स्वप्नांच्या दिशेने आत्मविश्वासाची भरारी

 

प्रिय विद्यार्थी मित्रांनो,




आजचा हा दिवस एका टप्प्याचा शेवट आणि नवीन प्रवासाची सुरुवात आहे. तुमच्या डोळ्यात स्वप्नं आहेत, मनात नवी उंची गाठण्याची जिद्द आहे. या प्रवासात तुम्ही खूप काही शिकलात, अनुभव घेतलात, चुका केल्या आणि त्यातून शिकून पुढे गेलात. पण मित्रांनो, या प्रवासात सर्वात मोठी संपत्ती कोणती असेल, तर ती आहे "स्वतःवर असलेला आत्मविश्वास!"

आत्मविश्वास असेल, तर संपूर्ण जग जिंकता येतं! थॉमस एडिसनने १००० वेळा अपयश आलं तरीही हार मानली नाही आणि अखेर विजेच्या बल्बचा शोध लावला. वॉल्ट डिस्नेला सुरुवातीला लोकांनी नाकारलं, पण त्याच्या कल्पनाशक्तीवर असलेल्या विश्वासाने त्याने संपूर्ण जगाला जिंकले. आपल्याकडेही अशी अनेक उदाहरणं आहेत – सचिन तेंडुलकरने अपयशांना न जुमानता जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. या सर्व लोकांना यश फक्त त्यांच्या कौशल्यामुळेच मिळालं नाही, तर त्यांच्यात असणाऱ्या त्यांच्या आत्मविश्वासामुळे मिळालं!


छोटीशी का होईना, पण आपली एक ओळख असावी,
चार चौघांत ती उठून दिसावी,

पूर्वी गावात एखादा शिकलेला माणूस असला की संपूर्ण गाव त्याला "साहेब" म्हणायचं. पण मित्रानो जग बदललं आज घराघरात प्रत्येकजण किमान पदवीधर आहे. आजच्या स्पर्धात्मक जगात पदव्या फक्त कागदावर राहतात, खरी ओळख निर्माण करायची असेल तर काहीतरी वेगळं करावं लागेल. कंपन्या तुमच्याकडे पाहतील तेव्हा त्यांना नेमकं काहितरी तुमच्यात दिसलं पाहिजे? तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आहात का? तुम्हाला ठराविक गोष्टींबाबत सखोल ज्ञान आहे का

तुमच्या कौशल्यांमधली चमक इतरांना दिसली पाहिजे, तरच तुमची खरी किंमत ठरेल.

मित्रांनो आजच्या AI च्या युगात तुम्हाला स्वतःला सिद्ध करावंच लागेल! कारण आता बरीच कामं AI आणि मशीन लर्निंग तंत्रज्ञानाने केली जात आहेत. मग माणसांची गरजच उरणार नाही का? उरेल, पण फक्त त्यांच्यासाठी जे आजच्या AI युगात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करतील.

आता कंपन्यांमध्ये भरती प्रक्रियाही AI द्वारे केली जाते. HR ला ज्या जॉब प्रोफाइलसाठी उमेदवारांची माहिती हवी असेल, त्याचा AI आधारित स्क्रिनिंग रिपोर्ट लगेच तयार होतो. तुमचं जॉब प्रोफाइल योग्य आहे की नाही, कोणत्या प्रकारच्या जॉबसाठी तुम्ही पात्र आहात, हे ठरवण्यासाठी AI वापरलं जातं. म्हणजेच आता प्रत्यक्ष एचआर ऐवजी व्हर्चुअल एचआर तुमचं सिलेक्शन करनार. प्रत्यक्ष एचआर ला तुमची जरा तरी दया येई कारण त्याला भावना आहेत मात्र व्हर्चुअल एचआर भावनाशून्य आहे. त्याला फक्त तुमच्या प्रोफाइल मधला डेटा कळेल आणि त्याच्या बेसिस वरच तुम्हाला तुमच्या प्रोफाइलवरून जॉब रेकमेंडेशन आणि सॅलरी प्रेडिक्शन करेल.

म्हणूनच, AI च्या या जगात टिकून राहायचं असेल, तर तुम्ही AI साठी पात्र व्हायलाच हवं!

