॉन्फरन्स मध्ये भाग घेतला होता. युनिव्हर्सिटी ची अप्रुव्हल्स मिळाली होती. 

एव्हढं सगळं असून देखील काही कारणास्तव नोकरी नाही करता आली. मात्र पूर्णच बसून काढले असं अजिबात नाही. घरी 5 वी ते 10 वी च्या मुलांच्या ट्युशन घेतल्या. ब्लॉग रायटिंग सुरू केलं. दोन मराठीतून आणि एक इंग्लिश मधून ब्लॉग सुरू केले. तिथं शैक्षणिक, प्रेरणादायी व प्रोत्साहन पर लेख लिहीत गेले. अर्थात ही आवड म्हणून केलं मात्र या माध्यमातून अर्निग ही सुरू झालं. 

ब्लॉग रायटिंग सुरू असतानाच आपलं ज्ञान विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करून देता यावं म्हणून  युट्युब चॅनल सुरू करण्याचं ठरविलं आणि सुरूही केला. 

व्यायामाच महत्व माहीत असल्यानं आणि मी स्वतः 1999 पासून योगासनं करत असल्या कारणानं जेव्हा जेव्हा वेळ होता तेंव्हा तेंव्हा माझ्या महिला भगिनींना योगाचं महत्व सांगून त्यांनाही योगासनं करता यावीत म्हणून फ्री मध्ये येगासने देखील घेतली.

मध्येच लेटेस्ट टेक्नॉलॉजी शिकण्यासाठी डेटा सायन्स चा कोर्स लावला व तो योग्य रीतीने पूर्ण करण्याचे ठरविले. मग याचा अभ्यास जास्तीत जास्त प्रमाणात करता यावा व जास्त सराव व्हावा म्हणून एक रिसर्च प्रोजेक्ट करण्याचे ठरविले. हा प्रोजेक्ट ऑनलाइन लर्निंग आणि त्याचे फायदे व तोटे तसेच त्याचे शारीरिक व मानसिक परिणाम यावर अभ्यास सुरू केला. 

मग कोरोना काळात भरपूर वेळ मिळाला आणि युट्युब बघता बघता शेअर मार्केट ची आवड निर्माण झाली. मग एक ते दीड महिना युट्युब वर व्हिडीओ ऐकून , पाहून शेअर मार्केट शिकून घेतलं. स्वतःचं डिमॅट अकाऊंट स्वतः ओपन करून थोडीशी इन्व्हेस्टमेंट केली. मग जसजसं चांगला अनुभव येत गेला तसं अजून इन्व्हेस्टमेंट करून प्रॉफिट मिळवायला सुरुवात केली. महिन्याकाठी एखाद्या छोट्या पगारा एव्हढं प्रॉफिट नक्कीच मिळत आहे. 

आणि आता एव्हढं सगळं केलं असता किंवा करत असता कोरोना काळानंतर नोकरीच्या शोधात राहिले. मात्र जास्त ओपनिंग नसल्या कारणाने नोकरी मिळणं अवघड जात होतं. 

लोकं आणि भावबंध यांना फक्त आपण 6 किंवा 8 तासाची ड्युटी करत असू तरच म्हणतात की आपण नोकरी करतो. मात्र नोकरी व्यतिरिक्त जे काही उपद्व्याप आपण करतो ते लोकांना माहीत नसतात. 

शिक्षण कधीच वाया जात नाही. एक नाही तर दुसरं, दुसरं नाही तर तिसरं, तिसरं नाही तर चौथं असे कित्तीतरी ऑप्शन्स आपण निवडू शकतो आणि ते पूर्णत्वास नेऊ शकतो. 



वेगवेगळ्या कलागुणांनमुळे आपण आपल्या आयुष्यात कोणत्याही परिस्थितीत स्वताला सावरू शकतो, आपला तोल जाऊ न देता आपण पुन्हा  नव्याने वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींमध्ये स्वतःला गुंतवून सतत कार्यरत राहण्याचा प्रयत्न करू शकतो.

आपण एका जागेला थांबता कामा नये. प्रवाहाबरोबर आपण ही गतिशील  असलं पाहिजे. जो थांबला तो संपला. 

पुन्हा नव्याने जॉब सुरू करताना विचार हाच होता की प्रवाहात रहायचं आहे. आपण जे काही करतोय किंवा केलंय त्याच्याशी समोरच्याला काहीही घेणं देणं नाही. तुम्ही लयी मोठं कर्तृत्व गाजवलंय याच्याशी त्यांना काहीही घेणं देणं नाही, तुम्ही लयी मोठं शहाणं असाल त्याच्याशी समोरच्याला काहीही घेणेदेणे नाही. समोरच्याला फक्त त्याचं काम पूर्ण करण्यास एक माणूस हवं असतं आणि ते आपल्या रुपात त्याला मिळतं. मग तुमच्या अपेक्षा, आशा , आकांक्षा याला काही अर्थ उरत नाही. 

अशा वेळेला आपण कोण आहोत, आपण काय शिकलो, आपल्याकडे किती ज्ञान आहे, किती डिग्री आहेत, किती अनुभव आहे हे सगळं मॅटर करतं जेंव्हा समोरची लोकं सिलेक्शन क्रायटेरिया लावतात तेंव्हा. मात्र त्यांना वाटलं की हा माणूस आपल्या कामाचा आहे मग सुरू होतं पगाराचं बोलणं. त्यांना बरोबर कळतं की, हा माणूस गरजू आहे आणि हा कुठेही जाणार नाही. मग उगाचच कमी पगारात करायला सांगितलं जातं. आणि हातचा जॉब जाऊ नये म्हणून आपण ही तयार होतो लगेच. 

आपण विचार करतो, आपल्या मनासारखा जॉब मिळेपर्यंत हा जॉब का हातचा जाऊन द्यायचा. घरी बसण्यापेक्षा काम करत राहू , अनुभव तरी येईल. आणि मुख्य म्हणजे आपण प्रवाहात राहू, कारण जो थांबला तो संपला. 

रोज नवनवीन काहीतरी शिकत रहा. जेणेकरून कोणत्याही परिस्थितीत आपण स्वतःला सावरू शकू. काहीतरी वेगळं आणि नवीन करत राहू. म्हणजे आपण आपल्या हाती काम नाही म्हणून कधीच थांबून नाही राहणार. नेहमी गतिशील रहाल. 

तुम्ही सुद्धा याच विचारांशी सहमत आहात ना!. तुम्हाला ही असे अनुभव आलेच असतील. तुमचेही अनुभव शेअर करा.

लेखन,
डॉ. मनिषा मोरे
9511775185

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

कृपया तुमच्या प्रियजनांना लेख शेअर करा आणि तुमचा अभिप्राय जरूर नोंदवा. 🙏 🙏