पत्रास कारण की,


सन 2020 साल सुरू झालं आणि दोन महिन्यातच कोरोना महामारीची लागण झाली.ही लागण फक्त आपल्या देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला कोरोना संक्रमनाला बळी पडावं लागलं.संपूर्ण  जगभर कोरोना संक्रमनाचं भीतीचं वातावरण होतं.याच भीतीपोटी कोरोनाला भावनिक व विनंती वजा पत्र लिहून आपल्या परीने कोरोनाला घालवण्याचा प्रयत्न एका सृजनशील नागरिकाने केला आहे.


पत्रास कारण की,


कोरोनाच्या नोंदी


जागतिक महामारी घेऊन आलेला महाभयंकर, क्रूर,निर्दयी, निष्ठुर विषाणू कोरोना यांस स.न.वि.वि. पत्रास कारण की,

पत्राची सुरुवात करताना खरंतर आम्ही प्रिय या शब्दाने करतो.पण तू एक महाभयंकर,लोकांना गिळंकृत करायला आलेला विषाणू आहेस.

खरं तर तू आमचा पाहुणा.आमच्या शेजारील असणाऱ्या चीन या देशातून आमच्याकडे आलास.आमची संस्कृती "अतिथी देवो भव" मानणारी आहे.आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार करणं हे आमचं आद्य कर्तव्य असतं.पाहुण्यांच्या येण्यानं आमचं घर आनंदी होतं.पण तू आलास आणि संपूर्ण देशाला धडकीच भरली.आमच्या देशातील निष्पाप जीवांना तू खाण्यासाठी,मारून टाकण्यासाठी आलास.

बरं तू आलास पण कसा एखादा अतिरेकी जसा लपून छपूण  सगळ्यांची नजर चुकवून येतो आणि हल्ला करतो व निष्पाप लोकांना मारून टाकतो,सर्वनाश करतो अगदी तसाच गुपचूप कुणाला न कळता तू आलास.पण अरे अतिरेकी डोळ्यांना दिसतात.त्यांना पोलीस पकडतात.लोकं त्यांच्यापासून लांब राहू शकतात.तुझं तसं नाही ना रे.तू आमच्या डोळ्यांना दिसतच नाहीस.

तू मात्र एखाद्या बांडगुळासारखा महाभयंकर विषाणूचं रूप घेऊन आमच्याच लोकांच्या शरीरातून हजारो किलोमीटरचा प्रवास करून आलास. बरं तू आलास पण कुणा एकट्याच्या शरीरात नाहीस रे थांबलास! तू तर साखळीच केलीस अन काही दिवसातच पूर्ण देशभर पसरलास.

तू एकाच शरीरात जाऊन थांबला नाहीस तर तुझ्या विळख्यात कित्येकांना ओढून घेतलंस. तुझी साखळी आणि त्याचा विळखा एवढा घट्ट आहे  अरे, आमची भोळी भाभडी लोकं नाही रे तोडू शकत.तू कुठून कसा आणि कधी लोकांच्या शरीरात प्रवेश करू शकशील याचा काही नेमच नाही.

आमची लोकं घरातून बाहेर पडायची बंद झाली.शाळांना व कॉलेजना सुट्ट्या जाहीर झाल्या,कंपन्याही बंद केल्या.अत्यावश्यक सेवा वगळता पूर्ण देशभर लॉकडाऊन जाहीर झाला.लोकांचं काम थांबलं.हातावरचं पोट असणारांची उपासमार सुरू झाली.सरकारला वाटलं थोड्या दिवसात तू जाशील,म्हणून पहिला लॉकडाऊन जाहीर केला.तू मात्र एका शरीरातून दुसऱ्या शरीरात अगदी सहजपणे  वावरत होतास.आम्हाला 14 दिवसांपर्यंत कळतच नाही की तू आमच्या शरीरात प्रवेश केला आहेस.आमच्या नकळत तू आमच्या शरीरात वावरत असतोस आणि याची आम्हाला कल्पना ही नसते.

तुझी लक्षणं  काय तर सर्दी,ताप आणि खोकला.ही लक्षणं तर एरव्ही ही असतात म्हणजे पाण्यात बदल झाला किंवा ऋतूमानात बदल झाला.त्यामुळे शिंकायला सुद्धा भीती वाटते रे.आणि आमच्या शेजारी एखादा शिंकला तर आम्ही त्याच्यापासून चार हात लांब राहतो.का तर तो कोरोनाग्रस्त असू शकतो.याच कारणांमुळे सुरुवातीच्या काळात कित्येक लोकांनी मार ही खाल्ला आहे.तुझ्यामुळे कित्येक लोकांना शिंकणही महागात पडलं आहे.

