अजून किती काळ सत्वपरीक्षा तिच्या अस्तित्वाची

 अजून किती काळ सत्त्वपरीक्षा तीच्या अस्तित्वाची 


जागतिक महिला दिन निबंध, जागतिक महिला दिन मराठी भाषण


अहमदाबाद ची आयेशा नावाची मुलगी नदीच्या काठावर उभा राहून व्हिडीओ तयार करते. हा व्हिडीओ काही फिरायला गेली म्हणून एक आठवण रहावी म्हणून तिने बनवला नाही तर, ती तिच्या आयुष्यात आता कंटाळली आहे आणि नदीच्या प्रवाहाबरोबर तिला वाहत जायचं आहे, तिला कुणाकडून कसल्याच अपेक्षा राहिल्या नाहीत, ती स्वखुशीने हसत हसत नदी पत्रात सामावून घेण्यासाठी बोलत असताना अगदी हसत हसत एक एक शब्द बोलत होती.

ती व्हिडीओ करत असताना हसत होती मात्र त्या तिच्या हसण्याच्या मागे खूप दुःख, खूप त्रास दिसत होता. खरं तर मरणाची भीती ही प्रत्येकालाच वाटत असते. आपलं आयुष्य  आता राहणार नाही, काही क्षणातच आपण हे जग सोडून जाणार आहोत हे विचार देखील तुम्हा आम्हा सर्वच लोकांना धडधड भरवणारे आहेत. आणि असं असताना देखील ही मुलगी हसत हसत जगाचा निरोप घेत असताना व्हिडिओ देखील बनवत आहे. याचा अर्थ असाच आहे की, तिला आता कंटाळा आला आहे जगण्याचा, तिच्या आयुष्यात घडणाऱ्या त्रासाचा, दुःखाचा. किती दुःख साठून असेल तिच्या मनात. किती त्रास तिने सहन केला असेल. 

बरं व्हिडीओ मध्ये तिला पाहताना ती स्पष्ट वक्ती, धाडसी, हिम्मत वाली, कुठल्याही परिस्थितीत निर्भीड पणे बोलणारी वाटतेय. तरीही ती इतक्या टोकाची भूमिका घेते याचाच अर्थ तिच्या सहनशक्तीचा अंत झाला असणार. तिच्यावर झालेल्या अत्याचाराला, अन्यायाला कंटाळून अखेर तिने तिची जीवन यात्रा संपवून टाकली. याला कजबाबदार कोण?.

चारित्र्याच्या संशयावरून नवऱ्याने जातपंचायत च्या मदतीने घेतलेल्या अमानुष , अघोरी परिक्षेला बळी पडलेली एक महिला उकळलेल्या तेलात हात घालून कॉइन काढताना तिला आपले हात भाजून घ्यावे लागले. 

आजही बऱ्याच ठिकाणी मुलीचं लग्न ठरलं की तिची व्हर्जिनिटी, तिचं पावित्र्य टेस्ट करण्यासाठी वेगवेगळ्या अमानुष, अघोरी प्रथांना तिला सामोरं जावं लागत आहे. 

ऍसिड हल्ल्यात बळी पडलेल्या कित्येक निरपराध मुलींचे, महिलांचे चेहरे, त्यांचं शरीर विद्रुप झालं आणि त्याचं आयुष्य उध्वस्त झालं. तो महाभयंकर, महाविद्रूप चेहरा आपण फक्त पाहिला तर आपल्याला अक्षरशः भीती वाटेल, असा तो चेहरा, ते शरीर आयुष्यभर घेऊन जगताना त्या आपल्या भगिनींच्या मनाला किती चटके बसत असतील, किती वेदना होत असतील. याला जबाबदार कोण?

नाबालीक असो, प्रौढ असो, लग्न झालेलेली महिला असो, आईच्या वयाची महिला असो किंवा साठी पार केलेली आजी असो आजही तिच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगायला, तीच्यावर झडप घालायला आणि तिचं आयुष्य उध्वस्त करुन तिला आयुष्यातून उठवायला ही राक्षस तयारच बसलेले असतात. किती निर्भया झाल्या, किती अमृता झाल्या, किती रिंकू झाल्या, अजून किती निर्भया, प्रियांका या अत्याचाराच्या बळी पडणार आहेत?

मुलगा मुलगी भेद, स्त्री पुरुष असमानता या विचारसरणी चा पगडा असणाऱ्या लोकांमध्ये वावरताना तिची खूप घुसमट होत आहे. आजही एकविसाव्या शतकात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात हुंडाबळी सारख्या प्रथांनी तिचा बळी घेतला जात आहे. हुंडा दिला नाही म्हणून तिच्यावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिलं जात आहे. 

