मुलींना मुलगा म्हणून नाही तर मुलगी म्हणूनच वाढवा

 

मुलींना मुलगा म्हणून नाही तर मुलगी म्हणूनच वाढवणार


मुलगा मुलगी भेदभाव


जागतिक महिला दिन साजरा करत असताना आवर्जून उल्लेख करावा लागेल तो म्हणजे आमचीच एक मैत्रीण हिच्या आयुष्यात घडलेल्या खूप महत्वाच्या निर्णयाचा. ही माझी मैत्रीण लग्न होऊन सासरी आली. लग्न झाल्यानंतर एका वर्षातच त्यांना पहिली मुलगी झाली. तिला आणि बाळाला बघायला येणाऱ्या सर्व बायका तिला ऐकवायच्या की, " एवढा पहिला पोरगा झाला असता बरं झालं असतं". "पहिलं पोरगं असलं म्हणजे पुन्हा काय का होईना". ही विचारसरणी आज आपण एकविसाव्या शतकात वावरत असताना, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात वावरत असताना देखील पहायला मिळते. 

तिची मुलगी हळू हळू मोठी होऊ लागली. मग नवरा बतकोने पुन्हा दुसऱ्या मुलासाठी विचार करायला सुरुवात केली. माझी मैत्रीण प्रेग्नेंट राहिली. मात्र प्रेग्नेंट राहिल्या दिवसापासून तिच्या मागे रिप रिप सुरू होती. या वेळेस मुलगाच झाला पाहिजे. आपण चेक करून घेऊ. मुलगा नसेल तर अबोर्शन करून घेऊ. बघता बघता तीन साडेतीन महिने झाले. तिच्या सासरच्या मंडळींनी सोनोग्राफी कुठे करून मिळते याची चौकशी केली. सोनोग्राफी ची तारीख घेतली आणि तिला घेऊन सोनोग्राफी ला गेले. 

तिच्या हृदयाचे ठोके हळू हळू वाढले होते. तिच्या डोक्यात असंख्य प्रश्नांनी घेराव केला होता. नर्सनि जसं तिचं नाव पुकारलं तसं तिच्या पोटात गोळाच आला आणि तिची धडधड अजूनच फास्ट झाली. 

ती आतमध्ये गेली. डॉक्टरांनी तिची सोनोग्राफी केली आणि बाहेर बसायला सांगितले. सोनोग्राफी करत असताना तिच्या डोक्यात विचारांचं चक्र मात्र सुरूच होतं. काय असेल मुलगा की मुलगी??. तिला मुलगा मुलगी काहीही चालणार होतं. मात्र तिच्या घरचे मंडळी मात्र देवाकडे सारखी प्रार्थना करत होते की, "यावेळेस मुलगा असुदे रे बाबा". 

डॉक्टरांनी तिच्या नवऱ्याला आत बोलावून घेतलं आणि काहीतरी सांगितलं. तिचा नवरा बाहेर आला तो खाली मान घालून आणि पडलेला चेहरा घेऊन. तिने ओळखलं की , यांच्या मनासारखी बातमी नाही त्यामुळेच यांचा चेहरा पडला आहे. मग सगळ्यांना ती बातमी समजली. सगळेजण नाराज होऊन घरी निघून आले. 

घरी आल्यावर एकच चर्चा सुरू होती. "एवढं पोरगं निघालं असतं तर बरं झालं असतं". हिला मात्र ना दुःख ना आनंद काहीच फरक पडला नव्हता. मुलगी आहे म्हंटल्यावर मग आता तिचं अबोर्शन केलं पाहिजे. डॉक्टर बघितला पाहिजे. डॉक्टरांकडून अपॉइंटमेंट घेतली पाहिजे ही बोलणी सुरू होती. ही मात्र आपली रोजची कामं करायची आणि घर आवरायचं यात बिझी होती.

मग तो दिवस उजाडला. तिला सांगण्यात आलं की, आपण डॉक्टर कडे जाणार आहोत. सगळी कामं लवकर उरकून घे. तिने नेहमीप्रमाणे लवकर उठून तिची घरातील रोजची कामं उरकली. तिला तीच्या नवऱ्याने आवरायला सांगितलं. ती वरती आपल्या रूम मध्ये गेली पटपट सगळं आवरून खाली आली. घरचे जेंव्हा गाडी काढायला लागले आणि तिला गाडीत बसायला सांगितलं तेंव्हा ही धायमोकळून रडायला लागली. ती एवढ्या मोठयाने रडत होती की कुणालाच समजेना नेमकं काय झालं!!. 

वरच्या रूम मधून खाली येता येताच ती भिंतीला धरून मोठं मोठयाने रडत होती. तिचे हुंदके एवढे मोठे होते की असं वाटत होतं की तिला कुठली तरी दुःखद बातमी समजली आहे त्यामुळे एवढ्या मोठ्याने ती रडत आहे. तिला पाणी प्यायला दिलं आणि थोडं शांत केलं. 

ती शांत होता होताच पुन्हा मोठ्याने रडायला लागली आणि म्हणाली, " माझं बाळ माझ्याशी बोलायला लागलं असं मला वाटतंय". ते माझ्याशी बोलताना हळूच म्हणत आहे,  "आई मी का नको आहे तुला?".  मला या जगात येऊ दे गं!!. मी तुझ्यावर खूप प्रेम करेन. मला या जगात यायच्या अगोदर नष्ट नको ना गं करू आई!!. 

