समज आणि गैरसमज

समज आणि गैरसमज



काल खूप दिवसांनी मी आणि माझी मैत्रीण भेटलो आणि खूप गप्पा मारल्या. आह्मी दोघींनी खरंतर खूप वर्षे  एकत्र काम केलेलं. मात्र आता ती वेगळ्या ठिकाणी आणि मी वेगळ्या  ठिकाणी काम करत आहोत त्यामुळे आता जास्त भेटणं होतच नाही. आमच्या दोघींच्या संवादाचं माध्यम म्हणजे फोन. फोनवर मात्र आम्ही तास न तास बोलत राहतो. आम्हाला कशाचंही भान राहत नाही. दोघींच्या संवादातून नक्कीच नव नवीन गोष्टी समजतात, काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, फॅमिली विषयी माहिती मिळते, कुणाचं सध्या काय चाललंय समजतं. काल मात्र आम्ही ठरवून भेटलो. इकडच्या तिकडच्या खूप गप्पा चालू होत्या. आम्ही दोघी बोलत होतो मात्र माझी मैत्रीण नेहमी दिलखुलास बोलणारी, मस्करी करणारी, जिला सांगावं लागायचं की बाई गं बास करू आता बोलणं, कामं तशीच पडलेत ती माझी मैत्रीण आज मात्र खुप कमी बोलत होती आणि हे माझ्या लक्षात आलं. 

मी तिला विचारलं, काय गं सर्व ठीक आहे का? काय झालं, आज तू नेहमीसारखी दिसत नाहीस. त्यावर ती म्हणाली की ,

एखाद्याचा गैरसमज झाला असेल तर तो आपण दूर करू शकतो, मात्र एखाद्याने आपल्या विषयी चुकीचा समज करून घेतला असेल, आपल्याविषयी एक चुकीचं ठाम मत बनविले असेल तर ते कसं दूर करणार?

आपल्याविषयी एखाद्याने चुकीचं ठाम मत बनविलं असेल तर आपण कितीही ते दूर करायचा प्रयत्न केला किंवा आपली बाजू मांडायचा प्रयत्न केला तर समोरच्याला ते ऐकायचं नसतं. कितीही तुमची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा काहीही उपयोग होत नाही, ती फक्त एक औपचारिकता बनते. तुम्ही तुमची बाजू मांडण्यागोदरच तुमच्याविषयी ज्यांनी एक चुकीचं मत, चुकीचा समज बनविला आहे तिथं तुम्ही कितीही जीवतोडुन सांगितलं की हे चुकीचं आहे, गोष्टी अशा नाहीत, याचा काहीही उपयोग नाही, हे सर्व व्यर्थ आहे. 

कसं असतं, तुम्ही दहा चांगल्या गोष्टी करा त्या लक्षात राहत नाहीत मात्र तुमची एक चुकीची गोष्ट सर्वांच्या लक्षात राहते. आणि अशाच गोष्टींमुळे जर आपल्या विषयी एखाद्याने पूर्व ग्रह केला असेल तर आपण कितीही स्पष्टीकरण द्यायचा प्रयत्न केला तरी त्याचा काहीच परीणाम होत नाही. 

तुम्ही एखाद्या रंगाला जांभळा रंग आहे असं समजत आहात मात्र नंतर कुणीतरी तुम्हाला ओरडून सांगत आहे की, अरे जो रंग तुम्ही जांभळा आहे असं समजत आहात तो मूळात गुलाबी रंग आहे आणि तरीही तो जांभळाच आहे असं तुम्ही ठामपणे बोलत आहात अशा व्यक्तींना तुम्ही किती समजावत बसणार. त्यांना स्वतःलाच  जेव्हा हे  कळेल की आपण चूक करत आहोत, खरंतर आपण इतके दिवस ज्या रंगाला जांभळा रंग समजतोय तो रंग खरंतर  जांभळा नसून गुलाबी आहे तेंव्हा त्यांना त्यांची चूक कळेल. त्यांना स्वतालाच या गोष्टींचा साक्षात्कार होईल आणि आपोआपच मत बदलेल.

आपलं ही तसंच आहे, आपल्याविषयी जेव्हा त्यांना साक्षात्कार होईल की खरंच आपण ज्यांना चुकीचं समजतोय, ज्यांच्याविषयी आपण एक पूर्वग्रह करून घेतला आहे ती व्यक्ती खरंतर तशी नाहीच आहे. या गोष्टीचा साक्षात्कार जेव्हा होईल तेव्हा आपोआपच त्यांचा तुमच्याविषयीचा बदलाव त्यांच्या वागण्यातून दिसेल. 

