स्त्री जन्मा तुझी कहाणी.....


ती शिक्षक, ती डॉक्टर, ती इंजिनीअर, ती वकील, ती वैमानिक, ती राजकारणी, ती शात्रज्ञ, ती सामाजिक कार्यकर्ता, ती खेळाडू, ती गृहिणी, ती अजून कुणीही असो,......

ती माझी मैत्रीण,

तिचा नित्याचा दिनक्रम म्हणजे अखंड फिरणाऱ्या चक्रासारखा असतो. सकाळ होताच सगळ्यांच्या आधी उठण्याची जबाबदारी तिचीच. बाकी सगळे अजून झोपेत असताना ती मात्र तिच्या कामाला लागलेली असते. सकाळच्या चहापासून तिच्या दिवसाची सुरुवात होते. त्यानंतर नाश्ता, मुलांचे डबे, नवऱ्याचा टिफिन… पण हे सगळं सकाळी उठल्यावर ठरवायचं नसतं बरं का, कारण त्याचं नियोजन आधीच झालेलं असतं. रात्री झोपण्याच्या आधीच उद्याची तयारी झालेली असते. काय करायचं, काय हवंय, कशाची गरज लागेल याचा विचार करून ती सगळी तयारी करून ठेवते. भाजी, शालेय तयारी, कपडे – सगळं काही नीट लावून ठेवलेलं असतं. सकाळी फक्त ते प्रत्यक्षात आणायचं असतं.

मुलांची आंघोळ, शाळेची तयारी, पाण्याच्या बाटल्या, पुस्तकं सगळी बॅगेत आहेत ना, याची खात्री करून घेत, नवऱ्याचं देखील सगळं तयार करून ठेवून ती तिच्या स्वतःच्या तयारीला लागते. सगळेजण बाहेर पडले तरी ती शेवटीच निघते. पण प्रत्येकाच्या जाण्याच्या मागे कुणीतरी उभं असतं, ते म्हणजे तीच. मॅनेजर, शेफ, वर्कर, मेड – सगळ्या भूमिका तिच्याच असतात. खरं तर या जबाबदाऱ्या तिच्यावर नाहीत, पण त्या केल्याशिवाय घर नीट चालूच शकत नाही.

"ती फक्त घर सांभाळणारी नाही, तर ती घर उभं करणारी शक्ती आहे".

घरातल्या सगळ्यांना वेळेवर नाश्ता आणि जेवण मिळावं, त्यांचं काहीही अडू नये, म्हणून ती सतत काळजी घेत असते. पैसा कितीही मिळवा, पाचतारांकित हॉटेलमध्ये रोज खा, पण शेवटी भारतीय मनाला समाधान फक्त आईच्या, बायकोच्या हातच्या जेवणातच मिळतं.

घर सावरून ऑफिसला जायला निघाली तरी तिचं मन मागेच गुंतलेलं असतं. ऑफिसमध्ये पोहोचलं की तिथे वेगळाच रोल सुरू होतो. जबाबदाऱ्या, मिटिंग्स, डेडलाईन्स, टार्गेट्स, नव्या गोष्टी शिकणं, समजून घेणं – हे सगळं करत असताना तिचं मन मात्र घरीच असतं. मुलांनी टिफिन खाल्ला असेल का, वेळेत शाळेत पोहोचले का, घरी परतले का, काही त्रास नाही ना – या सगळ्या गोष्टी सतत तिच्या डोक्यात असतात.

"तिचं  हृदय हे त्या घड्याळासारखं असतं, जे स्वतःच्या वेदना विसरून सतत इतरांसाठी चालू राहतं."

संध्याकाळी ऑफिस संपलं की पुन्हा घराचं चक्र सुरू होतं. घरी परतल्यावर ती थोडा वेळ मुलांबरोबर घालवायचा प्रयत्न करते, त्यांचे अभ्यास, त्यांचे प्रश्न, त्यांच्या गमतीजमती ऐकायच्या असतात. पण तिथेच वेळ थांबत नाही.

स्वयंपाक, भांडी, उद्याची तयारी – सगळं पार पडतं. सगळ्यांच्या आवडी जपायच्या असतात. रोज तेच पदार्थ चालत नाहीत, पौष्टिक जेवण हवं, हे लक्षात ठेऊन वेगवेगळे पदार्थ करायचे. सगळे जेवून झाले की भांडी, स्वयंपाकघर आवरणं, मुलांचं शाळेचं सगळं व्यवस्थित लावून ठेवणं – हे सगळं झालं की शेवटी तिला स्वतःसाठी वेळ मिळतो.

