स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना थोडे मागे वळून पाहूया..
खरं स्वातंत्र्य आणि पारतंत्र्य काय हे तीच लोकं सांगू शकतात ज्यांना पारतंत्र्याचे चटके बसले. गुलामगीरीची झळ बसली.
आमची पिढी काय किंवा तुमची पिढी काय आपल्याला पारतंत्र्याचा चटका बसलाच नाही..
आपण आज आपले विचार, आपली मतं मांडू शकतो, आपण कुठेही फिरू शकतो, आपण आपणांस नपटणाऱ्या गोष्टीबद्दल विरोध करू शकतो, आपण हवं ते शिक्षण घेऊ शकतो, आपण हवी ती नोकरी करू शकतो.
आपल्याला बोलण्याचं स्वातंत्र्य मिळालं, आपले विचार मांडण्याचं स्वातंत्र्य मिळालं, आपल्याला फिरण्याचं स्वातंत्र्य मिळालं, आपल्याला वित्तीय स्वातंत्र्य मिळालं.
मात्र जरा विचार करा,
आपण अजून पारतंत्र्यातच असतो तर..
आज हे माझे विचार तुमच्यापर्यंत पोहचवू शकले असते का?
माझे विचार मांडण्यासाठी ज्ञानाची गरज आहे हे ज्ञान मी घेऊ शकले असते का?
माझे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी वेगवेगळी माध्यमं उपलब्ध असती का?
आपल्याला सदैव एका विशिष्ट लोकांचंच ऐकावं लागलं असतं. आपल्या मनाप्रमाणे जगता आलं नसतं, आपल्याला नेहमी अत्याचार सहन करावे लागले असते, गरिबीत खितपत रहावं लागलं असतं, आपल्याला हवं ते शिक्षण कधीच घेता आलं नसतं किंवा ते घेऊन दिलं गेलं नसतं, अठरा वीश्व दारिद्र्यात दिवस काढावे लागले असते.
आज तुम्ही आम्ही ज्या समाजाचा भाग आहोत या समाजाचं चित्र खूप वेगळं असतं. पारतंत्र्याचा काळ तुम्ही आम्ही प्रत्यक्षात अनुभवला नाही मात्र पुस्तकांमधून, चित्रपटांमधून तो आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आपण हे नक्कीच सांगू शकतो की आपण त्या भयानक काळाचा भाग नाही आहोत.
स्वातंत्र्यापूर्वीचा काळ म्हणजे वित्तीय पारतंत्र्याच्या काळ होता, शैक्षणिक पारतंत्र्याचा काळ होता, वैचारिक पारतंत्र्याचा काळ होता. लोकांना खूप अत्याचारांना सामोरं जावं लागलं. खूप काबाडकष्ट करून देखील पोटाला पोटभर खायला अन्न मिळत नव्हतं.
याच समाजातील काही लोकांनी लोकांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला सुरुवात केली. हळू हळू लोकांना त्यांच्या पारतंत्र्याची जाणीव होत गेली. लोकं बंड पुकारु लागली. अन्यायाविरुद्ध आवाज उठवू लागली. हळू हळू या बंडाचं रूपांतर चळवळीत झालं. वेगवेगळ्या अशा चळवळी ज्याचं नेतृत्व मा. गांधीजी, नेताजी सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, विनायक दामोदर सावरकर आणि असे बरेच लोक सेनानी ज्यांनी आपला देश स्वतंत्र व्हावा म्हणून खूप मोठं काम केलं.
खूप मोठ्या आव्हानांचा सामना करून इंग्रजांचा आणि त्यांच्या अत्याचाराचा, गुलामगिरीचा विरोध केला. सुखदेव, भगतसिंग आणि राजगुरू यासारख्या अनेक वीरांनी आपल्या देहाची आहुती दिली. अनेक तरुण मुलांनी स्वतःला स्वातंत्र्याच्या चळवळीत झोकून दिलं. आपलं रक्त सांडलं, हसत हसत आपल्या प्राणाची आहुती दिली.
