विचारांच्या गर्तेतुन

विचारांच्या गर्तेतुन



काल बऱ्याच दिवसांनी माझ्या मैत्रिणीचा फोन आला. इकडची तिकडची चौकशी करून झाल्यावर माझी मैत्रीण थोडसं उदास असल्यासाख बोलायला लागली होती मग खोदून विचारल्यावर थोडीशी बोलती झाली आणि मला सांगू लागली...... 

 काल नेहमीप्रमाणे ती ऑफिसला गेली. आपल्या कामाशी, तत्वांशी प्रामाणिक असणारी, काम आणि कामाप्रती तिचं असणारं कर्तव्य यामुळेच ती स्वतःला कामात गुंतवून ठेवणारी अशी ती काल अचानक तिच्या बॉस ने कॉल करून ऑफिसमध्ये बोलावून घेतले त्यामुळे थोडी गोंधळून गेली.  

तिच्या केबिनमधून बॉसच्या ऑफिसमध्ये जाईपर्यंत ती स्वतःशीच बोलत होती. का बरं बोलावलं असेल सरांनी? काहीतरी काम सांगणार असतील का? काहीतरी नवीन जबाबदारी देणार असतील का? की माझं काहीतरी चुकलं असेल? माझी कुणितरी तक्रार तर केली नसेल? एक न अनेक विचार मनात फिरत होते. विचारांच्या गलतेत असतानाच ती चालत चालत ऑफिसच्या बाहेर पोहचली. ती बॉस ला विचारून आत गेली. बॉस ने तिला पाच मिनिटं बसायला सांगितले. 

बॉस च्या हातातील काम संपल्यावर तिच्याशी बोलायला सुरुवात केली. बॉसनी जनरल गोष्टी विचारून झाल्यावर तिला ज्या गोष्टीसाठी बोलावले होते ते बोलायला सुरुवात केली. त्यांना तिच्याबद्दल तीनचार गोष्टी कुणीतरी सांगितल्या होत्या. अर्थात त्या गोष्टी काही तीचं कौतुक करण्यासारख्या किंवा कौतुकास्पद सांगीतल्या नव्हत्या. तर त्या तिच्याबद्दलच्या तक्रारी होत्या. 

तिचे बॉस तिला तिच्याबद्दल ची  एक एक तक्रार सांगत होते. आणि ते ऐकून ती थक्क झाली. म्हणजे काहीतरी एक नॉर्मल चर्चेत असणाऱ्या गोष्टी तक्रारी मध्ये रूपांतरित करून सांगितल्या  होत्या. 

तिने मग तिच्या परीने या गोष्टी कश्या चुकीच्या आहेत,  तसं सांगायला सुरुवात केली. ती आपली बाजू मांडत होती मात्र या तक्रारीत एक तक्रार अशी होती की जी या कर्तव्यदक्ष, तत्वनिष्ठ असणाऱ्या तिच्याकडून नकळत घडून गेली होती. अर्थात ती गोष्ट करण्याचा उद्देश चुकीचा किंवा  अनैतिकतेला धरून अजिबात नव्हता. अनावधानाने तिच्या हातून घडलेली एक चूक होती.  

तिने ती गोष्ट स्विकारली. तिने मान्य केलं की तिच्याकडून चूक झाली. त्याबद्दल तिने माफी मागितली. आणि यापुढे अशी चूक होणार नाही याची हमी दिली. 

तिचे बॉस तिला सांगत होते, जे तिनं केलं आहे ते कसं चुकीचं आहे आणि याचे परिणाम काय होऊ शकतात. तिने झालेली चूक मान्य केली आणि तिच्याविषयी असलेल्या बाकीच्या तक्रारी कशा चुकीच्या आहेत हे ती सांगू लागली. या ज्या तिच्याविषयी आलेल्या तक्रारी होत्या त्या तिला मान्य नव्हत्या. ती स्पष्टीकरण देत होती, तिची बाजू मांडत होती मात्र कसं असतं ना, दहा चांगल्या गोष्टी निदर्शनास येत नाहीत पण एखादी चूक पटकन लोकांच्या लक्षात येते. 