"ती केवळ कर्तव्य बजावणारी नाही, ती प्रेमाचा झरा आहे, जी सगळ्यांना ओलावा देते आणि स्वतः मात्र तेवत राहणाऱ्या वातीप्रमाणे जळत राहते"

आता कुठे ती अंथरुणावर पडायला लागते तेव्ह तिला आठवतं, अरे, दूध उकळायचं राहिलं वाटतं?  भाजी फ्रीजमध्ये ठेवलीच नाही. मग उठून ती कामं करून परत झोपायला जाते तोच मुलांना अचानक खोकला, ताप आला तर पुन्हा उठून औषध द्यायचं, कपाळावर पट्ट्या ठेवायच्या.. हे सगळं करताना रात्र कधी संपते कळतच नाही.

सकाळ पुन्हा उजाडते मात्र पुन्हा तीचं तेच चक्र सुरू होतं. यात कुणालाच वाटत नाही की ती कशी आहे, तिनं जेवन केलं का?, तिची तब्येत ठीक आहे का, तिची झोप पूर्ण झाली का... याऐवजी

ती मात्र भाजीला कवच नाही, मिठंच जास्त झालं, सॉक्स कुठे ठेवले याच तक्रारी ऐकत राहते. मल्टीटास्कर म्हणून ती सगळं करते, 

पण कुणाला जाणवतही नाही की तीसुद्धा थकते. तिला सुद्धा थोडं थांबावसं वाटतं, स्वतःसाठी थोडा वेळ घ्यावासा वाटतो, आवडतं पुस्तक वाचावंसं वाटतं, एखाद्या मैत्रिणीशी मनमोकळं बोलावंसं वाटतं....

मात्र,

ती जबाबदाऱ्यांचं ओझं उचालताना स्वतःला पूर्णपणे विसरून जाते.

नो संडे, नो सटरडे, हॉलिडे, नो दिवाळी वकेशन, नो समर ब्रेक,  नो येनी सिऑफ, 365 डेज 24 बाय सेवन तिची ड्युटी चालूच. 

पण कधी तरी एखादी संध्याकाळ नुसतं गप्पा मारत चहा पित बसावं, शांत बसून आवडतं संगीत ऐकावं, एखाद्या दिवशी फक्त स्वतःसाठी काहीतरी वस्तू खरेदी करवी– 

तिलाही कधी तरी सिनेमा-नाटकाला जावंसं वाटतं, मैत्रिणींसोबत मोकळेपणाने गप्पा माराव्याशा वाटतात, कुठेतरी मोकळ्या मनाने फिरावं असं वाटतं, कधी तरी मन हलकं करावं असं वाटतं. पण जबाबदाऱ्यांच्या ओझ्याने ती आणि तिचं मन संसाराच्या रहाट गाडग्यात हरवून जातं. कधी स्वतःच्या इच्छा मागे टाकल्या, जातात आणि कधी दुसऱ्यांच्या जबाबदाऱ्या तिच्या इच्छांवर भारी पडतात कळतच नाही

ती तिच्या जबाबदाऱ्यांच्या मागे धावत असते आणि वेळही तीच्या सोबत खूप वेगाने धावत असते. ति तिथेच असते मात्र वेळ हातातून निसटून जाते.  

तिला स्वतःसाठी थोडा वेळ काढण्याची गरज आहे, कारण जेव्हा ती स्वतःसाठी आनंद निर्माण करेल, तेव्हाच ती इतरांसाठीही तो वाटू शकते."

पण कधी तरी कुणीतरी तिला म्हणावं, "तू थोडा आराम कर, आम्ही करतो सगळं." कधी तरी समोर मस्त गरमागरम चहा यावा, कुणीतरी न सांगता तिच्या आवडीचा नाश्ता करून ठेवावा. कधी तरी कुणीतरी म्हणावं, "आज मी स्वयंपाक करतो, तू फक्त निवांत बस." हे सगळं विचारात जरी आलं तरी तिचं मन भरून येतं.

या छोट्या गोष्टींनी तिच्या मनाला उभारी मिळते, आणि मग ती पुन्हा नव्या जोमानं सगळ्यांसाठी कामाला लागते. कारण ती आहे—फक्त एका जबाबदारीसाठी नव्हे, तर तिच्या अस्तित्वासाठी.

"ती फक्त कुटुंब चालवत नाही, तर ती कुटुंब घडवते. तिच्या कष्टांना, त्यागाला आणि प्रेमाला सलामी."

अबला जीवन हाय तुम्हारी यही कहानी, आंचल में है दूध और आंखों में पानी..


आता ती अबला राहिली नाही सबला झाली आहे. डोळ्यात चटकन येणारं पाणी गिळून टाकायची कला तिला उपजतच अवगत आहे. फक्त गरज आहे प्रेमाच्या दोन शब्दांची. तिला तेवढंच पुरेसं आहे. 
बस ग जरा, दोन घडी जरा श्वास घे, होतील गं कामं. 
थकली असशील ना आज?

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या