पत्रास कारण की,

 पत्रास कारण की,




आदरणीय सर,

स. न. वि. वि.

पत्रास कारण की, 

आज शिक्षक दिन आहे. तुम्हाला शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.

गुरुर ब्रम्हा गुरुर विष्णू, गुरुर देवो महेश्वरा

गुरुर साक्षात परब्रम्ह तसमये श्री गुरुवे नमः

खूप वर्ष झाली खरं तर पण तो काळ ते दिवस अजूनही आठवणीत जपून ठेवले आहेत. आजही तुमचे शब्द आठवतात सर, तुम्ही नेहमी म्हणायचा "विध्यार्थ्यांनो तुमची स्पर्धा ही तुमच्या वर्गाशी नाही तर ती  संपुर्ण जगाशी आहे".  तुम्ही असंही म्हणायचा की, "मी जे काही बोलतो आहे कदाचित ते तुम्हाला आता नाही कळायचं" पण जेव्हा कळेल तेंव्हा वेळ निघून गेलेली असेल".  वेळ ही अशी गोष्ट आहे ती एकदा निघून गेली की तुम्ही पुन्हा मागे आणू शकत नाही.

तुमचं वय शिकायचं आहे, नवनवीन गोष्टी आत्मसात करायचं आहे, स्वतःमध्ये चांगले संस्कार आणि शिष्टाचार अंगिकारायचं आहे, खूप ज्ञान ग्रहण करण्याचं आहे आणि याच ज्ञानच्या जोरावर खूप सारा आत्मविश्वास येईल आणि एकदा का ज्ञान आणि आत्मविश्वास आला की तुम्ही स्वतःला सिद्ध करू शकता, जगाशी स्पर्धा करू शकता, या महाकाय जगात तुम्ही स्वतःची ओळख निर्माण करू शकता, जगावर साम्राज्य करण्याचं  सामर्थ्य तुमच्यात येईल. 

सर तुम्ही सांगायचात की, काळाचं चक्र खूप पटकन फिरत असतं. काळाच्या चक्राबरोबर तुम्हालाही चालायचं आहे, एक एक क्षण खूप महत्त्वाचा आहे, या क्षणांचा तुम्ही उपयोग करून घ्यायचा आहे, या क्षणांचा पुरेपूर फायदा करून घ्यायचा आहे, हे क्षण आनंदाने जगायचे आहेत, या क्षणांच्या आठवणी साठवून ठेवायच्या आहेत. 

जो थांबला तो संपला.  जो प्रवाहाबरोबर चालेल त्याचीच प्रगती होईल. तुम्ही म्हणायचात की हे अनुभवाचे बोल आहेत. वाचाळ बडबड नाही, किंवा तुम्हाला तत्वज्ञान शिकवत नाही. मात्र भविष्यात एक दिवस नक्कीच तुम्हाला आठवेल सर जे सांगत होते ते खरंच होतं.  सर आज सर्वकाही आठवत आहे.

सर तुम्ही नेहमी सांगायचात की, विद्यार्थ्यांनो तुम्ही इतरांची फसवणूक करू शकता मात्र स्वतःची फसवणूक कधीच करू शकणार नाही. तुम्ही आयुष्यात यशस्वी झाला तर ते तुमच्या प्रबळ इच्छाशक्तीमुळे प्रामाणिक प्रयत्नांमुळे, आशावादी दृष्टिकोनामुळे असेल आणि समजा तुम्ही अयशस्वी झालात तर ते तुमच्याच कर्माचं फळ असेल. त्यामुळे तुम्ही इतरांना दोष देऊ शकत नाही. 

सर तुम्ही म्हणायचात की, आपण आपल्या आयुष्यातील बराचसा वेळ इतरांची उणीदुनि काढण्यात घालवतो. अमक्याने काय केलं, तमक्याने काय केलं ह्या गोष्टींत लक्ष देतो आणि आपण काय करणार आहोत किंवा आपल्याला काय करायचं आहे, आपलं ध्येय काय आहे, आपल्याला कुठं जायचं आहे हे विसरून जातो आणि यामुळेच आयुष्यात खूप मोठं नुकसान करून बसतो.  या सर्व गोष्टींमुळे आपला मेंदू आपल्या स्वप्नांवर आपल्या ध्येयावर केंद्रित न होता इतरांवर केंद्रित होतो आणि आपण आपल्या ध्येयापासून विचलित होतो.

