Life Without My Daughter

 Life Without My Daughter

तुझ्या शिवाय


माझ्या मुलीशिवाय माझं आयुष्य


Life without my daughter


खरं तर टायटल इंग्लिश मध्ये देण्याचं कारण म्हणजे, वाचताना आणि बोलताना 'लाईफ विदाऊट माय डॉटर' आणि

'माझ्या मुली शिवाय माझं आयुष्य' 

या दोन टायटल मध्ये खूप फरक वाटतो. पण हे तितकंच खरं आहे की, इंग्लिश मध्ये लिहा किंवा मराठी मध्ये भाषा बदलली म्हणून भावना बदलत नाहीत. आपल्या मनातील भावनांना भाषेचं बंधन कधीच नसतं.

प्रिय मयू,

आज तुझा वाढदिवस. वीस वर्षांपूर्वी म्हणजेच 16 मार्च 2001 वार शुक्रवार दुपारी 2 वाजून 45 मिनिटांनी तुझं या जगातील अस्तित्व तुझ्या मोठ्या किंचाळी ने सुरू झालं. खरं तर तुला या जगात यायची गडबड फारच झाली होती. म्हणूनच नऊ महिने पूर्ण व्हायची तू वाटच पाहीली नाहीस. दोन महिने अगोदरच तुझं पहिलं पाऊल या जगात ठेवलंस. फक्त डिड किलो वजन होतं तुझं. तुला चेक केल्यावर सांगितलं की हिच्या बद्दल आपण 72 तास काहीही सांगू शकत नाही. त्यामुळे डॉक्टरनी काचेत ठेवण्याचा सल्ला दिला. तू एका हॉस्पिटलमध्ये आणि मी एका हॉस्पिटलमध्ये. जणू तू आल्या आल्या माझ्यावर रुसूनच बसली होतीस. नऊ दिवस तुला काचेत ठेवावं लागलं.

देवाच्या दयेने, कृपेनं आणि माझ्या प्रबळ इच्छाशक्तीमुळे 72 तास निघून गेले. तू सगळ्याच गोष्टींना चांगला प्रतिसाद देत होतीस. तेव्हा माझ्या आणि तुझ्या बाबांच्या जीवात जीव आला. हे 72 तास खूप वाईट वाईट विचारांनी गेले. नको नको ते विचार मनाला स्पर्श करून जात होते. मात्र देवाची कृपा खूप होती तुझ्यावर त्यामुळे तुझा या जगातील प्रवास सुरु झाला. 

घरी येताना डॉक्टरांनी तुझी कशा पद्धतीने काळजी घ्यावी लागेल या गोष्टींची कल्पना दिली होती. यामध्ये तुला किमान पाचसहा महिने तरी लोकांच्या पासून, गर्दीपासून लांब ठेवावं, तीनचार किलो वजन होत नाही तोवर अंघोळ घालायची नाही, टाळू भरायची नाही, काजळ लावायचं नाही, कुणाच्या हातात द्यायची नाही, नाव ठेवणं, बारसं घालणं या गोष्टी सुद्धा टाळायला सांगितल्या होत्या.

तुला फीडिंग करायचं म्हणजे माझी कसरतच असायची. तू डोळेच उघडायची नाहीस. गाढ झोपून असायची. शेजापाजरी म्हणायचे, ही रडते की नाही घरात लहान मूल आहे असं अजिबात वाटत नाही. म्हणजेच लहानपणापासूनच तुझा स्वभाव शांत होता.

तू प्यायची नाहीस त्यामुळे तुझी त्वचा अक्षरशः गोळा व्हायची. आणि तुझं वजन केलं तर ते दीड किलो वरून सव्वा किलोवरच आलं होतं. शेजारी बायका म्हणायच्या हिला मुडदूस झाला असेल. तुला डॉक्टर कडे घेऊन गेलो तेंव्हा डॉक्टर म्हणाले की, हिचे दिवस पूर्ण भरले नाही त्यामुळे ती उठणारच नाही. तुम्ही तिला दर एक दोन तासांनी पायावर टिचक्या मारून जागी करा आणि रडवा मगच ती दूध घेईल. 

डॉक्टरनी दिलेला सल्ला तंतोतंत पाळून तुझ्या वाढीसाठी योग्य ती काळजी घेतली. मग तुझ्या फीडिंग साठी एक वेळापत्रकच करून घेतलं. या वेळापत्रका प्रमाणे तुला फीडिंग केलं आणि तुझ्या प्रकृतीमध्ये खूपच बदल झाला. तुझं वजन ही वाढायला लागलं आणि प्रतिकारशक्ती ही चांगली झाली. ऋतुमान बदल झाल्यावर कधी कधी व्हायरल इन्फेक्शन सोडता तू कधीच आजारी नाही पडलीस. 

