माझी माय माझी आई

माझी माय माझी आई

आई माझा गुरू, आई कल्पतरू
सुखाचा सागरु आई माझी


खरंतर आम्ही चौघी बहिणी आणि एक भाऊ. परिस्थिती खूप हालाकीची, बेताचीच. कसंबसं पोट भरायचं तरीही खूप सुखी आणि आनंदी कुटुंब. पण म्हणतात ना दुधात मिठाचा खडा पडावा तसं सुखी संसाराला कुणाची तरी नजर लागली, वडिलांना खूप लवकर देवआज्ञा झाली. ज्या वेळेस आपल्या पिलांना सक्षम करण्यासाठी आपल्या बाबाची गरज होती, आपल्या पिलांना बळ देण्यासाठी, त्यांच्या पंखात ताकद देण्यासाठी बाबाची खरोखर गरज होती तेव्हा नियतीने मात्र धोका दिला, बाबा आपल्या घरट्याला आणि घरट्यातील पिलांना सोडून कायमचा दूर निघून गेला. 

मग हा मोडलेला संसार नव्याने सावरण्याची जबाबदारी आईवर येऊन पडली. ज्यावेळेस खरंतर खूप आधाराची जिला गरज होती, जिच्या आयुष्याचा जोडीदार, जिच्या संसाराचा मूलभूत कणा मोडून पडला होता तिला आज मात्र आपल्या पिलांसाठी मजबूत कणा बनावं लागणार होतं. काडी काडी करून बांधलेलं घरटं क्षणात तुटलं होत आणि हेच घरटं पुन्हा नव्याने तिला बांधावं लागणार होतं, ह्या घरट्याची विस्कटलेली घडी तिला पुन्हा नीट करायची होती. आपलं दुःख गिळुन आपल्या पिलांसाठी पुन्हा उभं रहायचं होतं. 

आई फक्त चंदन होऊन झिजत होती
आपलं सर्वस्व पणाला लावून
संसारासाठी झगडत होती।

तीने स्वतःच्या इच्छा बाजुला ठेवून मुलांसाठी तिचा प्रवास सुरु केला. शेतीवाडी पाहणं, गुरंढोरं पाहणं, मुलांचं पाहणं, स्वयंपाक पाणी सर्वकाही एकटीलाच करावं लागत होतं. एकटी बिचारी हे सर्व करता करता थकून जायची आणि कधी कधी न जेवताच झोपून जायची. पुन्हा दुसऱ्या दिवशी तसाच दिनक्रम. ऊन, वारा, पाऊस कशाचीही तमा न बाळगता तिचं हे दिनचर्य सुरू असायचं. हे सर्व बघता बघता मुलांवर चांगले संस्कार करणं, त्यांच्या शिक्षणाचं पाहणं, मुलांची चूक झाली तर त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव करून देणं, प्रसंगी रागावणं, कठोर होणं तसेच त्यांना प्रोत्साहन देऊन नवनवीन गोष्टी शिकवणं हे सर्व करत असताना ती मुलांना बाबा नसल्याची कधीच उणीव भासून देत नव्हती. आई आणि बाबा या दोघांच काम ती एकटी करत होती. 

जिचं संपूर्ण आयुष्य अडचणींनि भरलेलं होतं तीच हृदय मात्र तिच्या मुलांसाठी प्रेमाने भरलेलं होतं. 

मुलांची दुखणी खूपनी बघताना स्वतःचं दुखणं मात्र कधीच दाखवून द्यायची नाही. थकवा आणि आजारपण यांनी तिला कधी शिवलंच नाही. दिवसभर तिचं रहाट गाडग चालूच रहायचं. ती प्रसंगी स्वतः उपाशी रहायची, पाण्याचा घोट पिऊन झोपायची मात्र एकही दिवस मुलांना उपाशीपोटी झोपू  दिलं नाही.

 एकाचे दोन दोनाचे तीन बघता बघता दिवस सरत होते आणि मुलं मोठी होत होती. मुलं मोठी होत होती खरं, मात्र हा संसाराचा गाडा एकटीने ओढताना ती पुरती थकून गेली होती तरीही तो थकवा तिच्या चेहऱ्यावर कधी दिसलाच नाही. स्वतःचं दुःख लपविण्यात ती एकदम पटाईत होती. 

