पत्रास कारण की,

 

बीसीए बॅच 2022


पत्रास कारण की,

प्रिय विद्यार्थी,

स. न. वि. वि.

पत्रास कारण की,

शिक्षकाचा गुणधर्म शिकवणं, सल्ला देणं, मार्गदर्शन करणं भले कुणी वीचारो वा ना वीचारो. शिक्षकी पेशा स्वीकारला की हे गुण आपसूकच येतात. आता काळ बदलला आहे. आजचं युग हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं आहे. प्रत्येक गोष्ट फक्त एका क्लिक वर मिळते. अगदी तुम्हाला काहीही हवं असेल ते तुम्हाला पटकन मिळण्याचं ठिकाण म्हणजे इंटरनेट.

पण ते मशीन आहे आणि मशीन कमांड वर चालतं. तुम्ही जोपर्यंत त्याला कमांड देत नाही तोपर्यंत तुम्हाला काहीही मिळत नाही, तुम्ही जोपर्यंत त्याला काय हवं हे सांगत नाही तोपर्यंत तुम्हाला काहीही मिळत नाही. मात्र आमचं तसं नाही, आम्हाला तशी सवयच नाही मुळी, आम्ही नेहमीच फुकटचा सल्ला द्यायला तयारच असतो, होय आम्हाला हे माहीत असतं की तुम्ही म्हणणार आहात की " आले तत्वज्ञान सांगायला ". पण आम्ही आमचा गुणधर्म अजिबात सोडत नाही.

आम्हाला बरोबर समजतं कोण विद्यार्थी काय करू शकतो, कोणाची क्षमता काय आहे, कोणामध्ये काय गुण आहेत, कुणाची झेप कुठपर्यंत जाऊ शकते, कोण फक्त वेळ काढू पणा करतात, कोण मुद्दाम खोड्या करतात, कोण मुद्दाम त्रास देतात, कोण वर्गाचं वातावरण खराब करतात, कोण आपली कुवत नसतानाही खूप हार्ड वर्क करतात, कोणी खूपच निरागस आहेत या सर्व गोष्टींची आम्हाला कल्पना असते. मात्र या सर्व गोष्टी तुमच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सला कळणार नाहीत रे. 

आम्हाला विद्यार्थ्यांचं मन वाचता येतं.  हा काही आमचा मोठेपणा नाही पण विद्यार्थ्यांच्या कडे पाहिलं की बरोबर समजतं की विद्यार्थी आनंदी आहे की दुःखी, त्यांचा चेहरा सर्व काही सांगतो.  या गोष्टी तर समजतातच पण अजूनही महत्वाचं म्हणजे तुम्ही खरोखरच शिक्षकांचं शिकवलेलं मन लावून ऐकता की ऐकण्याचं नाटक करता हे सर्व तुमचा चेहरा आणि चेहऱ्यावरील भाव सांगतात. 




जसे तुमच्या आईवडिलांना तुम्ही बरोबर कळता तसेच आम्हालाही तुम्ही हळू हळू कळायला लागता.  आणि याचमुळे तुमच्या आईवडिलांप्रमाणे तुम्ही जरी विध्यार्थी असला तरी तुमच्याबद्दल एक आपुलकी, प्रेम, आपलेपणा निर्माण होतो आणि विद्यार्थी आणि शिक्षक यापलीकडे एक वेगळं नातं निर्माण होतं. आणि जिथं नातं असतं तिथं आपलेपणा असतो आणि जिथं आपलेपणा असतो तिथं हक्क असतो आणि याच हक्काने आम्ही तुम्हाला वेळोवेळी उपदेशाचे डोस देत असतो. 

Teacher paints our mind

Guide our thoughts

Share our achievements

Advice our faults

योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळणं फार गरजेचं असतं नाहीतर वाट चुकलेल्या वाटसरू सारखं होतं. कितीही रस्ता चालला तरी तो संपतच नाही कारण कुठं थांबायचं हे माहीत नाही याचाच अर्थ काय तर कुठं जायचं हेच मुळी माहीत नसतं.  

म्हणूनच ,

तुम्हाला मार्ग दाखवतो तो शिक्षक

नाजूक पंखात बळ देऊन सामर्थ्यवान बनवतो तो शिक्षक

खचलेल्या मनात आत्मविश्वास निर्माण करतो तो शिक्षक

प्रेम, आपुलकी, मोह, लोभ, मत्सर याची ओळख करून देतो तो शिक्षक

वेळप्रसंगी कान पकडतो तो शिक्षक

आणि  पाठीवर हात ठेवून लढ म्हणतो तो खरा शिक्षक।


शिक्षक नेहमीच अनुभवांचे बोल सांगत असतात. आयुष्यात वेळेला फार महत्त्व आहे आणि हीच वेळ आपल्या हातून निसटून जाते आणि आपण काहीही करू शकत नाही.  जग खूप पुढे गेलं शिक्षकांनी कित्येक पिढ्या घडवल्या, संशोधक झाले, शास्त्रज्ञ झाले पण अद्यापही कुणी वेळेला मागे आणू शकेल असं मशीन निर्माण झालं नाही. तुमच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सला देखील हे जमणार नाही म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो वेळेला महत्त्व द्या. वेळ पळायला शिका. कल करे सो आज । आज करे सो अब। हे तुम्हाला जमलं तरच स्पर्धेत टिकून रहाल. उद्या उद्या करत राहिलात तर हजारो विद्यार्थी रांगेत उभे असतात ते तुमच्या पुढे कधी निघून जातात हे तुम्हाला कळत देखील नाही. 