हे सांगताना ती धायमोकळून रडत होती. ती म्हणत होती की, मी माझ्या बाळाला माझ्यापासून दूर नाही करणार. माझं धाडसच नाही होत त्याला माझ्यापासून दूर करायला. ते आतमध्ये ओरडत आहे. नको नको म्हणत आहे. हे सांगताना तिचे हुंदके इतके वाढत होते की तिला मध्ये मध्ये धाप लागत होती.

तिच्या घरच्यांनी तिला खाली बसवलं. पाणी प्यायला दिलं. थोडं गोड खायला दिलं. आणि तिला शांत केलं. ती थोडी शांत झाल्यावर तिच्या नवऱ्याने तिला विचारलं,  तुझी इच्छा नसेल तर राहू दे. आपण नको जाऊयात डॉक्टर कडे. हे बाळ तुझं नि माझं आपल्या दोघांचं आहे. आपण त्याला जन्म देऊ. त्याला या जगात आणू. तिला खूप मोठं करू. खूप शिक्षण देऊ. स्वाभिमानाने जगायला शिकवू. स्वतःच्या पायावर उभं राहायची ताकद देऊ. बळ देऊ.

एवढं सगळं बोलल्यावर ती शांत झाली. तिचा हिरमुसला चेहरा थोडा बरा झाला. तिच्या सासू सासऱ्यानी देखील तिच्या मनाविरुद्ध न जायचा निर्णय घेतला. तिच्या निर्णयाचा मान ठेवला. तिच्या विचारांना पाठिंबा दिला. 

बघता बघता दिवस सरत गेले. नऊ महिने झाले आणि एका गोंडस मुलीला तिने जन्म दिला. आपल्या गोंडस मुलीचा गोड चेहरा पाहून  तिला झालेल्या प्रसूतीच्या वेदना ती क्षणार्धात विसरली आणि तिच्या चेहऱ्यावर गोड हसू फुललं. तिच्या डोळ्यातून घळा घळा अश्रू वाहू लागले. हे अश्रू होते त्या आठवणींचे, जे पाच महिन्यापूर्वी तिच्या हातून खूप मोठी चूक होणार होती त्या नकळत घडणार होते त्या चुकीच्या निर्णयाचे. 

मनातल्या मनात ती बोलत होती, बाळा मला माफ कर. मी चुकले. जर माझा निर्णय चुकला असता तर तू या जगात, माझ्या कुशीत आज आलीच नसतीस. मी तुला , तुझ्या गोंडस नाजूक शरीराला मुकले असते. खरं तर तुझेच खूप खूप आभार. तूच मला चुकीचा निर्णय घेण्यापासून थांबवलंस. तूच मला ओरडून ओरडून सांगितलं आणि मी तुझं ऐकलं. मला माफ कर. हे सगळं मनोमन बोलत असताना तिच्या डोळ्यातील अश्रू मात्र वाहतच होते. 

तिचा चेहरा खूप प्रसन्न दिसत होता. आणि आपल्या हातून काही चुकीचं घडलं नाही , निष्पाप कोवळ्या जीवाला या जगात यायच्या अगोदरच संपवलं नाही, हे पाप आपल्या हातून झालं नाही या गोष्टीचा तिला अभिमान वाटत होता.

तिच्या आयुष्यात ती आणि तिचं कुटुंब तिच्या दोन मुलींसह खूप खूष आहेत. ती तिच्या दोन मुलींना मुलगा समजून नव्हे तर मुलींना मुलगी समजूनच संस्कार करत आहे. दोघींना ही खूप मोठं करायचं, खूप शिकवायचं आणि एक स्वाभिमानी, जबाबदार मुलगी बनवायचा चंगच जणू त्यांनी बांधला आहे.

"मुलींना मुलगा म्हणून नाही तर मुलगी म्हणूनच वाढवणार". एका मुलाला जे केलं जातं त्याच्यापेक्षा ही थोडं जास्तच माझ्या मुलींसाठी करणार हाच उदात्त हेतू उराशी बाळगून ती आणि तिचं कुटुंब आनंदाने मुलींना वाढवत आहेत.

ही कुठल्या टीव्ही मालिकेची किंवा मराठी किंवा हिंदी चित्रपटाची कहाणी नसुन माझ्या एका अश्या मैत्रिणीची आहे जिच्या धडसाला , जिच्या निर्णयाला जागतिक महिला दिनानिमित्त सलाम करावासा वाटत आहे.

ही एक अशी महिला आहे जिने तिच्या उदरातून येणाऱ्या कोवळ्या अर्भकामध्ये भेद केला नाही. तिला ते अर्भक मुलगा आहे की मुलगी आहे या गोष्टीचा काडीमात्र फरक पडला नाही. खरंच खूप मोठ्या शैक्षणिक पदव्या घेऊन, खूप मोठ्या पदावर काम करून देखील बहुतांश लोकांचे विचार मागासलेले असतात.

आज एकविसाव्या शतकात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात ही माझी मैत्रीण शैक्षणिक दृष्ट्या मागासलेली व कोणत्याही मोठया पदावर न जाता देखील तिच्या विचारांनी  खरंच खूप पुढारलेली आहे. तिचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. 

जागतिक महिला दिनानिमित्त तिच्या ह्या धाडशी निर्णयाला सलाम आणि तिच्या दोन्ही मुलींना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. 🙏🙏 💐💐


लेखन,
डॉ. मनिषा पाटील - मोरे
व्हाट्सएप 9511775185


टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

कृपया तुमच्या प्रियजनांना लेख शेअर करा आणि तुमचा अभिप्राय जरूर नोंदवा. 🙏 🙏