डॉ. जी. वाय. शितोळे सर: शिस्त, प्रेरणा आणि नेतृत्वाचा आदर्श
आजचा दिवस अत्यंत विशेष आहे. कारण आज आमचे मार्गदर्शक, प्रेरणास्थान आणि शिस्तीचे मूर्तिमंत उदाहरण असलेले युजी स्कूल्स, श्री बालाजी विद्यापीठ, पुणे चे आदरणीय प्राचार्य डॉ. जी. वाय. शितोळे सर यांचा वाढदिवस आहे. सरांचं व्यक्तिमत्व इतकं बहुआयामी आहे की त्यांच्याविषयी लिहायला घेतलं की शब्द अपुरे पडतात.
डॉ. शितोळे सर हे शिस्त आणि परिपूर्णतेचे उत्तम उदाहरण आहेत. त्यांच्या कामात जर एखादं वर्ड डॉक्युमेंट घेऊन गेलं आणि त्यामधील चुका अगदी पटकन ओळखून सुधारित करायला सांगतात. एखादं बुलेट चुकीचं असेल, पराग्राफ अलायनमेंट चुकीचं असेल, कुठल्या शब्दाला कॅपिटल असायला हवं होतं ते नसेल, कोणती अलायनमेंट लागेल – तर सर ते लगेच ओळखतात. आणि नेहमी म्हणतात, "जरा लक्ष देऊन काम करा रे!" सरांना कामात कसलाही हलगर्जीपणा चालत नाही. ते नेहमी म्हणतात, "अरे तुम्ही थोडं माझ्याकडून शिका रे" – हे त्यांच्या परिपूर्णतेवरचे प्रेम दाखवतं.
सर हे वेळेच्या अतिशय कडक शिस्तीत काम करणारे आहेत. नॅक असो, इव्हेंट्स असो, वा इतर कोणतंही ऑफिशियल काम, प्रत्येक गोष्ट ठरलेल्या वेळेत पूर्ण झाली पाहिजे, यासाठी ते नेहमी आग्रही असतात. कोणत्याही आणि कसल्याही प्रकारे त्यांना उशीर झालेला मान्य नाही. त्यांना नेहमी तेच लोक आवडतात जे काम वेळेत पूर्ण करतात, जबाबदारी पार पाडतात आणि प्रामाणिक असतात. सरांची एक विशेष गोष्ट म्हणजे ते प्रत्येक काम स्वतः तपासून, शिस्तीत आणि प्रामाणिकपणे पूर्ण करण्यावर भर देतात.
सर्व वयोगटात आणि पदांवर असणाऱ्या व्यक्तींशी सर अत्यंत सन्मानाने वागतात. ते कोणालाही लहान न समजता, अगदी शिपाईपासून ते प्राध्यापकांपर्यंत सगळ्यांना सन्मानाने वागवतात. त्यांच्या वयाचा, अनुभवाचा आणि ज्ञानाचा विचार करता, ते इतके नम्र आहेत की आम्ही सगळे त्यांच्याकडून नेहमी शिकतच असतो.
आरोग्याबाबत सर खूप जागरूक आहेत. या वयातही त्यांची ऊर्जा, फिटनेस आणि स्फूर्ती पाहून अनेकदा वाटतं की आपल्या वयात सरांइतकी उर्जा आपल्या अंगी कधी येईल? प्रत्येक इव्हेंटमध्ये ते स्वतः सक्रीय सहभाग घेतात, आणि सगळ्या कामात अगदी वेळेआधी हजर राहतात. त्यांच्या त्या चपळतेमुळे आमच्यावर आपोआप कामाची प्रेरणा निर्माण होते.
सर हे केवळ एक शिस्तबद्ध प्रशासक नाहीत, तर संशोधन व शिक्षण क्षेत्रातील एक मान्यवर व्यक्तिमत्व आहेत. त्यांनी अनेक पीएचडी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आहे, अनेक संस्था व पदांवर काम केलं आहे, तरीही ते आजही नवीन शिकण्यास उत्सुक असतात. ते नेहमी सांगतात की " इंग्लिश बोलण्याची कला सुधारा, नवीन गोष्टी शिका, शिक्षण पद्धती सुधारवा, म्हणजे विद्यार्थी तुम्हाला चांगला फीडबॅक देतील." हे शब्द फक्त वाक्य नसून आमच्यासाठी दिशा आहेत.