जवळ जवळ दीडशे वर्ष या इंग्रजांची गुलामगिरी आपल्या देशाने सहन केली. अनेक छोटी मोठी बंड, छोट्या मोठ्या चळवळी, लाखो लोकांच रक्त सांडलं, लाखो लोकांच्या प्राणाची आहूती गेल्यानंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश इंग्रजांच्या गुलामगिरीतुन मुक्त झाला. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. इंग्रजांना आपला देश सोडून जावं लागलं.
देश स्वतंत्र झाला. मात्र इंग्रजांच्या गुलामगिरी मुळे देश प्रगतीपासून खूप वर्ष मागे गेला होता. समाजात समानता नव्हती. खूप श्रीमंत, आणि खूप गरीब अश्या दोन स्तरांमध्ये देश विभागला गेला होता. अतिशय उच्चशिक्षित आणि शिक्षणापासून वंचित असणारा स्तर अशी देशाची विभागणी झाली. अंधश्रद्धेच्या आहारी लोकं जात होती.
महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी कर्वे, आगरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकांना शिक्षण मिळावं, समाजात समानता असावी, अंधश्रद्धेवर आधारीत रूढी परंपरा समूळ नष्ट होण्यासाठी प्रयत्न केले.
पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक प्रयत्नांनी संविधानाची निर्मिती झाली. 26 जानेवारी 1950 साली संविधानाला मान्यता मिळाली. संविधानाच्या मान्यतेनंतर लोकांना चालण्याचा, बोलण्याचा, आपले विचार मांडण्याचा, शिक्षण घेण्याचा अधिकार मिळाला. सर्वसामान अधिकार मिळाला. कुणाला कमी किंवा कुणाला जास्त अधिकार असं न होता समाजातील सर्वच स्तरांतील लोकांना समान अधिकार मिळाले.
कायद्याची निर्मिती झाली. अन्यायाविरुद्ध लोकं तक्रारी करू लागली. लोकांना पोलिसात तक्रार दाखल करता येऊ लागली. लोकांना न्याय मिळू लागला.
लोकं आता शिक्षण घेऊ लागली. ज्ञानाच्या जोरावर नवनवीन तंत्र विकसित होऊ लागली. नवनवीन शोध लागू लागले. नवनवीन उद्योगधंदे सुरू होऊ लागले. औद्योगिक क्षेत्रात प्रगती होऊ लागली. लोकांना हाताला काम मिळु लागलं. लोकांच्या हातात आता पैसा येऊ लागला. हळूहळू गरिबी दूर होऊ लागली.
आपला देश आता प्रगतीच्या पथावर चालू लागला. मधल्या काळात आपल्या देशाच्या फाळण्या देखील झाल्या. पाकिस्तान आपल्या पासून वेगळा झाला. बांगला देश वेगळा झाला. भारत चीन युद्ध झालं. खूप सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. नंतर भारत पाकिस्तान युद्ध झालं. भारताच्या सैन्यापुढे पाकिस्तानचा टिकाव लागला नाही परंतू खूप सैनिकांना वीरमरण आलं. खूप ऑफीसर धारातीर्थी पडले.
भारतानं खूप मोठा दुष्काळ देखील पाहिला. लोकांचे पोटाचे खूप हाल झाले. लोकांना सुकडी खाऊन दिवस काढावे लागले. पोटाला खायला अन्न न मिळल्याने कित्येक लोकांचा जीव देखील गेला.
दुष्काळातून देश सावरतो न सावरतो तोच साथीच्या रोगांनी डोकं वर काढलं. पटकी, प्लेग यासारखे रोग ज्यामुळे पुन्हा खुप लोकांचा जीव गेला. उपचार साधनं कमी पडली. मात्र हळूहळू वैद्यकीय क्षेत्रात क्रांती होत गेली. सर्व रोगांवर लसीकरण येऊ लागलं.