तिने आपली चूक मान्य केली आणि बॉस च्या केबिन मधून बाहेर पडली. तिला खूप वाईट वाटत होतं. तिने तिची जी ओळख बनवली होती, तिची जी इमेज होती त्याला तडा गेल्यासारखे वाटत होतं तिला. ऑफिस सुटल्यावर ती घरी आली. घरीही ती खूप शांत होती. डोक्यात सारखे तेच विचार सुरू होते. रात्री तिला झोपही  नीट लागलीं नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा कामावर गेली ती खूप उदास होती मात्र तिने तिचं दुःख लपवून काम चालू ठेवलं. कामावर कोणताही परिणाम होऊ दिला नाही. चार लोकांत ती अशी वावरत होती जणू काही झालंच नाही. मात्र तिच्या मनात ती एकटीच  विचारांच्य गर्दीत होती. 

या विचारांच्या गर्दीत तिला खूप  हारल्यासारखं वाटत होतं. तिचं एक तत्व होतं की आपल्याकडे कुणी बोट दाखवायला नाही पाहिजे. आणि आता तिचं मन खात राहत होतं की, लोकांची नजर, लोकांचा तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला तरी नसेल. हे सगळं तीचं आणि तिच्या मनाचं सुरू होतं. 

तिला कधी कधी असंही वाटत होतं की, बॉस कडे पुन्हा एकदा जाऊन आपण ज्या चुका केल्याच नाहीत त्याविषयी बोलावं का?  मात्र इथे तिनं स्वतःलाच विचारलं की, तू तुझ्या म्हणण्यानुसार ज्या चुका नाहीत त्याचं स्पष्टीकरण देशील देखील मात्र जी चूक नकळत पणे तुझ्या हातून घडली त्याचं काय? ते तर दुर्लक्ष करण्यासारखं नाही ना? 

तिने स्वतःलाच सांगितले की तुझ्याकडे बोट दाखवण्यासाठी लोकांच्या हातात कुलीत तूच दिलंस ना मग लोकांना दोष देऊन काय उपयोग?. विचारांच्या गर्तेतून ती स्वतःला सावरत होती.   खच्चीकरण झालेलं मनोबल पुन्हा वाढविण्याचा प्रयत्न करत होती.  तिच्या मनातील विचारांचं वादळ शांत करण्याचं प्रयत्न ती करत होती.

लोकांनी त्यांचं काम केलं. काही लोक अशी असतात जी आपलं काही  चुकलं तर आपल्याला मार्गदर्शन करतात, आपलं मनोबल वाढविण्यासाठी मदत करतात आपला आत्मविश्वास वाढवतात, ते चांगल्या वाईट काळात सतत आपल्या बरोबर असतात याउलट काही लोकं अशी असतात की लोकांच्या पेटलेल्या चुलीवर आपली पोळी शेकून घेतात. आपल्या कमकुवतपणाचा उपयोग करून घेतात. ही लोकं अगदी वाटच पाहत असतात कशी एखादी गोष्ट त्यांच्या हाती लागते आणि कसं ते त्या गोष्टीच भांडवल करतील. 

लोकांनी कसं वागावं हे आपल्या हातात नसतं मात्र आपण असं वागावं की आपल्या कुठल्याच गोष्टी अशा लोकांच्या हाती लागणार नाहीत, मुळात आपण अशा लोकांना संधीच का द्यावी की आपल्या गोष्टींचं भांडवल करून ही लोकं स्वतःला मोठं करू पाहतील. 

तुमचा  हेतू आणि  दृष्टीकोन कितीही स्वछ आणि निर्मळ असो समोरच्यानेही तसाच विचार करावा हे होऊ शकत नाही. समोरचा त्याच्या बौद्धिक आणि वैचारिक क्षमतेनुसारच तुमच्या गोष्टी घेणार. ही अशी लोकं तुमच्या गोष्टींचं भांडवल करून त्यांचा गुणधर्म बरोबर बजावतात मात्र तुम्ही तुमचं कर्म असं करा की भांडवलीकरण करणाऱ्यांना चपराक बसेल, त्यांना संधीच मिळणार नाही. 