हे स्पर्धेचं युग आहे.  इथं तुम्ही स्वतःला सिद्ध करावंच लागेल. स्पर्धेच्या गर्दीत तुम्ही स्वतःची ओळख निर्माण करणं गरजेचं आहे. तुमचं वेगळेपण दाखवणं गरजेचं आहे. 

छोटीशी का होईना 

आपली एक ओळख असावी

चार चौघामध्ये ती उठून दिसावी।

गर्दीचा भाग व्हायचं की गर्दीमध्ये देखील आपलं वेगळं अस्तित्व निर्माण करायचं हे तुम्हाला ठरवावं लागेल. गर्दीचा भाग बनला तर नेहमी लोकं म्हणतील तसंच वागाल आणि वेगळी ओळख, वेगळं अस्तित्व निर्माण केलं तर लोकं तुमचं ऐकतील. 

हे वेगळेपण सिद्ध करण्यासाठी फक्त तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे. आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. आपल्या कमतरता ओळखणे गरजेचं आहे. 

माणसाला आलेल्या ज्ञानाला मर्यादा असतात

मात्र त्याचं अज्ञान मात्र अमर्याद असतं

आणि याची जाणीव नसल्यानेच माणसात अहंकार निर्माण होतो।

वेळेच्या आधी आणि नशीबा पेक्षा जास्त कधी काही मिळत नाही. योग्य वेळी योग्य गोष्टी मिळण्यासाठी ती योग्य वेळ देखील तुम्हीच आणू शकता. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक महत्वाचा क्षण योग्य कामासाठी योग्य ठिकाणी खर्च केला तर लवकरच ही वेळ नवनवीन संधीच्या स्वरूपात तुमच्या आयुष्यात येते. 





शिकणे हा तुमचा गुणधर्म आहे तसं शिकवणे हा आमचा गुणधर्म आहे. शिकवण्याचं हे व्रत आम्ही नेहमीच पूर्ण करत राहू. 

देणाऱ्याने देत जावे

घेणाऱ्याने घेत जावे

घेणाऱ्याने घेता घेता

देणाऱ्याचे हात घ्यावेत।

 ज्ञानार्जनाचे हे व्रत असेच अविरतपणे चालू राहणार आहे.  एका पिढी कडून दुसऱ्या पिढीकडे हे ज्ञानदानाचं काम असंच सुरू राहील. तुमच्याकडे ही अशीच कला अवगत रहावी अशाच शुभेच्छा. 

तुमच्यामध्ये खूप सामर्थ्य आहे, याची जाणीव तुम्हाला नाही मात्र आम्हाला माहीत आहे. याची जाणीव होण्यासाठी तुम्हाला स्व परीक्षण, आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. आणि याची जाणीव तुम्हाला जेव्हा होईल निश्चितच तुम्ही गगन भरारी घेतलेली असेल.

मित्रांनो कसं आहे ना, आपलं मन आपल्या ताब्यात नसतं, आपल्या मनावर आपला ताबा नसतो आणि आपण अपेक्षित करतो की  समोरच्याने आपल्या मनासारखं वागावं. हे कसं शक्य आहे. आपल्या आवाक्यात असणाऱ्या गोष्टीचा विचार न करता समोरच्या व्यक्तीच्या आवाक्यतील गोष्टी कंट्रोल करण्यामध्ये सगळा वेळ आपण वाया घालवतो. आणि आपला अमूल्य वेळ आपल्या हातून कधी निसटून जातो हे आपल्याला कळत देखील नाही. म्हणूनच तुमचा अमूल्य वेळ सतकर्णी लावा. 


जग खूप सुंदर आहे

प्रत्येक क्षणांचा आनंद घ्या

अवतीभवती चांगले मित्रमंडळी जमवा

सुख दुःख शेअर करा

नेहमी आशावादी रहा

स्वतःच्या मनगटावर विश्वास ठेवा

तुम्ही कधीच कुणापेक्षा कमी नाही आहात

याच विश्वासाच्य, सामर्थ्याच्या   जोरावर 

खूप खूप मोठे व्हा

उंच गगनभरारी घ्या 

जिथं आकाश ही ठेंगणं पडेल

यशवंत व्हा जयवंत व्हा।





।।।।।

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

।।।।

🌷🌷🙏🙏🌷🌷








टिप्पणी पोस्ट करा

3 टिप्पण्या

कृपया तुमच्या प्रियजनांना लेख शेअर करा आणि तुमचा अभिप्राय जरूर नोंदवा. 🙏 🙏