का होतोय लग्नाचा खेळखंडोबा???

का होतोय लग्नाचा खेळखंडोबा???





आजकाल लोकं लग्न टिकवतात की टिकवल्याचा भास निर्माण करतात....



लिहायला तरी घेतलं. पण याचं टायटल काय लिहावं तेच सुचत नव्हतं. मग विचार केला लिहून तरी काढावं. टायटलचं पाहता येईल नंतर. असं ठरवून मनात जे काही विचार आले ते मांडायचा प्रयत्न केला.

लिहायला घेण्याचं औचित्य म्हणजे माझ्या लग्नाची 20 वर्षे पूर्ण होत होती. माझा संसार वीस वर्षाचा झाला होता. या वीस वर्षांत प्रेम अनुभवलं, आनंद अनुभवला, सुख उपभोगलं, एकमेकांविषयी काळजी वाटली, कडाक्याची भांडणं झाली, रुसणं फुगणं ही झालं, अन्नत्याग ही करून झाला, मग एकमेकांना मनवणं आपसूकच आलं, एकमेकांच्या विचारांमध्ये मतभेद नेहमीच झाले तरीही नेहमी एकमेकांना समजून घेतलं, सुखाच्या आणि आनंदाच्या चाहुलीबरोबरच दुःखाची छाया सुद्धा पडली, बऱ्याचदा विचार यायचे, काय आहे आपलं नशीब?? पण तरीही कधी डगमगले नाही. ध्येयापासून जराही हालले नाही. लग्न मोडण्याचा किंवा आपल्या आयुष्यात दुसरं कुणालातरी स्थान द्यावं असा विचारही कधी मनाला शिवला नाही. 

अर्थात नोकरी करत असताना प्रत्येक दिवशी कामाच्या ठिकाणी विचित्र नजरा कळायच्या. स्त्री ला जणू देवाने दिलेली देणगीच असते. तिला समोरचा व्यक्ती आणि त्याची नजर बरोबर कळते. अगदी तसंच नेहमी समजायचं की समोरची व्यक्ती दाखवते एक आणि त्याच्या मनात वेगळंच आहे पण कधीही माझ्या विचारांना आणि संस्काराला तिलांजली दिली नाही. 

तुम्ही म्हणाल हे काय लिहायला पाहिजे, हे तर सर्वांना माहीत आहे. यात नवीन काय आहे??.  नवीन हे आहे की आजकाल दर दहा बारा दिवसांनी अगदी लग्न झालेल्या स्त्रियांचं आणि पुरुषांचं आपल्या दहा पंधरा वर्षाच्या मुलांना सोडून दुसऱ्याच पुरुषाशी ,स्त्रीशी नातं जोडून लग्न करायची प्रथा सुरू झाली आहे. शहर गावांमध्ये होत आहेच मात्र खेडेगावात हे खूप प्रकर्षाने जाणवत आहे.

काल परवाच आमचेच एक मित्र ज्यांचं लग्न होऊन पंधरा वर्षे झालेली असताना आणि त्यांना बारा तेरा वर्षाची दोन मुलं असताना देखील त्यांची बायको सोन्याचा संसार सोडून दुसऱ्याच त्यांच्याच घराशेजारी राहणाऱ्या पुरुषाबरोबर पळून गेली आणि दोघांनी लग्न केलं. बरं त्या दोघा नवरबायकोचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. कधी वादविवाद नाही, कधी तक्रार नव्हती. सगळं कसं गुण्यागोविंदाने चाललं असताना अचानकपणे त्यांचा संसार मोडला आणि त्यांच्या पोरांची वाताहत झाली. 

अजून एक असंच उदाहरण, चार ते पाच वर्षे लग्नाला झाली असताना आणि दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम असताना देखील पाच वर्षांचा संसार मोडून ती मुलगी दुसऱ्याच मुलासोबत संसार करायला तयार झाली. एका क्षणात सगळं काही विसरून नव्याने सुरुवात तिने केली. खरंतर हे शक्य आहे?? 