तुला रोखण्यासाठी आम्ही तोंडाला मास्क लावून लावून आता गुदमरायला लागलोय.किती वेळा हात धुवायचे आणि सॅनिटायजर लावायचा.हातांना आता त्वचा रोग व्हायला लागलेत.आम्ही खूप भोळे भाबडे आहोत रे.तुला रोखण्यासाठी कुणी काय उपाय सांगितले तर ते आम्ही लगेच करायचो.कोरा चहा सुरू केला,हळददुध सुरू केलं,गरम पाणी प्यायला सुरू केलं,वेगवेगळे काढे प्यायला सुरू केले,कडक उन्हाळा असून सुद्धा आम्ही दिवसातून दोनदा कडक पाण्याने अंघोळही केली, फ्रीजचं पाणी सुद्धा टाळलं,मुलाबाळांना आईस्क्रीम आणि थंड पेय व बाहेरचं इतर काहीही  दिलं नाही. योगासने,प्राणायाम जे जे शक्य आहे ते ते सर्व आम्ही करतोय पण तरीही तू तुझ्या जाळ्यात आम्हाला ओढत आहेस.

अरे तुझ्यामुळे शेतकऱ्यांच्या फळांच्या बागा,भाजीपाल्याच्या बागा मार्केट नाही म्हणून वाळुन गेल्या रे. शेतकरी जगाचा पोशिंदा पण त्याच्यावर आज उपासमारीची वेळ आली आहे.चिकन खाल्ल्याने तू आम्हाला जवळ करतोस त्यामुळे आम्ही चिकन,मटण आणि अंडी खाणं बंद केलं.या अफवेमुळे कित्येक पोल्ट्री व्यावसायिकांना करोडो रुपयांचं नुकसान झालं.ती छोटीछोटी पिल्लं त्यांना खड्यात पुरून टाकलं रे.किती मोठंआहे हे नुकसान.आम्हाला साधी सर्दी खोकला जरी झाला तर गावभर अफवा पसरायला लागल्या की, अमक्या अमक्याला कोरोना झाला म्हणून.

आमचं जाऊ दे रे आम्ही घरातच असतो आम्ही पाळू सगळ्या गोष्टी.अरे पण जरा त्या डॉक्टर आणि नर्स यांचा तरी विचार कर की.पेशंट साठी ते आपला जीव धोक्यात घालून सेवा देत आहेत.त्यांचाही तू जीव घेत आहेस.

देशात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित व्हावी म्हणून पोलीस दिवस रात्र लोकांच्यावर लक्ष ठेऊन आहेत.तर त्यांनाही तू जखडलं आहेस.पोलिसांची भीती नाही का रे वाटली तुला.

तूझा कहर म्हणजे आत्ताच जन्माला आलेल्या बालकाचाही विचार तू केला नाहीस.किती निष्पाप ते कोवळं बाळ काय बिघडवलंय त्यानं तुझं.आईच्या कुशीत जाण्यासाठी आसुसलेलं ते बाळ त्याच्या आईलाही त्रास देतोयस.दोघांची तू ताटातूट करतो आहेस.

90 वर्षाच्या आजीआजोबांना ही तू त्रास दिलास.आयुष्यभर खूप सोसलं होतं रे त्यांनी.किती आयुष्य राहिलं आहे त्यांचं ?त्यांनाही तू आनंदानं जगू दिलं नाहीस.तू त्यांचं ही शरीर सोडलं नाहीस.पण तेही काही कमी नव्हते.आयुष्यात इतके पावसाळे पाहिलेत त्यांनी हार मानतील तर शपथ.तुला शेवटी हार मानायला लावलीच.

नगरपालिका, महानगरपालिका, दवाखाने यांचे सफाई कामगार संपुर्ण परिसर स्वछ राहण्यासाठी निर्जंतुकीकरण करत असतात. पण तू त्यांच्या शरीरातही शिरकाव करून जणू सूड घेत आहेस.

तुझ्यासाठी उचनीच,गरीब श्रीमंत, लहानथोर, सुशिक्षित,अडाणी,शेतकरी,उद्योगपती,आमदार,खासदार किंवा मंत्री कोणताच भेद नाही.जणू सगळेच तुझे दुष्मण आहेत.

तुझ्यामुळे हजारो कामगार आणि मजूर हाताला काम आणि खायला अन्न नाही म्हणून हजारो किलोमीटरचा प्रवास पायी करून आपापल्या गावी निघून गेले.कित्येकांना त्यांचे केलेल्या कामाचे पगार मिळाले नाहीत.कित्येकांना त्यांच्या नोकरीवरून कमी केलं.कित्येकांचं घराचं भाडं,कर्जाचे हापते भरणं बाकी आहे.लोकांची मानसिक अवस्था खूप वाईट  झाली आहे रे.