ह्या सगळ्या गोष्टी कदाचित ती कुणाशी तरी बोलून आपलं मन रिकामं करू शकली असती मात्र हा एक अनुभव तिच्या समोर असताना ती आता कुणावरही विश्वास ठेवू इच्छित नव्हती. तिला भीती वाटत होती की आपण  चांगल्या मनाने काहीतरी बोलायला जायचो आणि पुन्हा कुणीतरी आपल्या गोष्टींचं भांडवल करतील आणि स्वतःची पोळी शेकून घेतील. 

लोकांनी मोठं व्हावं ते आपल्या कर्तृत्वावर, ज्ञानाच्या बुद्दीमत्तेच्या जोरावर. Sky is the only limit for you. संपूर्ण जग तुम्ही जिंकून तुमचं कर्तृत्व सिद्ध करू शकता. मात्र जर तुम्ही लोकांच्या कमतरतेमुळे किंवा कमकुवतपनाचा फायदा घेऊन पुढे जायचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही चार दिवस आनंद साजरा कराल पण हा आनंद तुम्हाला टिकवून ठेवता येणार नाही कारण तुम्ही सतत दुसऱ्याच्या गोष्टी शोधत बसता किंवा अशा संधीच्या शोधन्यात बसता आणि चार क्षण आनंदाचे जगायचे राहूनच जाता. 

सोनं किंवा हिरा आपल्या चुकभूलीमुळे इकडे तिकडे गहाळ झालं किंवा भंगारात हरवून गेलं तरी ते जास्त काळ लपून नाही राहू शकत. ते शंभर नंबरी सोनं आहे त्याच्या चमकण्याच्या गुणधर्मामुळे ते चमकणारच आणि ते तुमच्या द्रुष्टीला पडणारच. मात्र ज्या धातूला सोन्याचा मोलमा दिला आहे त्याच्या मोलाम्याची अवधी आहे तोवरच ते चमकत राहणार आणि एकदा का मोलमा गेला  की ते डोळ्याला कितीही चष्मे घातले तरी ते दृष्टीस नाहीच पडणार. 

विचारांच्या गर्तेचं वादळ आता शांत झालं होतं. शब्दरूपी लेखणीने तिला आता बळ दिलं होतं. तिच्याच शब्दांनी तिला उभारी मिळाली होती.  

आरशात दिसणारी आपली प्रतिमा खोटी असू शकते, चार लोकांत आपली प्रतिमा वेगवेळी असू शकते म्हणजे चांगली किंवा वाईट मात्र तुमचं मन तुमच्याशी कधीच खोटं बोलू शकत नाही म्हणून लोकांना आपल्याबद्दल काय वाटतं यापेक्षाही तुम्हाला स्वतःला तुमच्याबद्दल काय वाटतं हे खूप महत्त्वाचं आहे आणि ही प्रतिमा कधीच खोटी असू शकत नाही. 

लोकांना लोकांचं काम करू देत. तो त्यांचा गुणधर्म आहे तुम्ही तुमचं प्रतिबिंब तुमच्या मनात स्वच्छ दिसत राहण्यासाठी नेहमी चांगलं कर्म करत रहा. म्हणजे तुमचं मन तुम्हाला कधीच खात राहणार नाही. 

तिला खूप हलकं हलकं वाटत होतं. चार दिवसांचा चाललेला विचारांचा कल्लोळ आता शमला होता. जणू खूप सारा प्राणवायू मिळाला होता आणि हा प्राणवायू पुढे येणाऱ्या वादळांत जगण्याची नवउमेद घेऊन आला होता.

ती आता स्वतःला सुधारण्यात इतकी व्यस्त झाली की किंचितही वेळ किंवा संधी आता ती लोकांना तिच्या चुका शोधण्यासाठी देत नव्हती. 

एकदा का तुमचं कर्तृत्व सिद्ध झालं की संशयी नजरा, संधीसाधू लोकं आपोआपच आदराने झुकतील असा तिला ठाम विश्वास आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या