आज काल खरंच एखाद्या स्त्रीचं दुःख आणि तिला तिच्या संसारात होणारा त्रास पाहून तिचं लग्न मोडावं असं मनापासून वाटत असतं. मात्र तीच स्त्री तिचा मोडका संसार वाचविण्यासाठी जीवाचा आटापिटा करत असते. नवऱ्याचा छळ सहन करते, दुःख सहन करते, नवऱ्याचा मार सहन करते, सर्व हालअपेष्टा सहन करून कुणाकडे कोणत्याही गोष्टीची तक्रार न करता हेच माझं नशीब म्हणून संसार करते आणि दुसरीकडे सोन्याचा, सुखाचा संसार असतानादेखील दुसऱ्याच पुरुषासोबत संसार थाटला जातोय. किती विरोधाभास आहे. 

 अमीर खान आणि किरण राव या दोघांचा घटस्फोट झाला. पाणी फाउंडेशन ला काम करत असताना दोघांना पाहून किती बरं वाटायचं. किती सुखी असतील असंच सर्वांना वाटलं असेल. असे एवढे काय मतभेद असतील की दोघांवर वेगळं होण्याची वेळ आली?. 

या सगळ्या चर्चांना उत आला असताना आपण असंही म्हणतो की, हे काय चित्रपटांमध्ये तेच करतात आणि खऱ्या आयुष्यात ही तेच करतील. त्यांना काय रोज एका नटीबरोबर फिरतील किंवा लग्न करतील. करोडो रुपये कमवतात. त्यांच्यावर आणि त्यांच्या मुलांवर तसेच सोकॉलड संस्कार झाले आहेत. खूप फॉरवर्ड वागणारी ही मंडळी, वेस्टर्न कल्चर पाळणारी ही मंडळी यांचं काही खरं नसतं. हे आपणच म्हणत असतो . 

मग त्यांच्या प्रमाणेच आपण का वागतो. फिल्मी दुनिया आणि रियल लाईफ या मधला फरक केंव्हा कळेल. अर्थात इथं व्यक्ती स्वातंत्र्य आहे. प्रत्येकाला समान अधिकार आहेत. प्रत्येकाला त्याच्या आयुष्याचा निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यांच्या आयुष्यात खरंच काहीतरी वाईट , न पटण्यासारखे, न जमवून घेण्यासारखं घडत असावं म्हणूनच ते वेगळे होत असावेत. 

याचा अर्थ असा ही असू शकतो की , इतके दिवस ही लोकं त्यांचा  संसार आणि लग्न टिकवत होते, टिकवण्याचं नाटक करत होते की सगळाच भास होता??

मात्र या सर्व गोष्टींमुळे एक गोष्ट खूप गंभीर होत आहे ती म्हणजे, आजकाल मुलांची लग्न लवकर होईनात. अगदी एक एक मुलगा 30, 35, 40 वर्षाचा झाला तरी लग्न होईना. आणि लग्न झालंच तर ते टिकेना. आपापल्या प्रियकर आणि प्रेयसी सोबत पळून जाऊन लग्न करतायत आणि अगोदर झालेल्या लग्नाचा खेळखंडोबा करतायत. बिचारा नवरा अगोदर खूप वर्ष लग्न झालं नाही म्हणून टेन्शन मध्ये होता आणि आता बायको काही दिवसातच पळून गेली म्हणून टेन्शन मध्ये आहे. ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून त्याला वेड लागेल नाही तर व्यसनाच्या किंवा वाईट मार्गाच्या आहारी जाईना तर नशीब??

इथे कुणाच्या ही भावना दुखावण्याचा हेतू आजिबातच नाही मात्र गेल्या काही दिवसांत आशा प्रकारच्या घटना आमच्या जवळपासच्या खेडेगावात खूपच घडल्या. काय चूक आणि काय बरोबर हे ज्याचं त्याला कळत असतं. अर्थात हे असं का घडत आहे याचं माझं उत्तर हेच असेल की, काही क्षणात काही वर्षाचा संसार मोडून, पोराबाळांना वाऱ्यावर सोडून नवीन संसार थाटता याचा अर्थ जेवढेपण वर्ष तुम्ही एकत्र होता तो फक्त दिखावा होता. जबरदस्तीच्या बंधनात होता आणि मोका मिळाला की हेच जबरदस्तीचं बंधन झुगारून दुसऱ्याच बंधनात अडकलात.

मात्र हे असंच होत राहिलं तर लग्न या पवित्र बंधनावरून लोकांचा विश्वास उडून जाईल हे नक्की.....




लेखन,
प्रा. डॉ. मनिषा मोरे,
9511775185



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या