विद्यार्थ्यांबद्दल सरांची आस्था खूप मोठी आहे. ते कायम म्हणतात की "विद्यार्थ्यांना 100% द्या. जर ते समाधानी असतील तर तुमचं नाव ते सकारात्मक घेतील." हे त्यांच्या शिकवण्यातील खरी तळमळ आहे. त्यांचं एक अविस्मरणीय वाक्य नेहमी आठवतं –
"नेहमी लक्षात ठेवा – तहानलेल्याला पाण्याजवळ नेणं तुमचं काम आहे, पाणी प्यायचं की नाही ते त्याचं!"हे वाक्य शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्याचं खरं प्रतिबिंब आहे.
सर हे नेहमी उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांचं व विद्यार्थ्यांचं कौतुक करतात. जर एखाद्या विद्यार्थ्याने कोणत्याही बाह्य विद्यापीठात किंवा स्पर्धेत विशेष यश मिळवलं असेल तर त्या विद्यार्थ्याचा व त्याला मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकाचा सर सर्वांसमोर गौरव करतात. त्यामुळे इतर विद्यार्थ्यांना तसेच शिक्षकांनाही प्रेरणा मिळते.
याहून अधिक खास गोष्ट म्हणजे जर कधी कोणाच्याही बद्दल काही तक्रार आली, तर सर ती गोष्ट गोपनीय ठेवतात. ते दोन्ही संबंधित व्यक्तींना स्वतंत्रपणे बोलावतात आणि अत्यंत सौम्य, सकारात्मक भाषेत सांगतात – "थोडंसं सांभाळून काम करा." आणि विचारल्यावर फक्त एवढंच म्हणतात – "तुमचा मोठा कोणीतरी सांगतोय म्हणून फक्त ऐका आणि काम करा. तुम्हाला आजून खूप पुढे जायचं आहे, खूप काही मिळवायचं आहे." ते कधीही वाद वाढवत नाहीत, चर्चा लांबवत नाहीत – फक्त सल्ला देतात आणि विषय सोडून देतात. ही एक अतिशय सुंदर आणि मोलाची गुणवैशिष्ट्य आहे.
सर नेहमी एक विचार सांगतात –
"जब तक बच्चा रोता नहीं, तब तक मां को समझ नहीं आता कि बच्चा भूखा है; तो बच्चे को रुलाना भी आपको है और खिलाना भी आपको है."हे वाक्य त्यांच्या जबाबदारी आणि समर्पणाची साक्ष आहे.
सरांच्या नेतृत्त्वामुळे आमच्या सर्व युजी स्कूल्स मध्ये सकारात्मकता, सृजनशीलता आणि सामुहिक भावना दिसून येते. सर नियमितपणे सर्व स्कूल्स ची संयुक्त बैठकीद्वारे संवाद साधतात आणि सर्व चांगल्या कामाचं खुलेआम कौतुक करतात. एखाद्या प्राध्यापकांनी काही विशेष रीसर्च मध्ये किंवा काही इव्हेंट्स मध्ये खास अशी कामगिरी केली असेल तर त्यांचं सर्वांसमोर कौतुक करतात. हेच खरंतर त्यांचं खऱ्या अर्थाने प्रेरणादायी नेतृत्व आहे.
🎂 सरांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
🙏 वाढदिवसाच्या लाख-लाख शुभेच्छा सर!
आपली शिकवण, आपली नम्रता आणि आपली कार्यशैली – आम्हा सर्वांसाठी एक अमूल्य शिदोरी आहे.
0 टिप्पण्या
कृपया तुमच्या प्रियजनांना लेख शेअर करा आणि तुमचा अभिप्राय जरूर नोंदवा. 🙏 🙏