हाताला काम नाही आणि  पोराबाळांना सांभाळायला जवळ पैसा नाही.तुझ्यामुळं लोकांना मरणाची भीती आहेच पण तुझ्यामुळे जी भीषण परिस्थिती निर्माण झालीय त्याचा मानसिक तणाव लोकांना जास्त आला आहे.आणि याच तणावाखाली लोकं टोकाचं पाऊल उचलून आपली जीवन यात्रा कायमची संपवत आहेत.

थकलो आता आम्ही.किती काळ तुला सहन करायचं.सवय झाली आता तुझी.उपाशी मरण्यापेक्षा लोकं आता हळू हळू कामाला लागली आहेत.घराबाहेर पडायला लागली आहेत.तुला घाबरून किती काळ घरात बसणार.पण तू काही कंटाळला नाहीस.तुझा वेग तू वाढवतच आहेस.सगळ्यांचं खूप नुकसान झालं आहे रे बस कर आता. सर्व दवाखाने फूल झाले आहेत.अजून असंच सुरू राहिलं तर आम्हाला दवाखान्यात जागाही नाही मिळणार.खासगी दवाखाने  आम्हाला परवडण्यासारखे नाहीत.अजून अंत नको बघू आमचा.

सव्वाशे कोटी जनतेच्या जीवाशी खेळणारा तू,खरं तर सगळे पर्याय खुंटलेत आता.फक्त विनंती करू शकतो.म्हणून एवढं शांत तुझ्याशी बोलत आहोत.बाबा निघून जा आता.चार पैसे कमवू दे आंम्हाला.आमचा ताणतणाव कमी होऊ दे.आमच्या सर्व कोरोना योध्यांना सुटकेचा श्वास घेऊ दे.आमचा देश,आमचं राज्य पुन्हा पहिल्यासारखं सुरळीत होऊ दे.आमच्यावर आलेली ही ईडापीडा लवकर टळू दे, ही विनंती मान्य कर आणि निघून जा कायमचा.

कळावे,
या देशाची एक सुज्ञ नागरिक

लेखन,
डॉ. मनिषा मोरे
व्हाट्सएप--9511775185

टिप्पणी पोस्ट करा

8 टिप्पण्या

  1. लेख तुमच्या प्रियजनांना ही पाठवा

    उत्तर द्याहटवा
  2. छान लिहिलंय. मनाला भिडला हा लेख. सर्व स्तरातील जनतेची होणारी ससेहोलापट, तगमग अगदी तळमळीने मांडली आहे.

    उत्तर द्याहटवा
  3. सर्वप्रथम आपण लिहिलेल्या पत्रांस मी, आभाळभर हार्दिक अभिनंदन करतो. लोकडाऊनच्या काळापासून ते आतापर्यंत कोरोना विषाणूचा घडलेला थरारक प्रवासाची उकल करून दिली आहे. पाहूना म्हणून आलेला शेजारच्या देशांतून हा कोरोना विषाणू भारतात सर्वत्र कसा थैमान घालून जगात सर्वत्र ठिकाणी हाहाकार माजवुन आता कुठंतरी एकेठिकाणी निपचित पडला आहे. पत्रांत मांडलेला कोरोना विषाणूचा उच्छाद,पीडा..ढासळलेली अर्थव्यवस्था, सामाजिक व्यवस्था, गोरगरिबांचे अन्नपाण्या वाचून झालेले हाल उदासीनता याचं अगदी तंतोतंत विदारक चित्रणं पत्रात रेखाटले आहे.
    कोरोनाच्या काळात उद्धभवलेली त्रासदायक परिस्थिती याचं हुबेहूब चित्रणं तुम्हीं पाझरणाऱ्या लेखणीतून मांडले आहे. सत्यता लिखाणाची तुमच्या सुंदर पत्रांत पहायला मिळते. पत्र वाचतांना मंतरलेल्या कोरोना काळात बितलेल्या प्रसंगांना,आठवणींना मनात उजाळा झाल्या सारखा वाटतोय. एक सुजाण कर्तव्यदक्ष भारतीय नागरिक म्हणून अगदी लिहिताना निस्वार्थ असा न्याय दिला आहे.
    पत्र मनापासून आवडले. खूप खूप आभाळभर गुणकवतुक आणि जोरदार अभिनंदन!.👌👌👌👍👍💐💐💐💐

    उत्तर द्याहटवा

कृपया तुमच्या प्रियजनांना लेख शेअर करा आणि तुमचा अभिप्राय जरूर नोंदवा. 🙏 🙏