विज्ञान, आयटी तंत्रज्ञान, क्षेत्रात खुप प्रगती झाली. औद्योगिकीकरण झालं. देश बदलू लागला. देश प्रगत झाला. सर्वच क्षेत्रात देशाने उत्क्रांती केली. आपला भारत देश सर्वच क्षेत्रात उत्तुंग असं कार्य करू लागला.
देश प्रगतीच्या पथावर वाटचाल करत होता, वैद्यकीय क्षेत्रात खूप प्रगती झाली, लोकं उच्च शिक्षित झाली. शैक्षणिक दृष्ट्या, वित्तिय दृष्ट्या, वैचारिक दृष्ट्या देशात समानता आली. समाज सुधारित झाला. देशात वित्तिय क्रांती झाली, वैचारिक क्रांती झाली, शैक्षणिक क्रांती झाली, औद्योगिक क्रांती झाली मात्र त्याचबरोबर देशात आतंकवादी कारवाया वाढत गेल्या.
पाकिस्तान ने आपल्या देशावर पुन्हा हल्ला केला. 1999 साली पाकिस्तान ने भारतावर हल्ला केला. आपल्या देशाने प्रति हल्ला चढविला. आपल्या जवानांनी, आर्मी ऑफीसरनी, हवाई दलाने पाकिस्तान ला सळो की पळो करून सोडलं. आपल्या खूप जवानांनी, ऑफिसरनी आपल्या जीवाची बाजी लावली आणि अखेर हे युद्ध आपण जिंकलं.
पुढे बऱ्याच आतंकवादी कारवाया आपल्या देशावर झाल्या. अलीकडची सर्वात मोठी कारवाई म्हणजे 26/ 11 चा दहशतवादी हल्ला. हा हल्ला देखील आपण परतवून लावला.
कोणताही हल्ला असो, कोणतीही कारवाई असो यामध्ये आपल्या खुप लोकांना जिवाला मुकावं लागलं, आपल्या प्राणाची आहूती द्यावी लागली मात्र कोणत्याही प्रकारचा हल्ला असो तो परतवून लावण्यास प्रत्येक वेळी आपल्याला यश मिळालं आहे.
अगदीच कालपरवापर्यंत कोरोनासारख्या महाविषाणू वर देखील आपण मात केली आहे. या महाविषाणू वर लसीकरण करणारा भरतदेश एक नंबर वर आहे. बाहेरच्या देशांना देखील आपल्या देशानं कोविड लसीकरणासाठी मदत केली आहे.
प्रत्येक संकटांवर मात करत, प्रत्येक आतंकवादी हल्यावर मात करत, प्रत्येक युद्ध जिंकत, प्रत्येक क्षेत्रात उत्क्रांती करत आपला देश अभेद्य उभा आहे.
पारतंत्र्याची झळा पोहचलेली पिढी आणि स्वातंत्र्याचा जल्लोष साजरा केलेली पिढी एकत्र येऊन आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहेत.
आजचा हा
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणजे बलिदानाचं प्रतीक
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणजे वैचारिक स्वातंत्र्याचं प्रतिक
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणजे वित्तीय स्वातंत्र्याचं प्रतिक
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणजे स्वावलंबनाचं प्रतिक
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं प्रतिक
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणजे औद्योगिक उत्क्रांतीचं प्रतिक
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणजे समानतेचं प्रतिक|
जहाँ डाल डाल पर सोने की चिडिया करती हैं बसेराओ भारत देश है मेरा|ओ भारत देश है मेरा|
स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा|
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या सर्वांना खूप शुभेच्छा
भारत माता की जय|
लेखन,
प्रा. डॉ. मनिषा पाटील - मोरे
0 टिप्पण्या
कृपया तुमच्या प्रियजनांना लेख शेअर करा आणि तुमचा अभिप्राय जरूर नोंदवा. 🙏 🙏