अजून किती काळ अनुभवायची ही विदारक परिस्थिती?

 अजून किती विदारक चित्र पहायला मिळणार या नवीन वर्षात?........



गुढीपाडवा शुभेच्छा

आज गुढीपाडवा. गुढीपाडवा हा सण हिंदुधर्मातील खूप महत्त्वाचा सण मानला जातो. या सणाने वर्षाची सुरूवात होते. नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल करण्याचा हा दिवस खूप शुभ मानला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सर्व नवीन आणि महत्वाच्या कामांचा श्रीगणेशा या दिवशी केला जातो. आनंदाची गुढी दारी उभी करून सर्व दुःख आपल्यापासून दूर राहावीत यासाठी प्रार्थना केली जाते. 

पण गेलं एक वर्ष पूर्ण झालं तरी कोरोना विषाणू ने आपली पाठ सोडलीच नाही. गेल्या वर्षी गुढीपाडव्याच्या निमित्ताने सकल जनांनी प्रार्थना केल्याच होत्या की, आमच्या देशाला लागलेलं हे कोरोनाचं ग्रहण लवकरच जाऊ दे , इडा पिडा टळू दे आणि वर्षाची सुरुवात मंगलमय होऊ दे. मात्र एक वर्ष पूर्ण झालं तरी आमच्या आयुष्यातुन ही ईडापीडा काही गेलीच नाही.  

गेलेलं वर्ष, गेलेला महिना, गेलेला प्रत्येक दिवस भलेही दुःखात, कष्टात गेला असला तरी  येणारा प्रत्येक नवीन दिवस  आपल्यासाठी काहीतरी गोड, शुभ, मंगलमयी गोष्टी घेऊन येईल याच आशेवर आपण जगत असतो. येणाऱ्या प्रत्येक नवीन दिवसात आपलं दुःख, आपला त्रास कमी होईल आणि आपल्या आयुष्याची सुरुवात पुन्हा नव्याने मंगलमयी होईल या आशेवर जगणाऱ्या मनुष्य प्राण्याला आज येणाऱ्या प्रत्येक नवीन दिवसात नको नको ते पहायला, ऐकायला आणि अनुभवायला मिळत आहे. 

कोरोनानं इतकं थैमान घातलं आहे की, संपूर्ण देश कोरोना संसर्गाच्या दहशतीखाली जगत आहे. माणसाला आता कळून चुकलं आहे की जन्माला येताना एकटाच आलो आहे आणि कोरोना झाल्यावर ही आपण एकटेच दवाखान्यात जाणार आहोत. जगलो वाचलो तर ठीक नाही तर मृत्य शयेवर ही बेवारस असल्या प्रमाणे एकटेच जाणार आहोत. नाती गोती, जमीन जुमला, पैसा आडका काही कामाला येणार नाही सगळं इथंच सुटणार आहे. अर्थात हे असं मला लिहिताना आणि तुम्हाला वाचताना खूप भयावह वाटत आहे. मात्र हीच आत्ताची वस्तुस्थिती आहे.

काय सांगावं कोरोना झाल्यावर आपल्या साठी दवाखान्यात जागा असेल, प्रकृती बिघडली तर ऑक्सिजन मिळेल, प्रकृती आणखीनच खालावली तर व्हेंटिलेटर मिळेल, बेड उपलब्ध नसेल तर व्हरांड्यातच झोपून ऑक्सिजन लावावा लागेल, दवाखान्या बाहेर गाडीतच ट्रीटमेंट सुरू करावी लागेल, ऑक्सिजन ची चोरी सुद्धा करावी लागेल, कोरोनाची इंजेक्शन मिळविण्यासाठी मेडिकल बाहेर तासनतास रांगेत उभं रहावं लागेल, पुरेशा ट्रीटमेंट अभावी दवाखान्या बाहेर गाडीतच आपला जीव सोडावा लागेल. बेवारस असल्याप्रमाणे अंबुलन्स मधून घेऊन जातील आणि आपली विल्हेवाट लावतील. 

एकाच सरणावर आठ दहा लोकांना एकत्र अग्नी देण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. पुरेशी लाकडं न वापरल्यामुळे अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे कुत्र्यांनी लचके तोडताना आपण बातम्यांमधून पाहतोय.    

जगण्यासाठी आणि पोटापाण्यासाठी पैसा कमावण्याचा ताण तणाव आहेच मात्र कोरोनाच्या भीतीनं बाहेर पडावं की नाही ही गोष्ट खूप त्रासदायक आहे. बाहेर पडावं तर कोरोनाला खुलं आमंत्रण दिल्यासाखं आहे आणि नाही पडावं तर पोटापाण्याचे वांदे. करावं तर काय करावं अशी गत झालीय सर्वांची. 

एवढं मात्र नक्की आहे की, कोरोनाने माणसाला माणसापासून लांब रहायला शिकवलं. खरंतर आपण सर्वजण एकमेकांच्या सुखदुःखात सामील होऊन एकमेकाला आधार देत असतो. कोरोनाने मात्र सुख असो किंवा दुःख असो ठराविक अंतर ठेवूनच रहायला शिकवलं. 

विध्यार्थ्यांच्या परिक्षा पुढे पुढे ढकलल्या जात आहेत मात्र आपल्या आयुष्याची कोरोनाची परीक्षा रोजच सुरू आहे. ही परीक्षा रद्द ही होत नाही किंवा पुढे ही ढकलली जात नाही. रोज या परीक्षेत पास व्हायचं आहे. जो नापास झाला त्याचा प्रवास तिथेच संपला. 

आजच्या या मंगलमयी दिवशी, शुभ दिवशी सर्वांनी प्रार्थना करूया की लवकरच सर्व काही पूर्ववत होऊ दे आणि आपलं दैनंदिन जीवन सुरळीतपणे चालू दे. सुखाची, समाधानाची आणि निरोगी आरोग्याची गुढी आपल्या आयुष्यात नेहमी उभी राहू दे. सर्वाना भरपूर आणि खूप खूप निरोगी आयुष्य लाभू दे. सर्वजण आपापल्या कुटुंबासोबत, नातेवाईकांसोबत सुखा समाधानाने, गुण्यागोविंदाने नांदू देत. कृत्रिम ऑक्सिजन विना कुणाचीही घुसमट न होता सर्वाना भरपूर नैसर्गिक प्राणवायू मिळू दे आणि सर्वाना दीर्घायुष्य लाभू दे  हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 

गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा🌹🌹




लेखन,

प्रा. डॉ. मनिषा पाटील - मोरे

व्हाट्सएप- 9511775185


टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

कृपया तुमच्या प्रियजनांना लेख शेअर करा आणि तुमचा अभिप्राय जरूर नोंदवा. 🙏 🙏