मित्रांनो आता तुमचा "इमोशनल टच" थोडा बाजूला ठेवून मशीन टच ज्यादा अनुभवला, आणि अवलंबिला पाहिजे.  आता केवळ तांत्रिक ज्ञान पुरेसं नाही, तुम्हाला मशीन्सना शिकवता आलं पाहिजे तरच भविष्यातील तंत्रज्ञानामध्ये तुमचं स्थान असेल.

या अ‍ॅनालिटिक्स आणि प्रेडिक्शन  च्या युगात, पुढील चार वर्षांत तुम्ही स्वतःला कुठे पाहता, याच प्रेडिक्शन देखील तुम्हाला करता आलं पाहिजे!

तुमची पिढी दोन वर्षं वापरलेला मोबाईल जुना समजते आणि नवा अपडेटेड फोन घेते. मग कंपन्याही त्यांच्यासाठी नवीन कौशल्यं असलेले, अपडेटेड आणि सुधारित उमेदवार शोधणार नाहीत का? म्हणूनच नेहमी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करा आणि स्वतःला सतत सुधारत ठेवा.



तुम्ही कधी कधी प्रवाहाबरोबर चालता चालतास्वतःचा प्रवाह निर्माण करायला हवा! पाणी जिथे दिशा मिळते तिकडे वाहतं, पण जर ते एखाद्या धबधब्यातून पडून खडकांना फोडत पुढे गेलं, तरच त्याला एक वेगळी ओळख मिळते. सर्वसामान्य प्रवाहात वाहणं सोपं असतं, पण स्वतःचा वेगळा मार्ग शोधणं हेच खरं आव्हान आहे. आणि हेच आव्हान तुम्ही पेललं पाहिजे. स्वतःला सतत आव्हान द्या, अपयश पचवायला शिका आणि पुन्हा उभे राहा.

मित्रानो तुम्हाला यश नक्कीच मिळेल, तुम्ही खूप मोठे  व्हाल, पण आपले पाय नेहमी जमिनीवरच ठेवा! तुम्ही कोण झाला, किती कमावलं, यापेक्षा तुम्ही कुठून सुरुवात केली आणि कशा परिस्थितीतून इथपर्यंत पोहोचलात, हे लक्षात ठेवा. लोक काय म्हणतात, यापेक्षा त्यांनी का म्हटलं, हे समजून घ्या. यश कितीही मिळालं तरी नम्रता सोडू नका.

आपली जवळच्या माणसांना जपा! आई-वडिलांशी मनमोकळं बोला, मित्र-मैत्रिणींशी तुमच्या भावना शेअर करा. आनंदाचा क्षण एकत्र साजरा करा आणि दु:खाच्या क्षणी एकमेकांना सांभाळा. लहान-लहान क्षणांमध्ये खरी आनंदाची गुपितं लपलेली असतात. आयुष्यात कितीही पुढे गेलात, तरी तुमच्या माणसांपासून कधीही दूर जाऊ नका.

आयुष्यात कोणत्याही परिस्थितीत थांबू नका! यश मिळालं म्हणून थांबू नका, आणि अपयश आलं म्हणून मागे फिरू नका. स्वतःवर विश्वास ठेवा! जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला, स्वतःला सतत घडवत राहिलात, तर एक दिवस तुम्ही संपूर्ण जग जिंकाल.


चालत होतो वाट माझी, शोधत होतो दिशा,
स्वप्नं होती मोठी माझी, होती मेहनतीची नशा.
थोडी पडझड, थोडे हसू, थोडे अश्रू, थोडी धाव,
कधी जिंकलो, कधी हरलो, पण मनात होती ठाव.
प्रयत्नांचे पंख लावून, उंच भरारी घ्यायची,
अपयशाच्या छायेतही, जिंकायची सवय लावायची.
प्रवाहाबरोबर वाहायचं नाही, स्वतःचा प्रवाह बनवायचा,
अंधार कितीही दाटला तरी, स्वतःचा प्रकाश निर्माण करायचा!
स्वतःवर विश्वास ठेवून, नवे क्षितिज गाठायचे,
अर्ध्यावर थांबायचं नाही, स्वप्नांना सत्यात उतरवायचे.
रस्ते कितीही कठीण असले, मनात जिद्द ठेवायची,
चुकांपासून शिकत, यशाची नवी परिभाषा लिहायची! ✨🔥
 

तुमच्या पुढील प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 🚀✨

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या