तू लहानपणापासूनच खूप शांत आणि समजूतदार होतीस. त्यामुळेच अगदी 10 दिवसांची तू, तुला घरी ठेवून बीएस्सी शेवटच्या वर्षाची परिक्षा देण्यासाठी जात होते. तू अजिबात रडायची नाहीस. माझं मात्र अर्ध लक्ष पेपरमध्ये आणि अर्ध तुझ्याकडे असायचं.

माझा शैक्षणिक प्रवास आणि तुझं बालपण एकत्रच सुरू होतं. तू तीन महिन्याची असतानाच मी एलएलबी ला प्रवेश घेतला. माझ्या शिक्षणाबरोबर तुझा मोठं होण्याचा प्रवास सुरु होता. मी एलएलबी मध्येच सोडून एमसीए ला प्रवेश घेतला.  तुझी एका एका वर्षाने वाढ होत होती आणि माझ्याकडे एक एक डिग्री येत होती. 

तू आरामात तुझ्या मावशीकडे रहायची. मी तुझ्या जवळ नाही म्हणून तू कधीच रडायची नाहीस. मावशीला तू कधीच त्रास नाही दिलास. 

आम्ही दोघांनीही तुला वाढवताना एकच स्वप्न पाहिलं होतं, आमच्या आयुष्यात आम्हाला जे काही नाही करता आलं, जे काही नाही मिळालं ते सर्व तुला द्यायचं. म्हणूनच तुला इंग्लिश मिडीयम शाळेत घातलं. तुझा शाळेचा पहिला दिवस मला आजही आठवतो. तुला वर्गात बसवलं आणि थोड्या वेळाने मी बाहेर आले. तू माझ्याकडे बघून गाल फुगवून आतल्या आत रडत होतीस तुझ्या डोळ्यातून पाणी येत होतं मात्र रडलेला आवाज येत नव्हता. ते पाहून माझे डोळे भरून आले होते. तुला एकटीला सोडून मला घरी यावंस वाटलं नाही. त्यामुळे शाळा सुटेपर्यंत मी शाळेच्या बाहेरच बसून राहिले. शाळा सुटल्यावर तुला घेऊनच घरी आले. शाळा सुटल्यावर तू जेव्हा मला पाहिलंस आणि पळत येऊन घट्ट मिठी मारलीस तो आनंद माझ्यासाठी लाखो करोडो रुपयाच्या संपत्ती पेक्षा ही मोठा होता.

माझ्या शिक्षणासोबत मी तुझाही अभ्यास घ्यायचे. तू अभ्यासात खूप चांगला प्रतिसाद द्यायचीस. माझं शिक्षण पूर्ण होत होतं आणि तुही एका एका वर्गाने पुढं जात होतीस. तुझा शाळेचा ग्राफ खूप चांगला होता. माझं शिक्षण पूर्ण झालं आणि मी नोकरीला लागले. मी तुला घरी ठेवून कॉलेज वर प्राध्यापिका म्हणून जात होते. तू तुझ्या मावशीसोबत असायचीस. तुला शाळेला सोडणं, घरी आणणं हे सर्व तुझी मावशीच करायची. पण तू कधी त्रास नाही दिलास किंवा तक्रार नाही केलीस. 

माझी नोकरी आणि तुझं शिक्षण असा प्रवास सुरु झाला. हे करता करता तू दहावी पर्यंत कधी पोहचलीस ते कळलंच नाही. खरं तर माझ्या नोकरीमुळे आणि माझी पीएचडी सुरू असल्याने तुझ्या अभ्यासाकडे माझं थोडं दुर्लक्षच झालं. पीएचडी च्या डेटा कलेक्शन साठी मला सारखं बाहेर जावं लागायचं.त्यामुळे मी तुझ्या अभ्यासाकडे पूर्ण लक्ष देऊ शकले नाही. तुझी चांगली तयारी करून घेण्यासाठी मी एक वर्ष माझ्या नोकरीला ऑफ घेतला. या वर्षामध्ये मी तुझी खूप चांगली तयारी करून घेतली. तुही खूप छान अभ्यास करून चांगले मार्क्स मिळविलेस. इंग्लिश मिडीयम मधून एवढे छान मार्क्स मिळविणारी आमच्या कुटूंबातील तू पहिलीच होतीस. 

पुढे सायन्स ला प्रवेश घेतला. 11 वी आणि 12 वी करत असताना मी तुझ्याकडे थोडी जास्तच लक्ष द्यायला लागले. तुझी जास्तच काळजी घ्यायला लागले. तुझ्याकडे लक्ष देणं, आणि सगळ्या गोष्टींची चौकशी करणं हे सर्व काळजीपोटी सुरू होतं. कारण ते वय म्हणजे कुठल्यातरी मोहाला बळी पडून भरकटण्याचं असतं. त्यामुळे आपल्या शिक्षणा कडे, करियर कडे दुर्लक्ष होतं. आणि आपलं भविष्य चुकीच्या वळणावर जाऊ शकतं. यामुळेच तुझ्याकडे थोडं जास्तच लक्ष देत होते आणि काळजी घेत होते. 

