भौतिक सुख आणि आभासी दुनियेत हरवला माझा मित्र

 भौतिक सुख आणि आभासी दुनियेत हरवला माझा मित्र



भौतिक सुखाचं आभासी दुनियेत प्रदर्शन करणं म्हणजेच स्टँडर्ड लाईफ माणणारे मित्र या आभासी दुनियेत खरी मैत्री हरवून चाललेत. आधुनिक काळात, सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे आपले जीवन संपूर्ण बदलले आहे. एकेकाळी मित्रांमध्ये असलेल्या अनोख्या नात्याची आठवण करायला गेलं की मन ताजं होऊन जातं. एके काळी मित्रांची भेट झाली की, सगळ्या सुख-दुःखांच्या गोष्टी शेअर करायचो. पैसा असो किंवा नसो, आनंद नेहमीच मित्रांसोबत वाटला जायचा. मित्राच्या आनंदात आनंद मानायचो, त्याच्या दुःखात दुःख अनुभायचो.  मित्रांसाठी बऱ्याचदा छोट्या छोट्या गोष्टींसाठी सुद्धा खोटं बोलायचो, बऱ्याचदा मित्रांची बाजू घेऊन बोलायचो, कित्येकदा मित्राला वाचवण्यासाठी शिक्षकांशी खोटंही बोलायचो. ते नातं खूप निर्मळ आणि पवित्र होतं त्यामध्ये स्वार्थ कधीच नव्हता. हे मैत्रीचं नातं म्हणजे सुदामा आणि श्रीकृष्णाच्या मैत्रीसारखं होतं.  


मैत्रीत नेहमीच शेअरिंग आणि केअरिंग असायचं. प्रत्येक गोष्ट मित्रांसोबत शेअर करायचो. अगदी एक वडा-पाव सुद्धा वाटून खायचो. मित्रासाठी काहीही करण्याची तयारी असायची आणि हे सगळं कुठलाही फायदा डोक्यात ठेवून नसायचं. मैत्री नेहमीच फायद्यापलीकडची गोष्ट होती.

आज आपण मोठे झालो, आपल्यामागे नोकरी, व्यवसाय, संसार, मुलं-बाळं, घरच्यांची जबाबदारी, मुलांचं शाळा-कॉलेज या सगळ्यात अडकून पडलो. जग बदललं, जग आधुनिक झालं. नोकरीच्या शोधात सर्वजण बाहेर पडले. काळाची गरज, महागाई वाढली, सर्व खर्च वाढले. त्यामुळे आता माझा मित्र या चक्रात अडकून गेला. आता तो पॅकेज वर पॅकेज घेऊ लागला. जीवनमान बदललं. आता वडा पाव ऐवजी बर्गर आणि पिझ्झाने जागा घेतली, 5 रुपयांच्या वडा पावने आता 500 रुपयांच्या पिझ्झाने जागा घेतली, मात्र या पिझ्झामध्ये ती गोडी नाही राहिली.

प्राधान्यक्रम बदलले, कामाचा ताण, वेळेचे बंधन, डेडलाइन्स यांचा ताण, महिन्याच्या ईएमआयचा ताण, मुलांच्या शिक्षणाचा ताण, प्रमोशनचा ताण, लोकांकडे महागड्या वस्तू आहेत मग माझ्याकडेही हव्यात याचा ताण. या सर्वांचा ताण आणि तणावामुळे त्याचं खरं सुख कुठेतरी हरवत चाललं आहे. मित्र आता रोजच भौतिक सुखाच्या मागे धावू लागला आणि या सुखाच्या अनुभूती तो सोशल मीडियाद्वारे आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवू लागला.

सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण आपल्या मित्रांना काय करतो, कुठे जातो, काय नवीन अचिव्हमेंट करतो, कुठे भेटतो हे सगळं कळतं. पण खरं पाहता, या सगळ्या भौतिक सुखात मित्र खरंच सुखी आहे का मुळात हा एक प्रश्न आहे. हे जाणून घेण्यासाठी आपल्याला वेळोवेळी भेटायला पाहिजे. कारण हा ताण-तणाव सोशल मीडियाद्वारे शेअर करू शकत नाही. ती आभासी दुनिया आहे. आपल्याला प्रत्यक्ष भेटायला हवं, बोलायला हवं, आनंद प्रत्यक्षात शेअर करायला पाहिजे, नाकी आभासी दुनियेत.