जेव्हा तुम्हाला माहित आहे की तुम्ही काहीच चुकीचं काम करत नाही आहात, तुम्ही तुमचं कर्तव्य बजावत आहात तेव्हा तुम्हाला कुठल्याही गोष्टींचं स्पष्टीकरण द्यायची गरज भासत नाही. आपण चुकलोच नाही, कुठल्याच चुकीच्या गोष्टी केल्याच नाहीत, आपण आपल्या कामाशी प्रामाणिक आहोत तर मग कुणी आपल्या विषयी चुकीचं मत बनविले तर तो तुमचा प्रॉब्लेम नाही लोकांचा प्रॉब्लेम आहे. 

आपलं काम प्रामाणिकपणे आणि शांतपणे करत राहणं हाच यावरचा सर्वोत्तम उपाय आहे. "Action speaks louder than words" तुम्ही तुमची ऊर्जा अशा व्यक्तींना समजवण्यात, त्यांचं मतपरिवर्तन करण्यात घालवण्यापेक्षा तो वेळ तुमची क्षमता, तुमचं ज्ञान, अजून चांगलं उत्तम कसं करता येईल याकडे केंद्रित करा, नवनवीन गोष्टी शिकण्यात वेळ घालवा म्हणजे आपोआपच तुम्ही बोलण्यापेक्षा तुमचं काम न बोलताही सर्व काही सांगून जाईल. 

तुम्ही काय आहात हे तुम्ही सांगायची गरजच नाही, तुमचं कामच सर्व काही सांगून देईल. एखाद्या गोष्टीचा परिणाम आपल्या मनावर किती काळ राहतो. जसजसं वेळ निघून जाईल तसतसं हा परिणाम देखील कमी कमी होत राहील. दरम्यानच्या काळात अजून खूप काही नवनवीन गोष्टी घडत राहतील, लोकं येतील, लोकं जातील, काळच यावर सर्वगुणसंपन्न औषध आहे. 

उदाहरण द्यायचं झालं तर, पाऊस पडला की नदी, नाले, समुद्र याचं पांढरं शुभ्र दिसणारं पाणी खूप गढूळ होतं, खूप अशुद्ध होतं, कारण त्याच्यामध्ये आजुबाजुची खूप घाण, माती, कचरा मिसळला जातो. मात्र याची गढूळता काही दिवसांनी म्हणजेच पाऊस ओसरल्यावर कमी होते. कचरा असतो तो वाहून जातो आणि गाळ तळाला जाऊन बसतो.  गाळ निवळला की पुन्हा ते पाणी पांढरं शुभ्र दिसायला लागतं. आपोआपच पाण्यामधील गाळ ज्यामुळे पाणी गढूळ झालं तो तळाला जाऊन बसतो. हा नैसर्गिक गुणधर्म आहे. पाण्याचा गढुळलेला रंग पूर्ववत करण्यासाठी कुठल्याही शुद्धीकरणाची गरज नाही लागत. वेळ, काळ हेच यावरचं औषध आहे. मन कलुषित करणाऱ्या गोष्टी देखील  कालांतराने मनाच्या कुठल्यातरी कप्प्यात जाऊन बसतात आणि त्या विसरल्याही जातात.

त्यामुळे स्वतःला दोष  देत कधीच बसू नका तसेच स्वतःला कमी तर मुळीच लेखू नका कारण तुम्ही जे काही आहात, कसे आहात हे तुम्हाला माहीत आहे. तुमच्याबद्दल ज्यांनी जो काही समज करून घेतला आहे तो तुमचा दोष नाही तर त्यांचा दोष आहे. 


चालणारे दोन पाय किती विसंगत

एक मागे असतो, एक पुढे असतो

पुढच्याला अभिमान नसतो

मागच्याला अपमान नसतो

कारण त्यांना माहीत असतं

क्षणात सारं बदलणार असतं

याचंच नाव जीवन असतं

याचंच नाव जीवन असतं।



टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

कृपया तुमच्या प्रियजनांना लेख शेअर करा आणि तुमचा अभिप्राय जरूर नोंदवा. 🙏 🙏