घरी बायको असताना बाहेर चार चार लफडी करणारा व्यभिचारी पुरुष समाजात उजळ माथ्याने वावरताना दिसतील मात्र एखादी स्त्री पर पुरुषांशी फक्त बोलली तरी तिच्या चारित्र्यावर संशय घेणारा समाज आजही या एकविसाव्या शतकात आपल्याला पाहायला मिळेल. हे आहे समाजाचं विदारक चित्र आणि कटू सत्य.

घरातील मुलगा किंवा पुरुष घरातून कितीही काळ बाहेर असला तरी त्याला विचारलं जात नाही मात्र हाच नियम मुलींच्या स्त्रियांच्या बाबतीत मात्र अजिबात पहायला मिळत नाही. स्त्रियांच्या अशा वागण्याला लगेच वाईट चारित्र्याचे सर्टिफिकेट दिलं जातं. एवढंच काय घरातील पुरुष न विचारता कधीही कुठेही विना परवानगीचं जाऊ शकतो मात्र स्त्रियांना परवानगी मिळाली तरच घराबाहेर पडता येतं. समस्त स्त्री वर्गाने हे नाकारलं तर आश्चर्य वाटून घेऊ नये.

आज तिच्यावर संसार सांभाळायची जबाबदारी, घरच्यांसाठी हवं नको बघायची जबाबदारी तिची, वंश वाढवायची जबाबदारी तिची, मुलांवर संस्कार करायची जबाबदारी तिची, मुलांचं हवं नको त्यांचं शिक्षण बघायची जबाबदारी तिची, आजारपण दुखणं खुपणं बघण्याची जबाबदारी तिची, सणवार करायची जबाबदारी तिची, आलं गेलं पै पाहूणा बघायची जबाबदारी तिची, आपल्या चाली रीती, रूढी परंपरा सांभाळायची जबाबदारी तिची, रोजचं जेवणखाण, चवीचं, गोडधोड करायची जबाबदारी तिची, नवऱ्याचं सासू सासऱ्याचं सांगितलेलं सर्व ऐकायचं आणि ते म्हणतील तसंच वागायचं ही सुद्धा जबाबदारी तिचीच. किती ह्या जबाबदाऱ्या!. या जबाबदऱ्यांचं, अपेक्षांचं, कर्तव्याचं ओझं वाहून वाहून ती पुरती वाकली आहे.

हक्क आणि कर्तव्य एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. कर्तव्य बजावण्याचं ओझं तिच्या माथी आहेच मात्र त्याबरोबर तीला तिचे हक्क, तिचे अधिकार आहेत का?  या प्रश्नाचं उत्तर खरं तर तिच्या आयुष्यात असणारे पुरुष म्हणजेच तिच्या वडिलांनी, भावाने, नवऱ्याने, सासऱ्याने, दिराने दिलं पाहिजे आणि तिच्या मुलाने सुद्धा दिलं पाहिजे.  

जन्म मृत्यू च्या या फेऱ्यात तिला तिच्या आयुष्यात होणाऱ्या सर्व चढ उतारांना सामोरं जात असताना मानापमानाच्या, अन्यायाच्या, शारीरिक व मानसिक अत्याचाराच्या, लैंगिक शोषणाच्या, शारीरिक हिंसाचाराच्या जखमा शरीरावर आणि मनावर घेऊन जगावं लागत आहे. या जखमा भरून निघण्यासाठी तिला गरज आहे सुरक्षित वातावरणाची, स्वातंत्र्याची, स्वाभिमानी आयुष्य जगण्याची, स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाची, मानसिक व भावनिक आधाराची, प्रेमाची आणि आपुलकीच्या चार शब्दांची. 

अजून किती काळ सत्त्वपरीक्षा द्यावी लागणार आहे तिला तिच्या अस्तित्वाची. खरंतर सकल मनुष्यजनाची तूच निर्माती आहेस. तुझ्या उदरातूनच मनुष्य निर्मिती होते. तुझ्यामुळेच सकल मनुष्यजनांस या जगात येण्याचं भाग्य लाभतं आणि त्यांना त्यांचं अस्तित्व प्राप्त होतं. मात्र याच निर्माण कर्तीच्या अस्तित्वाचा, तिच्या स्वातंत्र्याचा, तिच्या स्वाभिमाचा , तिच्या आदराचा, तिच्या सन्मानाचा प्रश्न कालही अनुत्तरित होता, आजही अनुत्तरितच आहे आणि कदाचित उद्याही....???


माझ्या सर्व मैत्रिणींना, भगिनींना  

जागतिक महिला दिनाच्या  हार्दिक शुभेच्छा

🙏🙏 💐💐🌹🌹 🙏🙏




लेखन,
डॉ. मनिषा पाटील - मोरे
व्हाट्सएप 9511775185


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या