कुठलाही आईबाप आपल्या मुलांना वाढवत असताना एक जबाबदारी म्हणून नाही तर आपलं आयुष्य म्हणूनच वाढवत असतात. आपल्या मुलांना काही हवं नको ते पाहणं, त्यांना सर्व गोष्टी पुरविनं ही एक जबाबदारी आणि कर्तव्य तर आहेच पण त्यांची मुलं त्यांच्याच आयुष्याचा अविभाज्य भाग असल्यामुळे त्यांच्याच आयुष्याला एक वेगळं वळण देण्याचा प्रयत्न करत राहतात. 

प्रत्येक आईबाप आपल्या मुलांसाठी खूप मोठी स्वप्न पाहत असतात. आपल्या मुलांचं भविष्य उज्वल असावं, त्यांनी एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण करावं, समाजात एक वेगळी ओळख निर्माण करावी,  स्वाभिमानी आणि उच्च विचारी व्यक्तिमत्त्व असावं या सर्व गोष्टींसाठी माझीही धडपड सुरू असते. 

आमची एकुलती एक मुलगी. दुसऱ्या मुलाचा विचार कधी केलाच नाही. एवढंच काय तर सर्वसाधारण महिलांना आपलं पहिलं अपत्य मुलगा असावं असंच वाटत असतं. माझं मात्र वेगळं होतं. मला पहिली मुलगीच हवी होती. माझी इतकी प्रबळ इच्छा होती की मला जे हवं होतं अगदी तसंच झालं. मी तुझ्यासाठी तुझ्या जन्माच्या अगोदर पासूनच सर्व ठरवून ठेवलं होतं. तुझा जन्म झाल्यानंतर मी खुप आनंदी झाले होते. प्रसूतीच्या त्या पावूण तासाच्या मरण कळा क्षणात विसरून तुझ्याकडे पाहत होते आणि आनंदाश्रू डोळ्यातून वाहत होते.

प्रत्येक आईबापांना आपलं मूल जीव की प्राण असतं. त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होत असेल तर तो त्रास त्याच्या आईबाबांना ही होत असतो. आमचं ही तसंच आहे. तुझे पप्पा दाखवत नाहीत पण तू जेव्हा आजारी असतेस तेंव्हा त्यांना खूप त्रास होतो. तू लहान असताना एकदा अचानक खूप ताप भरला होता तेव्हा अक्षरशः तुझा पडलेला चेहरा आणि तापलेलं अंग पाहून तुझे पप्पा चोरून रडले होते.

आमच्या दोघांचंही आयुष्य तुझ्या भोवताली फिरत आहे. तुझ्या आवडी निवडी, तुझी पसंद, तुझा मूड, तुझे रुसवे फुगवे, तुझा आनंद, तुझं सुख, तुझं शिक्षण, तुझं करियर, तुझं भविष्य. या सगळ्या मध्ये फक्त तुझं आणि तुझंच आहे.

तुही आमच्यावर खूप प्रेम करतेस. आमची खूप काळजी घेते. प्रसंगी तू आमचीच आई बनून आम्हाला रागावतेस सुध्दा. आम्ही आजारी पडल्यावर तुलाही खूप त्रास होतो. आम्ही घरी लवकर नाही आलो तर तू आम्ही घरी येईपर्यंत खूप काळजीत असते हे माहीत आहे आम्हाला. 

कालपरवा एका लग्नात सामील झालो होतो. तिथं नवरी मुलीची पाठवणी करत असता तिचे आईवडील आणि ती नवरी इतके रडत होते. ते सगळं पाहून मी विचार करत होते की, उद्या माझ्याही आयुष्यात हे क्षण येणार आहेत आणि आमची मुलगी आम्हाला सोडून नवऱ्याकडे निघून जाणार आहे. ही कल्पनाच मला सहन झाली नाही. मी बाजूला जाऊन रडत बसले होते. पण हे एक ना एक दिवस होणार आहे. मात्र आम्हाला  तुझ्या शिवाय आमचं आयुष्य  सहनच होणार नाही. 

आज एकविसाव्या वर्षात पदार्पण करत असताना एक गोष्ट तू नेहमी लक्षात ठेव,  तुला तुझं एक वेगळं अस्तित्व निर्माण करायचं आहे. समाजात एक स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायची आहे. वेगळं व्यक्तिमत्व विकसित करायचं आहे. यासाठी तुला खूप शिकावं लागेल. खूप अभ्यास करावा लागेल. खूप प्रयत्न करावे लागतील. चारचौघा पेक्षा वेगळं काहीतरी करून दाखव. तुझा आत्मविश्वास वाढव. आत्मविश्वास तेव्हाच वाढेल जेव्हा तुला तुझ्या फिल्ड विषयी सर्व गोष्टींचं नॉलेज असेल. 

