लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी

 घासल्याशिवाय धार नाही 
तलवारीच्या पातीला
मराठ्यांशिवाय पर्याय नाही
महाराष्ट्राच्या मातीला।

दर वर्षी आपण मराठी राज्यभाषा दिन साजरा करतो. मराठी भाषा आपली मायबोली आहे. आपल्या भाषेला खूप मोठी आणि जुनी परंपरा आहे. नवव्या, दहाव्या शतकात मराठीत कोरलेले शिलालेख आजही उपलब्ध आहेत. आपल्याकडे अगदी तेराव्या शतकात लिहिलेली ज्ञानेश्वरी हा सर्वात मोठा मराठी भाषेतील प्राचीन ग्रंथ उपलब्ध आहे. 

अगदी ज्ञानेश्वरी पासून ते आतापर्यंत उत्तमोत्तम ग्रंथ मराठीत लिहिले गेले आहेत. आणि हे सर्व ग्रंथ इतर भाषांमध्ये भाषांतर केले जात आहेत. अशी ही माझी मराठी भाषा अमृताहूनही श्रेष्ठ दर्जाची आहे.

आणि मला अभिमान आहे मी मराठी असल्याचा. हा दिवस मराठीतील थोर कवी विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. वि. वा. शिरवाडकर याना आपण कुसुमाग्रज या नावाने ओळखतो. आपल्या मराठी भाषेला त्यांनी एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे. मराठी भाषेला खुप मोठा सन्मान मिळवून देण्यासाठी त्यांचा मोलाचा वाटा आहे. 

कुसुमाग्रजांनी कविता, लघुकथा, निबंध, नाटक आणि कादंबऱ्या या रूपात खूप सुंदर साहित्य लिहीलं आहे. याच त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांस ज्ञानपीठ पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले. 

मित्रानो आपल्या देशात एकूण 22 भाषा आहेत आणि यापैकी आपली मराठी भाषा ही आहे. सावता माळी, नरहरी सोनार, संत नामदेव, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, गोरा कुंभार यांनी आपल्या अभंगातून आपल्या भाषेला अजूनच समृद्ध केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या भाषेला परकीय आक्रमणापासून वाचवले. कुसुमाग्रज यांच्यासोबत मंगेश पाडगावकर, पु. ल. देशपांडे, बहिणाबाई यांनी खूप सुंदर साहित्य लिहून आपली मराठी भाषेला उच्च दर्जा प्राप्त करून दिला. 

कवी मंगेशकरांनी लिहिलेली एक कविता 

या जन्मावर या जगण्यावर 
शतदा प्रेम करावे।

या ओळी आपल्याला जगण्यासाठी खूप प्रोत्साहित करतात.

तसेच कुसुमाग्रजांनी लिहिलेली कणा कविता आजही आपल्याला ओळी गुणगुणायला लावते

ओळखलत का सर मला। पावसात आला कोणी।
कपडे होते गर्दमलेले , केसावरती पाणी।
मधल्या ओळी मी गात नाही
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
पैसा नको सर, जरा एकटेपणा वाटला
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा।

किती प्रेरणादायी, आणि स्वाभिमान जपायला, लढायला शिकवणाऱ्या ओळी आहेत या. 


संत बहिणाबाईनी किती सुंदर लिहिलं आहे पहा

अरे संसार रं संसार, जसा तवा चुलावर,
आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर।

आपल्या आयुष्यात सहजासहजी असं काहीच मिळत नाही, त्यासाठी आपल्याला खूप चटके सोसावे लागतात. आणि त्यानंतर मिळालेले सुख हे खूप अनमोल आहे. 

आजची पिढी ही इंग्रजी माध्यमातुन शिक्षण घेते, परकीय भाषा देखील शिकते, मात्र मराठी भाषेला जास्त महत्व दिलं जात नाही, आता हे मान्य आहे की बाहेरच्या राज्यात किंवा देशात गेल्यानंतर तिकडच्या भाषा येणं ही काळाची गरज आहे मात्र याचा अर्थ असा नाही की आपल्या भाषेला आपण दुय्यय स्थान दिलं पाहिजे.  आपल्या भाषेला आणि आपल्या साहित्याला आपण जपलं पाहिजे. 

आजच्या टेक्नॉंलॉजीच्या युगात आपले ग्रंथ, कविता संग्रह, अभंग तसेच सर्वच प्रकारचे साहीत्य अगदी सहजपणे इंटरनेटवर उपलब्ध आहे. वेगवेगळे डेटाबेस आहेत तिथे आपलं साहित्य उपलब्ध आहे. तुम्हाला बाहेरून विकत घ्यायची गरज नाही, तुम्ही सहजपणे पीडीएफ ओपन करून वाचन करू शकता, हे साहित्य तुम्ही तुमच्या मित्रमंडळीना पाठवू शकता.  

इंटरनेट वर मराठी कोष आहेत, तिथे  तुम्ही तुमची मतं मांडू शकता, तुम्ही ही लिखाण करू शकता. वेगवेगळे ब्लॉग्ज आहेत तिथंही मराठीतून खुपलिखान केलेलं आहे, हे मराठी ब्लॉग्ज इंटरनेटवर वाचू शकता. 

ज्यांना लिखाणाची आवड आहे मग ते कवितेच्या माध्यमातून असो किंवा लेख,चारोळी, विनोदी लेखन ज्यामध्ये तुम्हाला आवड आहे हे लिखाण तुम्ही तुमच्या ब्लॉग वर लिहू शकता. तुम्ही स्वतः ब्लॉग लेखन करू शकता. तुमचा ब्लॉग ब्लॉगर किंवा वर्डप्रेस या प्लॅटफॉर्म वरून सुरू करू शकता. 

आपण आपल्या भाषेला फक्त जपायचं नाही तर तिला अलंकारित करून अजून सुंदर बनवायचं आहे. जस की,

हिरवे हिरवे गार गालिचे
हरित तृनांच्या मखमालीचे
त्या सुंदर मखमालीवरती
पुलरणी ती खेळत होती।

बघा आपल्या भाषेला कसं नटवलं आहे. खुप सारी विशेषणं वापरून आपण सहज सोपी वाक्य सुद्धा अलंकारीत करू शकतो. म्हणूनच मला असं वाटतं की मराठी भाषा, माझी भाषा खूप सुंदर आणि समृद्ध आहे. आणि माझ्या भाषेला जपणं आणि तिला अजून समृद्ध करण्याची जबाबदारी देखील माझीच आहे. आणि म्हणूनच मला असं म्हणावसं वाटतं,

लाभले आम्हास भाग्य
बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी।


मराठी भाषा दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा💐💐💐






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या