आज आपलं असं झालंय की, आपण नॉन-स्टॉप धावत आहोत, आणि आपलं मैत्रीच निर्मळ नातं मागे टाकून चाललो आहोत. धावता धावता आभासी दुनियेत हरवून चाललो आहोत. या आभासी दुनियेत लोकं फक्त लाईक आणि डिसलाईकसाठी आहेत. तुला काय होतंय, तू खरंच सुखी आहेस का, काही ताण नाही ना, हे विचारायला कोणीच नाही. आभासी दुनियेत फक्त स्पर्धा आहे, 

काही गोष्टी असतात जिथं आपण सर्वांसोबत शेअर करू शकत नाही, ते फक्त आपल्या मित्रांसोबतच शेअर करू शकतो. आणि हे शेअरिंग आजच्या काळात खूप गरजेचं आहे. कारण आपण रोज टनभर ताण घेऊन जगतो. या ताणांमुळे शरीराच्या व्याधी सुरू होतात, कधी डिप्रेशन येतं, कधी बीपी वाढतो, कधी हार्ट अटॅक येतो, आणि आत्महत्या तर वाढतच आहेत. एकटेपणा वाढतो, ताण वाढतो आणि मग याचा परिणाम म्हणून आत्महत्या होते. कितीतरी आत्महत्या आपण रोज पाहतो.

चिंतामुक्त, तणावमुक्त, आरोग्यदायी जीवन जगायचं असेल तर तुमचा मित्र फक्त आभासी दुनियेत असून उपयोगी नाही. तो प्रत्यक्ष तुमच्या बरोबर असायला पाहिजे. भास आणि आभास यापलीकडे आपली प्रत्यक्ष जी दुनिया आहे त्यामध्ये आपले मित्र नेहमीच आपल्या सोबत असायला पाहिजेत. बघा मग तुमचा तणाव, तुमचा ताण कसा कमी होतो, तुम्ही तुमचं मन मोकळं कराल, महत्वाच्या गोष्टी तुमच्या मित्राशी बोलण्याने तुमचं मन मोकळं होईल आणि याचा परिणाम म्हणजे तुम्हाला वेगवेगळे सल्ले मिळतील, वेगवेगळ्या आयडिया मिळतील आणि तुमचं टेन्शन चुटकीसरशी निघून जईल.

म्हणूनच, मित्रा आता विचार कर की तुला खरंच सुख हवं आहे का फक्त आभासी दुनिया? खऱ्या नात्यांना पुन्हा जिवंत करा. आपल्या जिवाभावाच्या मित्रांना पुन्हा शोधा आणि त्यांच्या सोबत असलेल्या अनमोल क्षणांचा आनंद घ्या. पुन्हा एकदा जुन्या अनमोल आठवणींचा काजीना उघडा, आणि पुन्हा मैत्री नव्याने जगा. 

आपण सगळेच या आभासी दुनियेत खूप अडकून गेलो आहोत. आपल्याला वाटतं की सोशल मीडियावरच्या लाईक्स आणि कमेंट्स मध्येच खरं आनंद आहे. पण खऱ्या मैत्रीत, खऱ्या नात्यांमध्ये, खऱ्या संवादात जो आनंद आहे तो या आभासी दुनियेत कधीच सापडणार नाही.

आजच एक पाऊल पुढे टाका आणि आपल्या जिवाभावाच्या मित्रांशी संपर्क साधा. त्यांच्यासोबत वेळ घालवा, त्यांचं सुख-दुःख जाणून घ्या. खऱ्या नात्यांचा आनंद अनुभवा. मैत्रीसारखा अनमोल खजिना जपा.


पार्टी नकोय मित्रा तुझी, कधीतरी येऊन भेटत जा

काय चाललंय मनात तुझ्या, भेटून फक्त बोलत जा

मोकळं सोड स्वतःला, कधीतरी मोकळं होत जा

हलकं वाटल तुझं तुला, मन रिकामं करत जा

जुन्या आठवणी गप्पा गोष्टी, आमच्यात सुद्धा रमत जा

आलेच कधी वाईट विचार, बिनधास्त फोन करत जा

काय आहे आयुष्य अजून, निदान मनातलं तू वाटत जा

पहा किती फरक पडतो, आनंद तेवढा लुटत जा

जीवनाच्या उत्तर्धात आलोय आता, संपर्कात तेवढं रहात जा

काय हवं काय नको, कुणालातरी सांगत जा

मित्र असतात कशासाठी, मैत्री तेवढी जपत जा

आम्ही कसं मस्त जगतो, तसंच मस्त जगत जा

अरे पैसा नाही लागत त्याला, मनातलं मात्र सांगत जा

पार्टी नकोय मित्रा तुझी, येऊन फक्त भेटत जा।




दीये जलते हैं, फूल खिलते हैं,
बड़ी मुश्किल से मगर दुनिया में दोस्त मिलते हैं।
दीये जलते हैं, फूल खिलते हैं,
बड़ी मुश्किल से मगर दुनिया में दोस्त मिलते हैं।



मैत्री दिनाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा 💐💐


लेखन,
प्रा. डॉ. मनिषा पाटील - मोरे







टिप्पणी पोस्ट करा

3 टिप्पण्या

कृपया तुमच्या प्रियजनांना लेख शेअर करा आणि तुमचा अभिप्राय जरूर नोंदवा. 🙏 🙏