शिक्षण पूर्ण करून तू आता बाहेर पडशील. नोकरीच्या निमित्ताने बाहेर जाशील. तुला वेगवेगळ्या प्रकारचे लोकं भेटतील. वेगवेगळे मित्र मैत्रिणी होतील. काही चांगला मार्ग दाखवणारे असतील तर काही तुझ्या रुळलेल्या मार्गावरून तुला भरकटायला लावणारे असतील. काही क्षणिक मोहाला बळी पाडणारे असतील. क्षणिक मोहाला बळी पडून भविष्याच्या सगळ्या गोष्टी अवघड होऊन बसतील. 

तुझं बोट धरायला आणि तुला मार्ग दाखवायला आम्ही दोघे नेहमीच असू पण इथून पुढचा प्रवास करताना तुलाच बाहेर पडायचं आहे. काय चुकीचं काय बरोबर हे आता तुलाच ठरवायचं आहे. कोण आपलं, कोण परकं, कोण चांगलं कोण वाईट ह्या गोष्टी तुलाच ठरवायच्या आहेत. क्षणिक मोहाला, सुखाला बळी पडून पुढे भविष्याची सर्व गणितं बिघडून जातात. हे सर्व आता तुला ओळखायला शिकलं पाहिजे. तुला धाडशी बनायचं आहे. लाजाळू स्वभाव सोडून देऊन तुला स्पष्टवक्ती बनायचं आहे. तुझे विचार, तुझी मतं तुला समोरच्या व्यक्तीला पटवून देता आली पाहिजेत. तुझ्या विचारांवर तुझ्या भाषेवर तुझं प्रभुत्व असलं पाहिजे म्हणजे लोकं प्रभावित होतात. 

आमचं स्वप्न म्हणजे तुझं भविष्य तेच तुझंही स्वप्न आहे. ते येणाऱ्या काही वर्षात सत्यात उतरवशील ह्याची मला खात्री आहे. या समाजात तू एक जबाबदार, स्वाभिमानी, प्रामाणिक, प्रयत्नवादी आणि आशावादी व्यक्ती म्हणून एक स्त्री म्हणून जगशील याच शुभेच्छा आणि खूप खूप आशीर्वाद. 


प्रिय मयू,

 तुला खूप सुख आनंद आणि यश मिळू दे,

तुझं आयुष्य, तुझं जीवन नाजूक कोमल उमलत्या फुलाप्रमाणे फुलू दे,

 आणि त्याचा सुगंध तुझ्या संपूर्ण आयुष्यात दरवळू दे

 हीच परमेश्वराकडे प्रार्थना आणि हेच मम्मी पप्पांकडून तुला आशीर्वाद

🌹🌹🌹🎂🎂🎂🎂🌹🌹🌹🌹




लेखन,
प्रा.डॉ. मनिषा पाटील - मोरे
व्हाट्सएप 9511775185


टिप्पणी पोस्ट करा

8 टिप्पण्या

  1. मनाला भुरळ घातली या लेखाने खरंच ताई मस्त आहे लेख
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मयू 🎂🎂🎂🎂

    उत्तर द्याहटवा
  2. Mi saglyat lucky daughter ahe je mla evde prem karnare aai baba bhetle.Aj parent mla sagla khi na magta dila tumhi.Mla ky hav ky nko te sagla pahila.mi ajari padli ki mji kalji ghen ratri ch uthun bagn ki bari ahe ki nhi mi he fakt tumhich karu shakta....Je khi mjya sathi swapna pahile ahet tumhi te sagle purn karen mi....mjya exam period madhe mjya sobat jaag rahnya sathi than you....mi ajari padlyavar mji khup kalji ghenya sathi thanku....mjya bday divshi special karnya sathi thank you....mi na magta sagl khi denya sathi thank you....And last but not the least.....Mla janm dilya baddal thanks aai baba....tas mi aj parent kdhi aai baba boli nhi mummy pappa ch bolti , pn aj bole.... thank you aai baba Love You both❤️😘....Ani tras denar nhi mi as tr mi bolnar nhi mi😅....karan mi tras nhi denar tr kon denar na tumhala tras....ha pn jast nhi thoda den...Love you both❤️

    उत्तर द्याहटवा
  3. ववाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

    उत्तर द्याहटवा
  4. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

    उत्तर द्याहटवा

कृपया तुमच्या प्रियजनांना लेख शेअर करा आणि तुमचा अभिप्राय जरूर नोंदवा. 🙏 🙏