स्वप्न ती नसतात जी झोपेत पडतात तर स्वप्नं ती असतात ज्याने तुमची झोप उडते.     स्वप्नं डोळ्यात साठवून ठेवू नका अश्रूबरोबर वाहून जातील ती हृदयात ठेवा, डोक्यात ठेवा जेणेकरून ते पूर्णत्वास नेण्यासाठी तुमची झोप उडेल. तुम्ही इतकं ध्येय वेडं असलं पाहिजे की ते पूर्णत्वाला नेण्यासाठी तुमची झोप उडाली पाहिजे.

सर काळ बदलला, जग खूप प्रगत झालं, सर्व गोष्टींची माहिती फक्त एका क्लिक वर मिळू लागली पण सर या तंत्रज्ञानाच्या युगातही तुमचं महत्त्व यत्किंचितही कमी नाही झालं. तुमचा सल्ला, तुमची शिकवण, तुमचे संस्कार, विध्यार्थ्यांना समजून घेणं, त्यांचं मन ओळखून त्यांना सल्ला देणं, अनुभवांची शिदोरी कशी आणि कुठे उघडायची याची शिकवण, ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते ही शिकवण हे सर्व पुढे नेऊन ज्ञान दनाचं हे व्रत एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे नेण्याची,  सेवा अशीच अविरत सुरू राहणार आहे.

दिशा न कळती या अंधारी

नसे आसरा, नसे शिदोरी

कंठ दाटला, आले भरुनी

लोचन काठोकाठ

गुरुविण कोण दाखवील वाट।

सर तंत्रज्ञान माहिती पुरवीतं तर तुम्ही आत्मविश्वास वाढविता, नवी उमेद जागृत करता, आशावादी दृष्टिकोन दाखविता, चांगल्या वाईटाची माहिती करून देता, स्वप्न बघायला शिकविता, बघितलेली स्वप्न सत्यात कशी उतरवायची याची शिकवण देता, धेयवेडं कसं असावं आणि आपलं ध्येय सत्यत उतरवण्यासाठी कसं प्रयत्नवादी असलं पाहिजे हे शिकविता आणि महत्वाचं म्हणजे आयुष्यभर पुरेल एवढं ज्ञान आणि संस्कारांची शिदोरी देता. 

सर हीच शिदोरी घेऊन आयुष्यात छोटीशी ओळख निर्माण करायचा प्रयत्न करत आहे. तुमची शिकवण नेहमीच बरोबर राहील. 

सर तुम्ही बोलायचात की, रुळलेल्या वाटेवरून कोणीही चालेल रे, तुम्ही तुमचा मार्ग स्वतः ठरवा आणि असं काहीतरी आयुष्यात मिळवा की लोकं तुमच्या मार्गावरून चालतील, तुमचं उदाहरण देतील.

सर आज शिक्षक दिनाचं औचित्य साधून मला कवी कुसुमाग्रजांची 'कणा' कविता आठवते,

भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले,

प्रसाद म्हणून पापण्यावरती पाणी तेवढे ठेवले।

मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा

पाठीवरती हात ठेवून, तुम्ही फक्त लढ म्हणा।

आयुष्यात कितीही संकट आली, हरलो, दमलो, थकलो तरीही सर तुमची शिकवण एवढी आहे, संक्रारांची शिदोरी एवढी आहे की त्यामध्ये पुन्हा उभं राहण्याची ताकद, बळ, सामर्थ्य नक्कीच येईल.

सर विंदा करंदीकरांनी लिहिलेली कविता 'घेता' यामध्ये खूप छान लिहिलं आहे,

देणाऱ्याने देतजावे,

घेणाऱ्याने घेत जावे।

घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे 

हात घ्यावे।


ज्ञान दानाची ही सेवा आमच्या हातून ही अशीच  अविरतपणे घडो, बस एवढेच आशीर्वाद द्या.

कळावे,

तुमचीच विद्यार्थ्यांनी




लेखन,

प्रा. डॉ. मनिषा पाटील - मोरे

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या

कृपया तुमच्या प्रियजनांना लेख शेअर करा आणि तुमचा अभिप्राय जरूर नोंदवा. 🙏 🙏