आता मात्र तिच्या समोर खूप मोठी जबाबदारी खरंतर ही जबाबदारी बाबा पार पाडतो, मात्र आता तीच बाबा होती. आई वडिलांच्या आयुष्यात सर्वात मोठी जबाबदारी कोणती असेल तर ती त्यांच्या मुलांची लग्न चांगल्या ठिकाणी करून देणं. यासाठी आईवडीलांना कितीतरी चपलं  झिजवावी लागतात. हे सर्व आता तिला एकटीलाच करावं लागणार होतं. तिचं स्वप्न आता एकच होतं, चारही मुलींची लग्न चांगल्या ठिकाणी करून देणं, आपल्या वाट्याला जे आयुष्य आलं ते आपल्या मुलींच्या वाट्याला न येवो यासाठी तिची धडपड सुरू झाली. 

एकदा का पिलांच्या पंखात बळ आलं की पिल्लं आपलं घरटं सोडून स्वच्छंदपणे उडून जातात अगदी तसंच एक एक करून चारही मुलींची चांगल्या ठिकाणी लग्न करून देऊन एका मोठ्या जबाबदारीतून आई मुक्त झाली. आता फक्त ती आणि मुलगा दोघेच राहिले. एक एक करून घरटं रिकामं झालं. बाराही महिने जिला अहोरात्र काम करण्याची सवय होती तिला आज थोडे सुखाचे दिवस आले. तिचं कष्ट कमी झालं होतं मात्र तिची आपल्या मुलींविषयी असणारी काळजी आजही संपली नाही. 

सोन्याचे दिवस आले, मुली आपल्या संसारात सुखी आहेत, खुश आहेत मात्र कामं करून  घट्टे पडलेले तिचे हात नेहमीच आपल्या मुलीना कुरवाळण्यासाठी, गालावरून हात फिरवण्यासाठी आसुसले असतात. या  वयात आजही मुली जेंव्हा येतात तिच्यात पुन्हा हत्तीचं बळ येतं. तिला आपल्या मुलींसाठी काय करू अन काय नको असं होतं. प्रत्येकीच्या आवडीचा पदार्थ करून खायला घालणं, पोरींची दृष्ट काढणं, पोरींसाठी नवनवीन कपडे खरीदी करणं, पोरींसाठी शिदोरी बनवून देणं, जाताना जवळ असतील तेवढे पाच पन्नास रुपये देणं, तिला जणू घर ठेंगणं पडतं. म्हणूनच,

आई एक नाव असतं

घरातल्या घरात

गजबजलेलं गांव असतं

आज हेच गजबजलेलं गांव एकटं आहे , रिकामं रिकामं आहे. प्रेमाच्या एका  शब्दासाठी आसुसलेले आहे. 

आता पुरे झालं की गं आई 

तू खूप झिजलीस आमच्या साठी 

बस झालं  आता जबाबदाऱ्यांचं ओझं,

 आता  स्वतासाठी जगायचं थोडं

सोडून दे सर्व जबाबदाऱ्या

केलंस सर्व काही आमचं

आम्ही धावू आमच्या स्वनांच्या मागे

तू मात्र धावशील मग नातवंडांच्या मागे

चक्र हे पुन्हा तुझं असंच सुरू राहील 

साठी पूर्ण झाली तुझी तरी

जगायचं तुझं राहूनच जाईल

जगायचं तुझं राहूनच जाईल।

माझ्या आईला माझा साष्टांग नमस्कार. माहीत नाही माझ्यात तिच्या एव्हढं कष्ट उचलायची  ताकद आहे की नाही मात्र मी तुला आज शब्द देते की यापुढे तुझ्या चेहऱ्यावर कधीच दुःख दिसणार नाही, डोळ्यात तुझ्या कधीच अश्रू दिसणार नाहीत, आणि दिसलेच तर ते आनंदाश्रू असतील, सर्व काही एकटीनंच केलंस मात्र आता तुला तो एकटेपणा कधीच भासू देणार नाही. तुझं गजबजलेलं गांव नेहमी तुझ्या अवतीभवती असेल. तुझं गजबजलेलं गांव पुन्हा तुझ्या अवतीभवती असेल.

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या